आलेहो आले पंत आले अन् गरजले

मुकुंद पोतदार
Sunday, 19 August 2018

पंत छोट्या चणीचा असून त्याच्याकडे विलक्षण ताकद आहे. क्रिकेटच्या परिभाषेत तो एक explosive strokeplayer आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या भात्यात वैविध्यपूर्ण फटके आहेत. 

प्रतिभा अन् क्षमतेने श्रीमंत
गोलंदाजांना मिळणार नाही उसंत
दणाणून सोडेल क्रिकेटचा आसमंत
असा हा भावी सितारा रिषभ पंत

इंग्रजीत एक उक्ती आहे. One swallow doesn't make a summer. याचा अर्थ असा की एखादी गोष्ट भन्नाट घडली म्हणजे ती तशीच चिरकाल टिकेलच असे नाही. अशा आशयाची मराठीतील म्हण म्हणजे सूतावरून स्वर्ग गाठू नये. अशा म्हणींचा संदर्भ देऊन काही भाष्य नक्कीच करता येते आणि त्यातही क्रिकेटचा विषय असेल तर आकडेवारीचा संदर्भ देत चर्चा नक्कीच होऊ शकते.

अशी चर्चा घडविण्यास निमित्त ठरला आहे तो भारताचा लेटेस्ट कसोटीपटू रिषभ पंत. त्याने इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहॅममधील ट्रेंटब्रीज मैदानावर कसोटी पदार्पण केले. हे पदार्पण त्याने जोरदार ठरविले. पहिलाच स्कोअरिंग शॉट नोंदविताना त्याने उत्तुंग षटकार खेचला. आदिल रशीदचा चेंडू त्याने प्रेक्षकांत भिरकावून दिला. गार्ड घेतल्यापासून हा त्याचा दुसराच चेंडू होता. पंत अशी कामगिरी केलेला क्रिकेटच्या इतिहासातील 12वा खेळाडू ठरला. (प्रदिर्घ इतिहास असलेल्या क्रिकेटमध्ये जिथे प्रत्येक चेंडूवरील धावांचे रेकॉर्ड ठेवले गेले आहे, त्यानुसार ही यादी बनविण्यात आली आहे. ही यादी लेखाच्या शेवटी दिली आहे.)

 पंत हा भारताचा 291वा कसोटीपटू ठरला. कसोटी कारकिर्दीत सिक्सरवर खाते उघडलेला तो पहिलाच भारतीय ठरला. याचा अर्थ त्याने पहिला ठसा तर थाटातच उमटविला आहे. यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून महेंद्रसिंह धोनीचा वारसदार अन् भारतीय क्रिकेटचे आशास्थान अशी पंतची गणना होते. इंग्लंड दौऱ्यात त्याला संधी मिळण्याची अपेक्षा होती, ती मिळण्यासाठी त्याला प्रतिक्षा करावी लागली. वृद्धिमान साहाच्या दुखापतीनंतर प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये भरीव कामगिरी केलेला, गुजरातला रणजी करंडक जिंकून दिलेला, आयपीएलमध्ये ठसा उमटविलेला पार्थिव पटेल याचा पत्ता आकस्मिक कट झाला. त्याच्याऐवजी दिनेश कार्तिकची वर्णी लागली. झटपट क्रिकेटमधील कामगिरी कार्तिकसाठी महत्त्वाची ठरली. पंतची प्रतिक्षा परिणामी लांबली, पण कार्तिकला दुखापत झाली आणि पंतची प्रतिक्षा अखेर संपुष्टात आली. कर्णधार विराट कोहली याच्याहस्ते पंतला टेस्ट कॅप प्रदान करण्यात आली.

पंतची प्रथमश्रेणीतील कामगिरी पाहिल्यास तो लंबी रेस का घोडा असल्याचे स्पष्ट होते. पंत खेळपट्टीवर उतरला तेव्हाची पार्श्वभूमी सुद्धा जाणून घ्यावी लागेल. आदिल रशीदच्या लेगस्पीनवर विराट चकला होता. तो 97 धावांवर बाद झाला होता. नव्वदीत बाद झालेल्या फलंदाजास नर्व्हस नाईंटीजची शिकार असे संबोधले जाते. विराटवर कारकिर्दीत दुसऱ्यांदाच अशी वेळ ओढविली होती. क्रिकेटमध्ये देहबोलीला (बॉडी लँग्वेज) कमालीचे महत्त्व असते. इंग्लंड दौऱ्यातील शतकाची प्रतिक्षा कसोटी मालिकेतील पहिल्याच डावात संपुष्टात आणलेल्या विराटची विकेट सर्वाधिक बहुमोल होती. त्यातच त्याला शतकापासून वंचित ठेवल्यामुळे इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांना स्फूरण चढले होते. अशावेळी पंतने रशीदला सिक्सर खेचणे त्याची जिगर, मनोधैर्य, दृष्टिकोन, परिपक्वता दाखवून देते. याप्रसंगी इथे आणखी एक मुद्दा नमूद करावा लागेल. पंतने मारलेला फटका स्वैर म्हणजे क्रॉस बॅटेड नव्हता, तर त्याने अगदी तंत्रशुद्धा असा स्ट्रेट शॉट मारला.

पंत छोट्या चणीचा असून त्याच्याकडे विलक्षण ताकद आहे. क्रिकेटच्या परिभाषेत तो एक explosive strokeplayer आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या भात्यात वैविध्यपूर्ण फटके आहेत. 

कष्टप्रद वाटचाल

पंतने इथपर्यंत केलेली वाटचाल सोपी नाही. तो रुरकीचा रहिवासी आहे. तेथे स्पर्धात्मक वातावरण आणि दर्जेदार सुविधा मिळणार नाहीत म्हणून तो दिल्लीला येऊ लागला. सॉनेट क्लबमध्ये तारक सिन्हा यांनी त्याला सुरवातीला मार्गदर्शन केले. सहप्रशिक्षक देवींदर शर्मा आणि सिन्हा यांनी त्याचा पाया भक्कम केला. मुख्य म्हणजे पंतकडे शिस्त आणि चिकाटी हे उपजत गुण आहेत. त्यामुळे रुरकीहून पहाटे तीन वाजता निघणाऱ्या बसमध्ये बसून तो सकाळी आठ वाजता दिल्लीत यायचा आणि सॉनेट क्लबवर जाऊन सराव सुरु करायचा. अनेकदा तेवढ्या पहाटे बस स्टँडवर जायला वाहन मिळायचे नाही. त्यामुळे पंत आणि त्याची आई सरोज झपझप चालत किंवा धावात बस स्टँड गाठायचे आणि बस पकडायचे.

महाराष्ट्राविरुद्ध चमक

पंतने 2016-17च्या रणजी करंडक मोसमात महाराष्ट्राविरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 308 धावांची खेळी साकारली होती. त्याआधी महाराष्ट्राच्या स्वप्नील गुगळे आणि अंकित बावणे यांनी तब्बल 594 धावांची भागिदारी रचली होती. पंतने तेव्हा सुमारे दोन दिवस आणि तब्बल 173 मिनिटे यष्टिरक्षण केले होते. गुगळेने 351, तर बावणेने 258 धावा केल्या होत्या. पंतने या दोघांची फलंदाजी आणि त्यांची भागिदारी झाकोळणारा पराक्रम करून दाखविला. त्याने 468 मिनिटे किल्ला लढविताना 326 चेंडूंचा सामना केला. 42 चौकार आणि नऊ षटकारांसह 308 धावा चोपल्या. तिसऱ्या दिवसाअखेर पंत 155 धावांवर नाबाद होता. द्विशतक आणि मग त्रिशतक पार केल्यानंतर तो 400 धावा सहज करेल असे वाटत होते, पण तो यष्टिचीत झाला. या खेळीद्वारे पंतने आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखविली. त्याने त्याच मोसमात त्याने झारखंडविरुद्ध 48 चेंडूंमध्येच शतक ठोकले होते. भारतातील प्रथमश्रेणी क्रिकेटमधील हे सर्वाधिक वेगवान शतक ठरले होते. 

डावखुरा विरू

दिल्ली क्रिकेटमध्ये पंतच्या गुणवत्तेविषयी भरभरून बोलले जाते. देवींदर यांच्यामते तो डावखुरा विरू आहे. विरेंद्र सेहवागशी तुलना करताना पंतचा एक मुद्दा वेगळा असल्याचे नमूद करावे लागेल. हा मुद्दा म्हणजे पंत हा विरूसारखा आणि विरूइतका बिनधास्त फटकेबाज नाही. 
पंतची ही आता कुठे सुरवात आहे, पण ती अगदी झोकात झाली आहे. पंत भक्कम भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास वाटतो.

संबंधित बातम्या