कथा एका पडेल फुटबॉल स्टारची

मुकुंद पोतदार
Saturday, 11 August 2018

ब्राझीलचा हा सुपरस्टार, सुप्रसिद्ध नाव नेमार

प्रतिस्पर्ध्याच्या स्टडचा लागताच किंचीतसा मार

इतका कळवळून गडाबडा लोळतो की जणू झाला वार

याच्या नडगीवरील शीनगार्डमधून जणू स्टड गेला आरपार

ब्राझीलचा हा सुपरस्टार, सुप्रसिद्ध नाव नेमार

प्रतिस्पर्ध्याच्या स्टडचा लागताच किंचीतसा मार

इतका कळवळून गडाबडा लोळतो की जणू झाला वार

याच्या नडगीवरील शीनगार्डमधून जणू स्टड गेला आरपार

रशियातील फुटबॉलचा वर्ल्ड कप संपून आता तीन आठवडे लोटून गेले आहेत, पण त्या स्पर्धेचे पडसाद उमटच आहेत. वर्ल्ड कपचे व्यासपीठ गाजवून स्टार बनलेल्यांना ट्रान्सफर मार्केटमध्ये विक्रमी भाव मिळून घसघशीत कमाई होत आहे. त्यांचे मार्केट वाढले आहे. दुसरीकडे या स्पर्धेपूर्वी स्टारच नव्हे तर सुपरस्टार असलेल्या एका खेळाडूवर मात्र आपले मार्केट कमी होऊ नये म्हणून सारवासारव करण्याची वेळ आली आहे. त्याच्यासाठी त्याच्या प्रायोजक कंपनीला हालचाल करावी लागली आहे. हा सुपरस्टार म्हणजे नेमार आणि त्याची प्रायोजक कंपनी आहे जिलेट.

रशियातील स्पर्धेत अनेक मातब्बर संघांची पिछेहाट झाली. त्यांच्या संघातील सुपरस्टार फ्लॉप ठरले. यात सर्वाधिक निराशा लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तीयानो रोनाल्डो यांनी केली. त्यातील मेस्सीविषयी अर्जेंटिनात आणि काही प्रमाणात जगातही असलेला सॉफ्ट कॉर्नर कायम राहिला. रोनाल्डोला युव्हेंट्सने महाप्रचंड रकमेच्या करारावर लाल पायघड्या घालून आमंत्रित केले. नेमारला मात्र प्रतिभा दाखविता न आल्यामुळे प्रतिमा आणि इतकेच नव्हे तर पतही गमवावी लागली. स्पर्धेपूर्वी त्याच्या पायाच्या बोटांवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे त्याच्या सहभागाविषयी प्रश्नचिन्ह होते. प्रत्यक्ष स्पर्धेपर्यंत तो तंदुरुस्त झाला, पण अखेरीस मैदानावर फ्लॉप ठरला. त्याहीपेक्षा प्रतिस्पर्ध्याचा नुसता धक्का लागला तरी तो कळवळून मैदानावर पडायचा आणि गडाबडा लोळायचा. त्यामुळे त्याची सोशल मिडीयावर खिल्ली उडाली. पडेल नेमारला सावरण्यासाठी मार्केटिंगच्या जमान्यात एका अग्रगण्य कंपनीने कशी शक्कल लढविली हे जाणून घेणे मनोरंजक ठरेल.

बोलका अन् रोकडा आकडा

कोणत्याही क्षेत्रात कुणासाठीही आकडा महत्त्वाचा असतो. मग तो क्लॉक-अवर-बेसीसवर काम करणारा प्राध्यापक असो किंवा विमानाचा पायलट, ज्याचे फ्लाईंग अवर्स मोजले जात असतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आधुनिक फुटबॉलमध्ये तर कोणता फुटबॉलपटू मैदानावर किती वेळात किती धावला याचा तपशील उपलब्ध असतो. याविषयी सुसुत्र पद्धतीने सुस्पष्ट आकडेवारी दर्शविणारे चार्ट्सच फिफाच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड केले जातात. नेमारच्या बाबतीत मात्र एक वेगळाच आकडा समोर आला. हा आकडा होता 14 मिनीटांचा आणि त्याचा उल्लेख होता नेमार्स रोलींग टाईम

अती झाले अन् हसू आले

रोलिंग टाईम हा शब्दप्रयोग ऐकून हसू आवरत नाही. या नौटंकीमुळे नेमारचे कौशल्य, प्रतिभा असे सारेच झाकोळले गेले. खरे तर या स्पर्धेत ते फारसे दिसले सुद्धा नाही. अतीपडण्यामुळे सोशल मिडीयावर नेमारची खिल्ली उडविणारे असंख्य मेसेज-पोस्ट व्हायरल झाल्या.

खुलासा-कबुली तेव्हाच का नाही

खरे तर वर्ल्डकपमधील आव्हान संपल्यासंपल्या नेमारने हा खुलासा केला असता तर ते समजण्यासारखे होते. नॉक-आऊट राऊंडमध्ये मेक्सिकोकडून आऊट झाल्यानंतर नेमारच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा होती. मी पार हताश झालो आहे. माझे फुटबॉलवरील मन उडाले आहे, असे तेव्हा तो इतकेच म्हणाला होता. वास्तविक नेमारने तेव्हाच हा खुलासा केला असता तर त्याला कदाचित सहानुभूती मिळाली सुद्धा असती, पण त्याने अगदी छोटेखानी प्रतिक्रिया दिली.

आणखी उडाली खिल्ली

नेमारच्या या वक्तव्यानंतर ट्रोलबहाद्दरांना वाव मिळणे स्वाभाविक होते. मेक्सिकोविरुद्ध पारडे जड असूनही ब्राझील हरणे धक्कादायक ठरले. त्यामुळे या निकालानंतर नेमारच्या नौटंकीची खिल्ली उडविणाऱ्या आणखी पोस्ट व्हायरल झाल्या. मुख्य म्हणजे अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी, पोर्तुगालाचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो यांच्या लाईनीत नेमारचाही नंबर लागल्याने सोशलमिडीयाकारांना आयडीयाच्या एक नव्हे अनेक कल्पना सुचत गेल्या. सर्वाधिक कहर केला तो केंटुकी फ्राईड चीकन अर्थात केएफसीने. या कंपनीने एक जाहिरातच तयार केली. त्यात मैदानावर पडून कळवळणाऱ्या नेमारला घेऊन जाण्यासाठी स्ट्रेचर आणले जाते, पण गडाबडा लोळणारा नेमार त्यांना चुकवितो. हाच नेमार मग मैदानाबाहेर जातो. बास्केटबॉल कोर्ट, समुद्रकिनारा, पूल, दुकानांसमोरील फुटपाथ पार करून तो एका सिग्नलपाशी येतो (अर्थातच लोळत-लोळत). पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याचा सिग्नल लागताच तो लोळत येऊन थांबतो तो केएफसी आऊटलेटमध्ये. केएफसी दिसताच मात्र हा नेमार लोळणे थांबवून दोन पायांवर खडा होतो आणि कळवळणाऱ्या त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलतात. काही सेकंदांत त्याची कळी आनंदाने खुलते.

डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न

नेमारचे सोशल मिडीयावर ट्रीक फोटोग्राफीद्वारे खिल्ली उडविणारे मेसेजेस-पोस्ट एक वेळ ठिक होत्या, पण केएफसीसारख्या जगप्रसिद्ध ब्रँडने असा व्हिडीओच बनविल्यानंतर मार्केटिंग जगतात त्याचे पडसाद उमटणे स्वाभाविक होते. मुख्य म्हणजे नेमारच्या प्रतिमेला यापूर्वीच तडा गेला होता, पण केएफसी अ-डमुळे त्याची पतही कमी होण्याचा धोका निर्माण झाला. नेमारचे प्रायोजक असलेली जिलेट कंपनी आणि केएफसी एकमेकांच्या स्पर्धक नाहीत. त्यामुळे हा अँबुश मार्केटिंगचा प्रकार ठरू शकत नाही. यानंतरही जिलेटची मार्केटिंग टीम सावध होणे अटळ होते. केएफसीपासून प्रेरणा घेत एखादी ब्लेड उत्पादक कंपनी अ-ड कँपेन राबवू शकते आणि तसे झाल्यास नेमारचे आणि पर्यायाने जिलेटचे मार्केट अडचणीत येऊ शकले असते. स्वाभाविकच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काहीतरी ठोस कृतीची गरज होती. ते नेमार आणि जिलेट या दोन्ही घटकांसाठी जणू काही क्रमप्राप्तच ठरले होते.

तोल-मोल के बोल

या पार्श्वभूमीवर अगदी विचारपूर्वक आखणी करण्यात आली. जिलेटच्या ब्राझीलमधील शाखेने एक व्हिडीओ तयार केला. त्यात नेमारच्या तोंडी घालण्यात आलेली वाक्ये म्हणजे निव्वळ माफीनामा नव्हे तर अगदी तोलून-मापून शब्द वापरून वाक्य तयार करण्यात आली. जगातल्या कोणत्याही भाषेतल्या कोणत्याही शब्दाला छटा असतात. नेमारचे वक्तव्य त्याचदृष्टिने विचारात घ्यावे लागेल.

नडगीला बुटांच्या स्टडचा प्रहार अन् मणक्यावर कीक. तुम्हाला वाटेल की मी नौटंकी करतो, काही वेळा माझी प्रतिक्रिया अतिरंजीत य्सते सुद्धा. पण खरे काय आहे, तर मैदानावर मला भोगावे लागते. ते मात्र तुम्हाला कळणार नाही. मी प्रेसशी न बोलता जातो तेव्हा मला केवळ जिंकल्यावरच बोलायला आवडते असे नव्हे, तर मला तुम्हाला निराश करायचे नसते. मी असे वागतो म्हणजे मी काही वाया गेलेला मुलगा बनलेला नसतो, तर मी अद्याप नैराश्यावर मात करण्यास शिकलेलो नाही. माझ्यात अजूनही एक लहान मुल दडले आहे. काही वेळा ते जगाला मंत्रमुग्ध करते, तर काही वेळा हुसकावून लावते. माझा लढा हा माझ्यात दडलेले हे मुलच जिवंत ठेवण्यासाठीच आहे, पण तो माझा अंतरिक लढा आहे, मैदानातला नव्हे..

या जाहीरातीत नेमार असेही म्हणतो की, मी फार वेळा पडतो असे तुम्हाला वाटू शकेल, पण खरे तर मी कोसळून गेलेला असतो. शस्त्रक्रियेनंतर तुमच्या घोट्यावर कुणी प्रहार केला तर फार वेदना होतात. नेमारचे पुढील वक्तव्य असे आहे की, मला आरशासमोर उभे राहून आत्मपरिक्षण करायला थोडा वेळ लागतो. पण मी असा हा तुमच्यासमोर उभा आहे तो खुल्या दिलाने. मी सावरू शकतो. मला हात द्यायचा की माझ्यावर दगड फेकायचे हे तुम्हीच ठरवा. या व्हीडीओमधील नेमारचा आवाज, त्याच्या तोंडी घालण्यात आलेले शब्द, याची योजना अगदी सुत्रबद्ध आणि सखोल आहे. मुख्य म्हणजे ही जाहीरात सुरवातीला ब्लॅक-अँड-व्हाईट आहे. त्यात नेमार मातृभाषेतून बोलतो. जगभरातील फुटबॉलप्रेमींसाठी त्याची भावना सबटायटल्समधून मांडण्यात आली आहे. प्रत्येक शॉट अगदी विचारपूर्वक आहे.

सरतेशेवटी एक महत्त्वाच मुद्दा म्हणजे ब्राझीलीयन फुटबॉल महासंघ किंवा आपल्या एजंटमार्फत नेमारने हा खुलासा केलेला नाही. एका प्रायोजन कंपनीने त्यासाठी पुढाकार घेणेच बोलके ठरते. अन् त्यातील नेमारचे तोल-मोल-के-बोल सारवासारवीचाच प्रकार दर्शवितात.

नेमार आता मैदानावर पडेल कामगिरी झाली तरी चालेल, पण पडण्यापूर्वी विचार करेल किंवा त्याने तसा करो इतकीच माफक अपेक्षा सध्या बाळगूयात.

गुगल सर्चचा संदर्भ

गुगलवर नेमार फॉल असा सर्च दिल्यानंतर मेमे, व्हीडीओ, पिक्चर, जीआयएफ असे ऑप्शन्स अवतरतात. याचा अर्थ नेमारच्या कामगिरीपेक्षा त्याच्या पडण्यावर जास्त क्लिक झाले आणि पर्यायाने जास्त हिट्स मिळाल्या हे स्पष्ट होते.

संबंधित बातम्या