Asia Cup 2018 : फिनिशर धोनी अजूनही शोधतोय संघात स्वत:ची जागा

वृत्तसंस्था
Monday, 17 September 2018

सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु असलेलली आशिया करंडक स्पर्धा जशी तरुण खेळाडूंसाठी महत्त्वाची असणार आहे तशीच ती भारतीय संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू असणाऱ्या भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसाठीही महत्त्वाची असणार आहे. 

दुबई : सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु असलेलली आशिया करंडक स्पर्धा जशी तरुण खेळाडूंसाठी महत्त्वाची असणार आहे तशीच ती भारतीय संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू असणाऱ्या भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसाठीही महत्त्वाची असणार आहे. 

धोनीने जानेवारी 2017 मध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले. कर्णधारपदाच्या दडपणातून मुक्त झाल्यामुळे त्याने मोकळेपणाने खेळावे अशी सर्वांची इच्छा होती आणि झालेही तसेच, इंग्लंडचा संघ भारतीय दौऱ्यावर असताना कटकच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीने 122 चेंडूंमध्ये 134 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि सहा षटकारांची बरसात केली होती. त्याच्या या खेळीमुळे भारतीय क्रिकेटला पूर्वीचा धोनी पुन्हा गवसल्याचा आनंद झाला होता. 

क्रिकेट जगताला 'हेलिकॉप्टर शॉट' ची ओळख धोनीने करुन दिली. सध्या फलंदाजी करताना तो हा शॉट वरचेवर मारत नसला तरी त्याच्यातील फलंदाज कमी पडू लागला असे म्हणता येणार नाही. यंदाच्या 'आयपीएल'मध्ये त्याने 16 सामन्यांमध्ये 150हून जास्त सरासरीने 455 धावा केल्या आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला फलंदाजीत म्हणावे असे यश मिळालेले नाही. या वर्षाच्या सुरवातीला झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात धोनीने फक्त एकाच एकदिवसीय सामन्यात 42 धावांची खेळी केली होती. इंग्लंड दौऱ्यातही त्याला फलंदाजीत यश मिळालेले नाही. 

धोनीने भारतीय संघाच्या विजयात शेवटची निर्णायक कामगिरी गेल्या वर्षी चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली होती. भारतीय संघ 87/5 अशा बिकट परिस्थितीत असताना त्याने हार्दिक पंड्यासह 118 चेंडूंमध्ये 79 धावांची भागीदारी रचली होती. 

गेल्या साधारणात: 10 महिन्यांत धोनीने 21 एकदिवसीय सामन्यांमध्ये अवघ्या 389 धावा केल्या आहेत. त्यामुळेच आशिया करंडक स्पर्धा धोनीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. धोनी भारतीय संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू असून त्याला कोणालाही काहीही सिद्ध करण्याची गरज नसली तरी आशिया करंडकातील त्याची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. त्याने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली तर संघातील त्याच्या जागेवर सतत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना परस्पर उत्तर मिळेल. 
 
गेल्या काही वर्षांपासून धोनी फलंदाजीत कमी पडत असला तरी भारतीय संघासाठी त्याचे स्थान याही पलीकडचे आहे. यष्टींमागे धोनीच्या समयसूचकतेला अजूनही पर्याय नसून विराट कोहलीच्या अनुपस्थितीत तो भारतीय संघाचा आधारस्तंभ आहे हे नक्की. 

स्वत:च्या फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी त्याने सरावा दरम्यान फलंदाजीचा कसून सराव केला. रोहित शर्मानेदेखील त्याला आदर दाखवत फक्त शेवटचे दोन चेंडू खेळण्याचा आदेश दिला. धोनीनेसुद्धा कर्णधाराचे ऐकत अखेरचे दोन चेंडू खेळून बराच वेळ सुरु असलेला फलंदाजीचा सराव थांबवला.           


​ ​

संबंधित बातम्या