धोनी क्रिजमध्ये पोहचला नाही तो नाहीच!

सुशांत जाधव
Saturday, 15 August 2020

बीसीसीआयने यंदाच्या वर्षात धोनीला करारबद्ध केले नव्हते; खरं तर हाच त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला ब्रेक लागल्याचा ठळक संकेत होता. पण... 

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर सुमडीत रिटायर होण्याची वेळ येऊ नये, अशीच भावना धोनीच्या तमाम चाहत्याप्रमाणे माझीही होती. धोनीच्या पुनरागमनाची चर्चा रंगायची तेव्हा मी मौन बाळगण पसंत करायचो. स्वत: धोनी काहीच प्रतिक्रिया देत नसल्यामुळे मनात संभ्रम होता. बीसीसीआयच्या करारानंतर धोनीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द संपली याची खात्री झाली. पण आयपीएलमधील फटकेबाजीनं तो पुन्हा मैदानात उतरण्याची चर्चा सुरु असताना धोनीने धक्कादायक निर्णय घेतला. 2019 मध्ये इंग्लंडच्या मैदानात रंगलेल्या विश्वचषकापूर्वीपासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली होती. विश्वचषकानंतर तो निवृत्ती घेणार असे बोलले गेले. पण विश्वचषक संपता संपता चर्चा रंगली ते त्याच्या धावबाद होण्याची. न्यूझीलंड विरुद्धच्या सेमीफायनलमधील सामन्यात धोनी धावबाद झाला नसता तर आम्ही मॅच काढली असती, असा विचार क्रिकेट चाहत्यांच्या मनात मॅच संपल्यावरही आला होता आजही येतो आणि उद्याही येत राहिल. 

VIDEO - धोनीचे चाहते हा क्षण कधीच विसरणार नाहीत

....पण धोनीची त्या वनडेमधील ती अधूरी धाव शेवटची ठरेल, असा विचार कदापि कोणाच्या डोक्यात आला नसेल. तमाम क्रिकेट चाहत्यांच्या स्वप्नाचा भ्रमनिरास करणारी ती धावच धोनीची अखेरची ठरेल, अशी परिस्थिती अखेर खरी ठरली.  धोनीने तब्बल सहा महिन्यांनंतर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धावबाद झाल्याची खंत उघडपणे बोलून दाखवली. मात्र, क्रिकेटच्या मैदानात उतरणार की नाही याबाबतची मनातील घालमेल त्याने सोयीस्करित्या अनुत्तरित ठेवली होती. दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनी कसोटीनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेईल आणि टी-20 सामने खेळत राहिल, अशी प्रतिक्रिया देत आगामी विश्वचषकात धोनीसाठी दरवाजे खुले आहेत, याचे संकेत दिले. पण धोनीन या सर्वांना खोटे ठरवले. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर टी-20 त पुनरागमन करणे धोनीसाठी अवघड नाही, या विचाराने चाहत्यांनाही थोडा दिलासा मिळालाही होता. त्यात कोरोना आला अन् धोनीच्या पुनरागमनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. बीसीसीआयने यंदाच्या वर्षातील करारातून धोनीला बाहेर ठेवत  धोनीचे कारकिर्द संपल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. तांत्रिक बाबींचा दाखला देत धोनीचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दी काहीकाळ त्यांनी व्हेंटिलिटरवर ठेवली. हा बीसीसीआय आणि धोनी या दोघांनी मिळून खेळलेला डाव होता का? असा प्रश्न कधीही न सुटणारा असाच आहे. 

हे वाचा - Big Breaking:धोनीची निवृत्तीची घोषणा

धोनीचा वारसदार असलेल्या  ऋषभ पंत म्हणावी तशी कामगिरी करताना दिसला नाही. पण तो दुखापतग्रस्त झाल्यानंतर लोकेश राहुलने यष्टीमागची जबाबदारी पेलल्याचे पाहायला मिळाले. संजू सॅमसनसारखी दुसरी मंडळीही या लाईनीत उभी होती. त्यामळे  मध्यंतरी राहुल द्रविडनं जी भूमिका बराचकाळ निभावली तसा प्रयोग करुन पंत-लोकेश राहुल यांच्यात मेळ घालण्याचा प्रकार बीसीसीआयकडून सुरु झाला. धोनी भारी होता आहे अन् राहिल. पण तो आंतरराष्ट्रीय पुनरागमन करणार नाही हे फिक्स होते. धोनीने आज ते स्पष्ट केले एवढेच.  धोनीसारख्या महान खेळाडूने मैदानातूनच निवृत्ती घ्यावी, असे वाटत असले तरी त्याला तसे वाटले नाही. त्याच्या नेतृत्वाखाली राहुल द्रविड, व्हीव्हीसी लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, 2011 च्या विश्वचषकात 97 धावांची खेळी करुन जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा गौतम गंभीर यांना  सचिनसारखा निरोप बीसीसीआयला देता आला नाही. धोनीही आता या पक्तींत सामील झालाय.  


​ ​

संबंधित बातम्या