'मेड बाय धोनी फिटनेस फॉर्म्युल्यात स्वत:ही फिट झाला'

सुशांत जाधव
Monday, 17 August 2020

त्यानं किती ट्रॉफ्या जिंकून दिल्या त्यापेक्षा सर्वांत मोठी गोष्ट जाणवली ती म्हणजे तंत्रशुद्ध खेळीचा थांगपत्ता नसतानाही त्याने गाठलेलं शिखर.

महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीनंतर (Mahendra Singh Dhoni Retire) अनेक क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला, अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरुय. धोनीच्या खांद्यावर भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा येण्यापूर्वी सचिन, सेहवाग, द्रविड आणि गांगुली यासारख्या दिग्गजांबद्दलही क्रिकेट चाहत्यांमध्ये इतकीच आपूलकीची भावना होती. मास्टर ब्लास्टर सचिनला तर, आपल्याकडे क्रिकेटचा देव अशी उपमा मिळाली. सचिनच्या शतकासाठी नव्वदीच्या दशकात क्रिकेट धर्म मानणाऱ्या एखाद्याने देव पाण्यात ठेवण्याचा प्रकारही केला असेल, असे म्हटले तरी ती अतिशोक्ती ठरणार नाही. (ठाम दावा करत नाही) सांगण्याचा मुद्दा एवढाच की, इंग्रजांच्या खेळाला आमच्याकडे जी प्रसिद्धी मिळाली तेवढी कदाचित त्या इंग्रजांच्या प्रांतातही नसेल.  क्रिकेटचे मैदान गाजवलेल्या खेळाडूला आपल्याकडे खूप मान मिळालाय. खरं तर याच श्रेय खेळाडूला द्यावं की, क्रिकेटला धर्म मानून खेळाडूंची पूजा करणाऱ्या त्याच्या चाहत्याला हा एक वेगळा अभ्यासाचा भाग. पण, हे यज्ञ आहोरात्र बदलत जाणार असेच चित्र सध्याच्या घडीला दिसते. सचिन थांबला म्हणून क्रिकेट थांबले नाही. तसेच ते धोनी थांबल्यावरही थांबणार नाही. पण, त्याच्या फिनिशिंग टचची आठवण नेहमी सतावत राहील. 

धोनी जैसा कोई नही

ब्लू जर्सीत धोनीनं खूप काही मिळवलंय... आयसीसीच्या मिनी वर्ल्ड कपसह टी-20 आणि वनडेत त्याने विश्वविक्रमी कामगिरी नोंदवली. यष्टीमागे कमालीची चपळाई आणि मैदानातील कूल नेतृत्वाची झलक ही आपण सगळ्यांनी पाहिलीय. त्याच्यात एक वेगळी खासियत होती. त्यामुळेच त्यानं हे सर्व काही सहज मिळवलं. त्यानं किती ट्रॉफ्या जिंकून दिल्या त्यापेक्षा सर्वांत मोठी गोष्ट जाणवली ती म्हणजे तंत्रशुद्ध खेळीचा थांगपत्ता नसतानाही त्याने गाठलेलं शिखर. ज्याच्या भात्यात  स्ट्रेट ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह, पॅडल स्वीप, पूल या सारख्या फटके असतात त्याला तंत्रशुद्ध क्रिकेटर मानतात. धोनीकडे यातील एकही फटका नव्हता. ताकदीच्या जोरावर यॉर्कर टाइप चेंडूंला षटकारामध्ये बदलण्याचा नवा शोध त्याने लावला. धोनीचा हा फटका आपण हेलिकॉप्टर शॉट म्हणून ओळखतो. यातून त्याने क्रिकेटबूकच्या पलिकडे काहीतरी आहे. यासाठी फक्त तुमच्याकडे क्षमता असू शकते हेच दाखवून दिले. तंत्रशुद्ध खेळीनं त्याची इनिंग आणखी वाढली असती हे निश्चित. आता त्यावार चर्चा बिनकामाचीच. संघाची नेतृत्व ही मोठी जबाबदारी असतेच. पण, तुमच्या संघात सिनियर खेळाडू असताना त्यांचे नेतृत्व करणे मोठी कसोटी ठरते. यात त्यानं बाजी मारली. भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली, बराच काळ संघाचे नेतृत्व लिलया पेललेला राहुल द्रविड, नेतृत्वाच्या जबाबदारीपासून दूर राहत दोन दशकांहून अधिक काळ क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलेल्या सचिन तेंडुलकर ही मंडळी धोनीच्या नेतृत्वाखाली खेळली. सेहवाग, गंभीर, व्ही. व्ही. व्ही. एस लक्ष्मण यासारख्या दिग्गजांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा प्रवास धोनीच्या नेतृत्वाखाली थांबला. 

तो शांत... बाकीचे खल्लास

भारतीय संघाची बांधणी करण्याच श्रेय हे सौरव गांगुली यांचेच. 2007 मध्ये धोनीला एक तयार टीम मिळाली. मग, संघाच्या यशात नेतृत्वाचा चमत्कार मानायचा का? धोनीत वेगळेपण नेमक काय होत? असा प्रश्न पडू शकतो. गांगुली यांना जसे संघ बाधणीचा शिल्पकार मानले जाते तसेच धोनीनं इंडियन क्रिकेटमध्ये एक फॉर्म्युला सेट केला.  तो फॉर्म्युला होता 'न्यू टॅलेंट, रिप्लेस ओल्ड'. विजयासाठी मोठी नावे आणि त्यांच्या नावे असणारी आकडेवारी नाही तर, मैदानातील स्फुर्ती महत्त्वाची आहे, असा धोनीचा फंडा होता. त्यामुळेच कर्णधार पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर धोनीने सिनियर खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थितीत केले.  2008 मध्ये सीबी सिरीजमध्ये सचिन तेंडुलकरच्या खेळीवरही धोनीनं प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले होते. संघातील वरिष्ठ खेळाडूंनी आपली जबाबदारी चोख पाडायला पाहिजे. त्यांनी नावाला साजेसा खेळ करणे अपेक्षित आहे, अशा शब्दांत त्याने प्रतिक्रिया दिली. त्यानंतर सचिन पुन्हा बहरातही आला होता. गांगुली-राहुल आणि सेहवाग-गंभीर यांच्या क्षेत्ररक्षणासंदर्भातील त्याने ठाम भूमिका मांडली होती. वरिष्ठ खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जाहिन आहे. असे त्याचे मत नव्हते. पण,  अनुभवी लोकांकडून क्षेत्ररक्षणात खर्च होणाऱ्या धावा सामन्याच्या निकाल ठरवण्यात कारणीभूत ठरतात, असे त्याचे मत होते. क्षेत्ररक्षणात 20-30 धावा वाचवून आपण सामन्याचे चित्र बदलू शकतो हा त्याचा जणू मंत्रच होता. त्यामुळेच त्याने गंभीर-सेहवागच्या क्षेत्ररक्षणावरही आक्षेप घेतल्याचे पाहायला मिळाले. एकदा तर त्याने गंभीर सचिनपेक्षा यंग असून, डीम असल्याचे वक्तव्य केले होते. धोनीच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघ जेव्हा-जेव्हा पराभूत झालाय. त्या वेळी धोनीच्या तोंडून 20-30 धावामुळे पराभव स्वीकारावा लागला, असे अनेकदा ऐकायला मिळाले. 

एम एस धोनीच्या निवृत्तीनंतर सीएसकेने शेअर केला भावनिक व्हिडिओ

'मेड बायधोनी फिटनेस फॉर्म्युल्यात' स्वत:ही फिट झाला 

मैदानातील कामगिरी खालावल्यानंतर जुन्या आकडेवारीच्या जोरावर एखाद्या खेळाडूला संघात खेळवणे धोनीला मान्य नव्हते. हे धोरण धोनीने आपल्या नेतृत्वात अवलंबले. त्याचाच उल्लेख 'मेड बाय धोनी  फॉर्म्युला असा करावा वाटतो. या फार्म्युल्यामुळे अनेक दिग्गजांना निवृत्ती घेण्यास भाग पाडले. सेहवाग, गंभीर, गांगुली, लक्ष्मण यांच्यासह तेंडुलकरही 200 कसोटी खेळून थांबला. सचिन तेंडुलकर सोडले तर द्रविड-लक्ष्मण-गंभीर यांना म्हणावा तसा फेअरवेल मिळाला नाही. यात थेट धोनीचा संबंध नसला तरी कर्णधार आणि खेळाडू यांच्या संबंधावर या गोष्टी अवलंबून असतात. धोनीच्या नेतृत्वाखाली हे दिग्गज दुखावले गेले. दिग्गजांना खाली बसण्यास भाग पाडलेल्या टप्प्यावर आल्यावर धोनीनंही थांबणे पसंत केलं. त्याच्या या निर्णयाने चाहते नक्की दुखावले असतील. तरीही, कोणताही गाजावाज आणि फेअरवेल मॅच न खेळता आंतरराष्ट्रीय कारकिर्द थांबवून त्याने दिग्गजांच्या नाराजीवरही पूर्णविराम लावलाय. ही फिनिशिंग स्टाइलही त्याच्याशिवाय अन्य कोणाला जमणार नाही.


​ ​

संबंधित बातम्या