धोनीच्या निवृत्तीत 7.29 PM मागचं गुपित काय? 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 August 2020

धोनीच्या 1929 या आकड्यामागचं गुपीत काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यानं 7.29 वाजल्यानंतर मला निवृत्त समजा असा उल्लेख धोनीने त्याच्या पोस्टमध्ये केला आहे.

नवी दिल्ली - भारताला आयसीसीचे तीनही चषक जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं सायंकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी निवृत्तीची घोषणा केली. गेल्या वर्षभरापासून धोनी क्रिकेट खेळलेला नाही. त्याच्या निवृत्तीच्या चर्चा अनेकदा रंगल्या मात्र त्यावर आतापर्यंत धोनीनं एकदाही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर धोनीनंच या चर्चांना पूर्ण विराम देत इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून निवृत्ती जाहीर केली. 

धोनीने आतापर्यंत जे काही निर्णय घेतले ते असेच अचानक घेतले होते. त्यामध्ये कसोटी क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती असेल किंवा विराट कोहलीकडं सोपवलेलं कर्णधारपद असेल. त्यामुळे निवृत्तीही धोनी अचानक घेणार हे निश्चित होतं. कोणताही गाजावाजा न करता धोनीने एका पोस्टमधून निवृत्ती घेतल्याचं सांगितलं.

धोनीच्या 1929 या आकड्यामागचं गुपीत काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यानं 7.29 वाजल्यानंतर मला निवृत्त समजा असा उल्लेख धोनीने त्याच्या पोस्टमध्ये केला आहे. अनेकांनी आपआपल्या परीने याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. धोनीने अखेरचा सामना 9 आणि 10 जुलै 2019 ला खेळला होता. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने दोन दिवस चालला होता. 10 जुलैला या सामन्याचा निकाल लागला. तो सामना संपला ती वेळ सायंकाळी 7.29 ही होती. त्यामुळे धोनी तेव्हाच मनाने निवृत्त झाला होता आणि आता निरोपाची औपचारिकता पूर्ण करताना त्याने हीच वेळ निवडली असे म्हटले जात आहे. 

 

धोनीने आजच्याच दिवशी निवृत्ती घेण्याची अनेक कारणे सांगितली जात आहे. धोनीने वर्ल्ड कपनंतर लष्करात खास प्रशिक्षण घेतलं होतं. त्याला सैन्याबद्दल असलेली विशेष ओढ यामागे कारण असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच आज माध्यमांना सुट्टी असल्याने उद्या वृत्तपत्रे प्रसारीत होत नाहीत. यामुळेच प्रसिद्धीपासून दूर राहण्यासाठी त्यानं ही तारीख निवडली अशीही चर्चा होत आहे. 

हे वाचा - Dhoni Retire : गंभीर म्हणाला, 'तू फुल स्टॉप दिलास'; विराट म्हणतो...

आयसीसीच्या सर्व प्रकारांमधील विजेतेपदं मिळवून देणारा जगातील एकमेव कर्णधार असलेल्या भारताच्या या खेळाडूने आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दही चांगलीच गाजवली आहे. धोनीने अनेक विक्रमांची नोंद केली आहे. २००७ मध्ये टी-२० संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवत पहिला टी-२० विश्वचषक जिंकला. त्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधारपदही त्याने आपल्या हटक्या स्टाईलनेच भूषविले. 


​ ​

संबंधित बातम्या