संघात राहण्यासाठी धोनीने स्वत:ला सिद्ध करावे : गांगुली

वृत्तसंस्था
Saturday, 22 September 2018

भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने आता धोनीला त्याच्या फलंदाजीतील क्षमता सिद्ध करावी लागणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. 

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे सुरु असलेल्या आशिया करंडकात भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीला फलंदाजी करण्यात पुन्हा अडचण येत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळेच भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने आता धोनीला त्याच्या फलंदाजीतील क्षमता सिद्ध करावी लागणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. 

''आशिया करंडक स्पर्धा धोनीसाठी महत्त्वाची असणार आहे. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि त्याने याआधी खूप धावा केल्या आहेत. मात्र, पूर्वी केलेल्या कामगिरीसाठी त्याचे संघातील स्थान कायम ठेवणे योग्य नाही. प्रत्येक खेळाडूला एका मर्यादेपर्यंतच संधी दिल्या जातात. रिषभ पंतला संघात संधी न दिल्याचे मला आश्चर्य वाटते,'' असे मत गांगुलीने व्यक्त केले. 

जानेवारी 2017मध्ये धोनीने कर्णधारपदाच्या जबाबदारीतून स्वत:ची मुक्तता करुन घेतली. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मात्र, असे असले तरी धोनीच्या फलंदाजीवर सतत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. इंग्लंड दौऱ्यात लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला 86 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात धोनीने केलेल्या 59 चेंडूंमधील 37 धावांच्या खेळीवर सर्व स्तरातून टिका झाली होती. 

आशिया करंडकातील हाँगकाँगविरुद्धच्या पहिल्या सामन्यात धोनी अवघे तीन चेंडू खेळून शून्यावर बाद झाला होता तर, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. फलंदाजी करण्यात येत असलेल्या सततच्या अपयशामुळे धोनीच्या संघातील स्थानावर आता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. 

आशिया करंडकात त्याला चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे कारण त्याची जागा घेण्यासाठी भारताकडे खेळाडूंचे पर्याय आहेत. रिषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याने तो आता एकदिवसीय संघाचे दार ठोठावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संबंधित बातम्या