VIDEO - धोनीचे चाहते हा क्षण कधीच विसरणार नाहीत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 August 2020

धोनीने त्याचा शेवटचा सामना 9 जुलै 2019 ला न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. 38 वर्षीय धोनी गेल्या वर्षी वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलला बाद झाल्यानंतर भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या होत्या.

नवी दिल्ली - कॅप्टन कूल धोनीने पुन्हा एकदा सर्वांना अचानक धक्का देत निवृत्ती जाहीर केली. धोनीने एका इन्स्टाग्राम पोस्टमधून आपण निवृत्ती घेतल्याचं सांगितलं. शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास त्याने पोस्ट करून निवृत्ती जाहीर केली. त्यासोबत धोनीने चाहत्यांचे आभार मानले असून एक व्हिडिओ शेअर केला आहे. धोनीने त्याचा शेवटचा सामना 9 जुलै 2019 ला न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. 38 वर्षीय धोनी गेल्या वर्षी वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलला बाद झाल्यानंतर भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या होत्या. त्यानंतर धोनीचे चाहते तो पुन्हा मैदानात कधी उतरणार याची आतुरतेनं वाट बघत होते. 

आयसीसी वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताला 240 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 221 धावांत गुंडाळला होता. भारताची आघाडीची फळी तंबूत परतली असताना धोनीने रविंद्र जडेजाला साथीला घेत डाव सावरला होता. धोनी आणि जडेजा यांनी 116 धावांची भागिदारी करून विजय दृष्टीपथात आणला असतानाच 48 व्या षटकात जडेजा बाद झाला. तेव्हा भारताला 13 चेंडूत 32 धावांची गरज होती.

धोनीने 49 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून आशा निर्माण केल्या. पुढचा चेंडू फर्ग्युसनने निर्धाव टाकला. तिसऱा चेंडू धोनीने फटकावला आणि दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या धोनीला मार्टिन गुप्टिलने अचूक फेकीवर धावबाद केलं आणि तिथंच धोनीने आंतरराष्ट्रीय मैदान सोडलं. धोनीने अखेरच्या सामन्यात 72 चेंडूत 50 धावा केल्या. यामध्ये एका चौकाराचा आणि एका षटकाराचा समावेश होता. 

हे वाचा - Big Breaking:धोनीची निवृत्तीची घोषणा

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धोनी बाद झाल्यानंतर अनेकांनी तो आता पुन्हा परतणार नाही असं म्हटलं होतं. त्यावर धोनीने निवृत्ती घेईपर्यंत मौन बाळगलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टी20 वर्ल्ड कप पुढे ढकलल्यानंतर धोनीने हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसणार नसला तरी तो आयपीएल खेळणार आहे. यंदा युएईमध्ये होत असलेल्या आयपीएलसाठी तो रवाना झाला आहे. 


​ ​

संबंधित बातम्या