धोनीच्या मनातलं आशिष नेहराने आधीच ओळखलं होतं
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर करून चाहत्यांसह क्रिकेटविश्वाला मोठा धक्का दिला आहे.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आशिष नेहराने दोन आठवड्यांपूर्वी केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. नेहराने धोनीच्या मनातलं ओळखलं होतं असं म्हटलं जात आहे. भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज आशिष नेहराने महेंद्रसिंह धोनीसंदर्भात मोठे विधान केले होते. एम एस धोनीने भारताकडून आपला अखेरचा सामना खेळून झाला आहे, अशी प्रतिक्रिया नेहराने दिली होती. मी धोनीला ओळखतो. तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरेल, असे वाटत नाही, असे नेहराने म्हटले आहे. स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड या कार्यक्रमात आशिष नेहराला धोनीच्या पुनरागमनाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. आयपीएलच्या हंगामातील कामगिरीच्या जोरावर धोनी राष्ट्रीय संघात पुन्हा दिसू शकेल का? या प्रश्नावर नेहराने थेट नकारात्मक उत्तर दिले होते.
VIDEO - धोनीचे चाहते हा क्षण कधीच विसरणार नाहीत
आयपीएलच्या हंगामातील कामगिरीचा धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर काही बदल होणार नाही. धोनीने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे, अशी प्रतिक्रिया नेहराने दिली होती. आयपीएलनंतर धोनी आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी उपलब्ध झाल्यास या प्रकारातून पुनरागमन करणारा तो पहिला खेळाडू असेल. धोनीची खेळण्याची इच्छा असेल तर कोणताही कर्णधार, प्रशिक्षक त्याची निवड सहज करेल. पण धोनीसारख्या उच्च दर्जाच्या खेळाडूची निवड आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर कदापी योग्य वाटणार नाही, असे नेहराने म्हटले.
Breaking:धोनीसोबत सुरेश रैनाचीही निवृत्तीची घोषणा
धोनीने आपल्यातील क्षमता सिद्ध केली आहे. त्याला आता काही करुन दाखवण्याची गरज नाही. धोनीने निवृतीची घोषणा केलेली नसली तरी तो आंतरराष्ट्रीय मैदानात पुन्हा येईल असे वाटत नसल्याचे मत आशिष नेहराने व्यक्त केले होते. त्याचे हे मत आता खरे ठरले आहे. इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषक सामन्यातील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धोनीने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. या सामन्यात धोनी धावबाद झाल्यानंतर भारतीय संघाचे विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न अधूरे राहिले होते. ही अधूरी राहिलेली धाव धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटची असणार का? यावर अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम दिला.