मॉड्रीच नामक मॅजिशियनचा बोलबाला 

मुकुंद पोतदार
Friday, 31 August 2018

क्रोएशियाचा मध्यरक्षक ल्युका मॉड्रीच याने फुटबॉल जगतामधील एक प्रतिष्ठेचा किताब पटकावला आहे. रशियातील विश्वकरंडक स्पर्धेत क्रोएशियाला अंतिम फेरी गाठून दिलेल्या मॉड्रीच याला युएफाचा (UEFA-Union of European Football Associations) मोसमातील सर्वोत्तम खेळाडू (Player of the Year) हा किताब मिळाला.

क्रोएशियाचा मध्यरक्षक ल्युका मॉड्रीच याने फुटबॉल जगतामधील एक प्रतिष्ठेचा किताब पटकावला आहे. रशियातील विश्वकरंडक स्पर्धेत क्रोएशियाला अंतिम फेरी गाठून दिलेल्या मॉड्रीच याला युएफाचा (UEFA-Union of European Football Associations) मोसमातील सर्वोत्तम खेळाडू (Player of the Year) हा किताब मिळाला. विश्वकरंडक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा गोल्डन बॉल हा बहुमान त्याला यापूर्वीच मिळाला होता. युएफा किताबासाठी त्याच्यासमोर रेयाल माद्रिदमधील पूर्वाश्रमीचा सहकारी ख्रिस्तीयानो रोनाल्डो या सुपरस्टारचे आव्हान होते. याशिवाय लिव्हरपूलचा मोहंमद सलाह हा सुद्धा शर्यतीत होता. 
मागील मोसमात रेयाल माद्रिदने चॅंपियन्स लीग सलग तिसऱ्यांदा जिंकून हॅट्ट्रिकचा पराक्रम केला. यात रोनाल्डोने 44 सामन्यांत 44 गोलांसह सिंहाचा वाटा उचलला. त्याने यापूर्वी तीन वेळा हा किताब मिळविला आहे. इजिप्तचा सलाह गत मोसमात लिव्हरपूलशी करारबद्ध झाला. त्याने ऍनफिल्डवर (लिव्हरपूल फुटबॉल क्‍लबचे होम ग्राउंड) सनसनाटी पदार्पण केले. त्याने सर्व स्पर्धांत मिळून 44 गोल केले. लिव्हरपूलने प्रिमियर लिगमध्ये चौथे, तर चॅंपियन्स लिगमध्ये दुसरे स्थान मिळविले. रेयाल माद्रिदकडून पराभव झाल्याने त्यांना चॅंपियन्स लीग जिंकता आली नाही. 

कशी असते निवड पद्धत 
या किताबासाठी खेळाडूचा देश कोणताही असला तरी त्याने राष्ट्रीय संघासाठी नव्हे तर क्‍लबसाठी केलेली कामगिरी विचारात घेतली जाते. युएफाच्या सदस्य संघटनांच्या कार्यकक्षेतील क्‍लबकडून त्याने खेळले असले पाहिजे. मागील मोसमातील स्थानिक, खंडीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्व स्पर्धांतील कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. 

निवड समितीचे स्वरूप 
निवड समितीमध्ये गत मोसमात चॅंपियन्स लीग आणि युरोपा लिगमध्ये सहभागी झालेल्या क्‍लबचे 80 प्रशिक्षक असतात. याशिवाय युएफाच्या 55 सदस्य संघटनांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एक असे 55 पत्रकार असतात. ही मंडळी पहिल्या तीन पसंतीचे खेळाडू निवडतात. पहिल्या पसंतीला पाच, दुसऱ्यास तीन आणि तिसऱ्यास एक असे गुण दिले जातात. प्रशिक्षक आपल्या संघातील खेळाडूची निवड करू शकत नाहीत इतकीच मर्यादा असते. या पद्धतीनुसार मॉड्रीचला सर्वाधिक 313 गुण मिळाले. रोनाल्डोला 223, तर सलाहला 134 गुण मिळाले. या मुख्य किताबाशिवाय इतरही पुरस्कार दिले जातात. त्यात सर्वोत्तम मध्यरक्षक म्हणून मॉड्रीचला, तर सर्वोत्तम स्ट्रायकर म्हणून रोनाल्डोला पसंती मिळाली. मुख्य किताबासाठी मात्र मॉड्रीचने रोनाल्डोला मागे टाकले. 

सांघिक खेळ आणि वैयक्तिक स्टार 
सांघिक खेळांमध्ये वैयक्तिक स्टार निवडताना प्रकाशझोतातील खेळाडूच आघाडीवर असतात. क्रिकेट हा जसा फलंदाजांचे आधिपत्य असलेला खेळ आहे, तसेच फुटबॉलमध्येही बोलबाला असतो तो स्ट्रायकर्सचा. क्रिकेटमधील गोलंदाज अन्‌ फुटबॉलमधील मध्यरक्षक-बचावपटू हे जणू काही पार्श्वगायकासारखे असतात. त्यातही क्रिकेटमधील यष्टिरक्षक अन्‌ फुटबॉलमधील गोलरक्षक यांच्याबाबतीत थॅंकलेस जॉब असे विशेषण लावले जाते. याच कारण ही मंडळी चुका करतात तेव्हा सडकून टीका होते. चपळाईने झेल घेतला किंवा गोल अडवला तर त्याचे कौतुक होईलच असे नाही, उलट ही तर त्यांची ड्यूटीच मानली जाते. 

रोनाल्डोच्या एजंटचे टीकास्त्र 
या पार्श्वभूमीवर स्ट्रायकर्सचा-स्ट्रोकप्लेयर्सचा जणू काही अशा किताबांवर हक्कच असतो असा एक मतप्रवाह असतो आणि तो तीव्र असतो. रोनाल्डोला पुरस्कार मिळाला नाही म्हटल्यावर त्याचे एजंट जोर्गे मेंडेस याने टीकास्त्र सोडले. मॉड्रीचची निवड हास्यास्पद असल्याची टीका त्यांनी केली. 

छोट्या देशाचा संदर्भ                                                                                  असो, आता हा ऊहापोह झाल्यानंतर आपण आजच्या सत्कारमुर्तींकडे वळण्याची वेळ आली आहे. मॉड्रीचला युरोपातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा किताब मिळाला असला तरी त्याची वाटचाल तेवढी सोपी नाही. तो काही इंग्लंड, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, इटली अशा फुटबॉलमधील युरोपीय महासत्तांचे प्रतिनिधित्व करीत नाही. तो क्रोएशियासारख्या छोट्या देशाचा आहे. युरोपमध्ये आपला ठसा उमटविण्याआधी आणि त्यापूर्वी तेथे चंचुप्रवेश करण्यासाठी त्याला अनेक अडथळ्यांवर मात करावी लागली. 

स्वातंत्र्य लढ्यात कुटुंबीय सहभागी हे जाणून घेण्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जावे लागेल. मॉड्रीचचा जन्म नऊ सप्टेंबर 1985 रोजी झॅडारमध्ये झाला. त्याचे बालपण मॉड्रीची या लहान गावात गेले. त्यावेळी तत्कालीन युगोस्लाव्हिया गुंतागुंतीची राजकीय परिस्थिती आणि यादवीमुळे अस्थिरता होती. क्रोएशियाचा स्वातंत्र्यासाठी संग्राम सुरू होता. 1991 मध्ये हा लढा तीव्र झाला तेव्हा त्याचे ल्युकाचे वडील लष्करात दाखल झाले. त्याचे आजोबा व इतर काही नातेवाइकांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे घर जाळण्यात आले. 

निर्वासित होण्याची वेळ 
या पार्श्वभूमीवर मॉड्रीच निर्वासित बनला. त्याचे कुटुंब सात वर्षे कोलोवॅरे हॉटेलात राहिले. तेव्हा झॅडार गावावर रोज बॉंबफेक व्हायची. अशा वातावरणात फुटबॉल हेच जीवनाचा लढा लढण्यासाठी प्रेरणा देणारे माध्यम होते. इतर निर्वासित मुलांबरोबर मॉड्रीच हॉटेलच्या पार्किंगमध्येच फुटबॉल खेळायचा. 

कारकिर्दीला प्रारंभ 
मॉड्रीचने एनके झॅडार क्‍लब युवा ऍकॅडमीत कारकीर्द सुरू केली. टॉमीस्लाव बॅसिच तेथे प्रमुख होते, तर डॉमागोज बॅसिच प्रशिक्षक होते. टॉमीस्लाव यांना तो "स्पोर्टिंग फादर' मानतो. तेव्हा उंची आणि वजन कमी असूनही त्याने कौशल्य व मेहनतीच्या जोरावर वाटचाल केली. इटलीतील युवा स्पर्धेतील कामगिरीमुळे त्याला डायनॅमो झाग्रेबमध्ये टॉमीस्लाव यांनी संधी मिळवून दिली. दहा वर्षांच्या करारातून मिळालेल्या रकमेतून मॉड्रीचने झॅडारमध्ये फ्लॅट घेतला. आता आपले कुटुंब निर्वासित नाही ही भावना त्याच्यासाठी विलक्षण आनंददायक ठरली. प्रभावी कामगिरीमुळे त्याला टॉटनहॅम हॉट्‌स्पर आणि नंतर रेयाल माद्रिद या मातब्बर क्‍लबकडून संधी मिळाली. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर मॉड्रीचने 2006 मध्ये पदार्पण केले. त्या वर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत तो खेळला. 2014च्या स्पर्धेतही तो सहभागी झाला होता, पण क्रोएशिया गटात गारद झाले. 

...आणि परमोच्च बिंदू 
रशियातील स्पर्धेत मॉड्रीचच्या कारकिर्दीचा उच्च बिंदू आला. नायजेरिया, अर्जेंटिनाविरुद्ध तो सामनावीर ठरला. डेन्मार्कविरुद्ध बाद फेरीत त्याने अतिरिक्त वेळेत पेनल्टी दवडली, पण शूटआऊटमध्ये त्याने चूक केली नाही. रशियाविरुद्धही तो सामनावीर ठरला. क्रोएशियाचे जगज्जेतेपदाचे स्वप्न भंगले तरी या स्पर्धेमुळे त्यांना संजीवनी मिळाली आहे. 
मॉड्रीच हा क्रोएशियाचा कणा आहे. फुटबॉलचे मूलभूत कौशल्य, डावपेचात्मक आखणी, अचूक अंमलबजावणी यांत तरबेज असल्यामुळे मिडफिल्ड माईस्त्रो (मध्य फळीचा मास्टर), मिडफील्ड मॅजिशियन असा लौकिक त्याने कमावला आहे. अशा या खेळाडूला युएफाचा बहुमान मिळणे हा त्याचा यथोचित सन्मानच ठरतो. 

मॉड्रीचची वैशिष्ट्ये 

- मध्य फळीतील खेळाडू. प्रामुख्याने सेंट्रल मिडफिल्डर 
- छोट्या चणीचा असूनही वेगवान खेळाला कल्पकतेची जोड 
- कल्पक चाली रचण्याचे कौशल्य (क्रिएटिव्ह प्लेमेकर) 
- धूर्त पासच्या जोरावर सामन्याचे पारडे फिरविण्याची दूरदृष्टी 
- लांब अंतरावरून भेदक पास देण्याचीही क्षमता 
 


​ ​

संबंधित बातम्या