निर्धारित वेळेत हरलो नाही हेच आपले नशीब

मीररंजन नेगी
Friday, 31 August 2018

भारतीय हॉकी संघाला मलेशियाविरुद्ध काय झाले तेच कळेनासे झाले आहे. पेनल्टी शूटआउटच्या सुरवातीस भारताचे नेतृत्व केलेला अनुभवी आक्रमक पंचांची मदत घेण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढाच अनुभवी एस. व्ही. सुनील सडन डेथवर मलेशिया गोलरक्षकास दोन प्रयत्नांत चकवू शकत नाही, काय होत होते.

भारतीय हॉकी संघाला मलेशियाविरुद्ध काय झाले तेच कळेनासे झाले आहे. पेनल्टी शूटआउटच्या सुरवातीस भारताचे नेतृत्व केलेला अनुभवी आक्रमक पंचांची मदत घेण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढाच अनुभवी एस. व्ही. सुनील सडन डेथवर मलेशिया गोलरक्षकास दोन प्रयत्नांत चकवू शकत नाही, काय होत होते. खरंच एकंदरीत खेळ पाहून आपण निर्धारित वेळेत पराजित झालो नाही, हे आपले सुदैवच म्हणायला हवे. पेनल्टी शूटआउटमध्ये श्रीजेशने तीन प्रयत्न रोखले आणि आपले आक्रमक गोलच्या संधी साधत नव्हते, श्रीजेशवरील दडपण वाढवत होते. नियोजनच चुकत गेल्यावर विजयही दुरावतो हेच खरे. 

एशियाडच्या हॉकीबाबत बोलताना मी मलेशियाचे मार्गदर्शक टेरी वॉल्श आणि पाकिस्तानचे रोएलॅंत ऑल्तमन्स यांना भारतीय हॉकीची पुरेपूर जाणीव आहे. वॉल्श हे तर केवळ मार्गदर्शकच नव्हे, तर हाय परफॉर्मन्स डायरेक्‍टरही राहिले होते. त्यांची भारतीय मध्यरक्षकांना रोखण्याची योजना चांगलीच यशस्वी ठरल्याचे दिसते, त्यात बचावही कमकुवत पडत गेला. 

भारतीय हॉकी जागतिक स्तरावर प्रगती करीत आहे. आशियातील भारताचे अव्वल स्थान अबाधित आहे, असेही वारंवार दिसले आहे, तरीही आपण गोलांचा धडाका करण्याऐवजी आघाडी राखण्यासाठी जास्त कसोशीने प्रयत्न करतो हे पाहून धक्का बसतो. अनेक प्रश्‍न अनुत्तरितच राहिले. आपण पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लीकद्वारे गोल करण्यात वाक्‌बगार आहोत, मग आपण सुरवातीच्या पेनल्टी कॉर्नरवर इनडायरेक्‍ट गोल करण्याचा प्रयत्न का केला. ड्रॅग फ्लीकद्वारे गोल करून भक्कम आघाडी घेता आली असती. तिसऱ्या सत्रात दोनदा आघाडी घेतली. कोणताही संघ आघाडी भक्कम करण्यासाठी अधिक आक्रमक होतो, आपण ती टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत, बचावावर भर द्यावा, हेही खटकणारेच होते.

महत्त्वाच्या उपांत्य लढतीत नवोदितांकडून चूक झाली, संयम गमावला तर एकवेळ समजू शकते, पण अखेरच्या सत्रात सरदार सिंग आणि सुरेंदर कुमार यांच्या अतिआक्रमकतेमुळे आपल्यावर एकवेळ नऊ खेळाडूंनीशी खेळण्याची वेळ आली. साखळीत गोलांचा पाऊणशतकी धडाका करणाऱ्या संघाकडून हे व्हावे. कायम नियंत्रित आक्रमकता दाखवलेल्या संघाकडून हे घडावे हे धक्कादायकच होते. हमखास वाटणार सुवर्णपदक आता पार दुरावले. महिला हॉकी संघच आता या जखमेवर काही प्रमाणात मलमपट्टी करू शकेल. 


​ ​

संबंधित बातम्या