मीराबाई चानूचे 'सोनेरी' पुनरागमन 

वृत्तसंस्था
Thursday, 7 February 2019

जगज्जेतेपदानंतर दुखापतीमुळे मीराबाईच्या कारकिर्दीवर परिणाम झाला होता. गेले सहा महिने तर ती पाठीच्या दुखापतीमुळे खेळापासून दूरच होती. अलीकडेच तिने सरावाला सुरवात केली होती. या सरावाच्या जोरावरच तिने थायलंड येथेली स्पर्धेत 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.

नवी दिल्ली : भारताची जगज्जेती वेटलफ्टिंग खेळाडू मीराबाई चानू हिने गुरुवारी थायलंड येथील "इगट' करंडक वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून यशस्वी पुनरागमन केले. 

जगज्जेतेपदानंतर दुखापतीमुळे मीराबाईच्या कारकिर्दीवर परिणाम झाला होता. गेले सहा महिने तर ती पाठीच्या दुखापतीमुळे खेळापासून दूरच होती. अलीकडेच तिने सरावाला सुरवात केली होती. या सरावाच्या जोरावरच तिने थायलंड येथेली स्पर्धेत 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. ऑलिंपिक स्पर्धेसाठी दुसऱ्या स्तरावरील पात्रतेची स्पर्धा असणाऱ्या या स्पर्धेत चानूने स्नॅच प्रकारात 82 आणि क्‍लिन-जर्कमध्ये 110 किलो असे एकूण 192 किलो वजन उचलून हे यश मिळविले. या यशामुळे मीराबाईला मिळालेले मानांकन गुण टोकियो ऑलिंपिकसाठी पात्रता ठरविताना उपयोगी पडतील. 

या वजन प्रकारात जपानची मियाके हिरोमी (183 किलो) आणि पापुआ न्यु गिनीची लोआ डिका तौआ (179 किलो) अनुक्रमे रौप्य आणि ब्रॉंझपदकाच्या मानकरी ठरल्या. चानूला सुवर्णपदक मिळाले असले, तरी ती स्वतः या कामगिरीवर समाधानी नाही. ती म्हणाली, ""दुखापतीनंतर पहिल्या स्पर्धेत हे यश मिळाले इतकेच या कामगिरीचे समाधान आहे. ही माझी सर्वोत्तम कामगिरी नक्कीच नाही. त्यामुळे मला अजून मेहनत घ्यावी लागणार आहे. माझ्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा मी चार किलो कमी वजन उचलले आहे.'' 

पाठीच्या दुखापतीमुळे मीराबाईला गेल्या वर्षी जागतिक स्पर्धेला मुकावे लागले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेतूनही तिला माघार घ्यावी लागली होती. मीराबाई म्हणाली, ""मी आता शंभर टक्के तंदुरुस्त आहे. या यशाने हे सिद्ध केले आहे. माझे पहिले लक्ष्य आता चीनमध्ये होणाऱ्या आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत पदक मिळविण्याचे आहे. त्यानंतर होणारी जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धा माझ्यासाठी महत्त्वाची असेल.'' 

संबंधित बातम्या