Asian Games 2018 : तिरंदाजीत भारताच्या दोन्ही संघांचे रुपेरी यश

वृत्तसंस्था
Tuesday, 28 August 2018

इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत पुरुष आणि महिलांच्या भारतीय संघाने कम्पाउंड प्रकारात सांघिक गटाने रौप्य पदकाची कमाई केली.

जकार्ता : इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत पुरुष आणि महिलांच्या भारतीय संघाने कम्पाउंड प्रकारात सांघिक गटाने रौप्य पदकाची कमाई केली.

पुरुषांच्या अंतिम लढतीत दक्षिण कोरियासोबतच्या लढतीत 229-229 अशा बरोबरीनंतर शुटआउटमध्ये पुरुष संघाला पराभव स्वीकारावा लागला. 2014च्या आशियाई स्पर्धेत भारताने याच गटात सुवर्णपदक जिंकले होते. महिला तिरंदाज संघालाही अंतिम लढतीत दक्षिण कोरियाविरुद्धच 231-228 असा पराभव स्वीकारावा लागला. 

पुरुष गटात भारतीय संघाने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. भारतीय संघाला सुवर्ण पदक मिळाल्याचे घोषितही करण्यात मात्र नंतर लगेचच पंचाच्या चुकीमुळे हा निर्णय मागे घेण्यात आला. दोन्ही संघांचे समान गुण झाल्याने सामना शुटआऊटमध्ये गेला. त्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला.   

महिला गटात भारतीय संघाने पहिल्यासेटमध्ये 59-57 अशी आघाडी घेत दणक्यात सुरवात केली, मात्र पुढील सेटमध्ये कोरियाच्या खेळाडूंनी पुनरागमन करत 58-56 असा विजय मिळवला. 2014मध्ये भारतीय महिलांना ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले होते.


​ ​

संबंधित बातम्या