मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ खेळणार भारतीय संघात?

वृत्तसंस्था
Monday, 13 August 2018

सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे आणि यामुळेच पुढील तीन कसोटी सामन्यांसाठी संघात युवा खेळाडूंचा समावेश केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युवा खेळाडूंमध्ये मयांक अगरवाल आणि पृथ्वी शॉ यांचे नाव आघाडीवर आहे. 

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने लॉर्डसवरील दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे आणि यामुळेच पुढील तीन कसोटी सामन्यांसाठी संघात युवा खेळाडूंचा समावेश केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युवा खेळाडूंमध्ये मयांक अगरवाल आणि पृथ्वी शॉ यांचे नाव आघाडीवर आहे. 

गेल्या मोसमात मयांक अगरवालने स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. मागील वर्षीच्या रणजी करंडकामध्ये कर्नाटककडून खेळताना मयांकने 105.45च्या सरासरीने 1160 धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये भारताच्या अ संघाकडून खेळतानाही त्याने चांगली कामगिरी केली आहे. मागील आठवड्यात बंगळूर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने द्विशतक ठोकले होते. 

पृथ्वी शॉनेसुद्धा प्रत्येक सामन्यागणीक आपली कामगिरी सुधारली आहे. मुंबईचा सलामीवीर असलेल्या शॉने 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडकात विश्वविजेत्या भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते. त्यानंतर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्याने उत्तम कामगिरी केली आहे. अगरवालने द्विशतक केलेल्या सामन्यातच शॉने शतक केले होते. 

पहिले दोन कसोटी सामने पाहता भारतीय फलंदांजांना सपशेल अपयश आले आहे. विराट कोहली सोडून कोणत्याही फलंदाजाचा इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर टिकाव लागला नाही. संघातील सर्व फलंदाजांना संधी मिळूनही कोणीच प्रभाव पाडू शकलेले नाही. पुढील आठवड्यात होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीत इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची निवड केली जाईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 18 ऑगस्टला नॉटिंगहम येथे होणार आहे.

संबंधित बातम्या