विश्वविक्रमासह मनू - सौरभचे सुवर्ण 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 March 2019

 मनू भाकर आणि सौरभ चौधरीने आशियाई एअरगन स्पर्धेतील भारताच्या मोहीमेची यशस्वी सुरुवात करताना दहा मीटर एअर पिस्तुलच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले.

मुंबई :  मनू भाकर आणि सौरभ चौधरीने आशियाई एअरगन स्पर्धेतील भारताच्या मोहीमेची यशस्वी सुरुवात करताना दहा मीटर एअर पिस्तुलच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. त्यांनी ही कामगिरी करताना पात्रता फेरीत विश्वविक्रमही केला. तैवानला सुरु असलेल्या या स्पर्धेतील कुमार गटात इशा सिंग आणि विजयवीर सिद्धू यांनीही मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक जिंकले. 

मनू आणि सौरभने एका महिन्यापूर्वी दिल्लीतील विश्वकरंडक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तीच कामगिरी करताना त्यांनी पात्रता फेरीत 784 गुणांचा विश्वविक्रमी वेध घेतला. त्यांनी रशियाच्या वितालिना बात्साराशकिना - आर्लेम चेर्नोसोव यांनी पाच दिवसांपूर्वी युरोपिय स्पर्धेत नोंदवलेला 782 गुणांचा विक्रम दोन गुणांनी मोडला. या प्रकाराच्या कुमार गटातील विक्रमही मनू - सौरभच्याच नावावर आहे. 

पात्रता फेरीत सौरभने सर्वाधिक 396 तर मनूने तिसऱ्या क्रमांकाचे 388 गुण नोंदवले होते. सौरभने एकदा अचूक शंभर गुण मिळवले तर दोनदा 99. मनूची सर्वौत्तम फैरी 398 गुणांची होती. त्यांनी अंतिम फेरीतील सिरीजमध्ये 100.0, 101.1, 101.1, 39.7, 41.4, 40.4, 61.1 असा वेध घेतला होता. भारतीय जोडीने अंतिम फेरीत 484.4 गुणांनी बाजी मारताना कोरियाच्या जोडीस (481.1) सहज मागे टाकले. तैवानची जोडी (413.3) तिसरी आली. अनुराधा आणि अभिषेक वर्मा या भारतीय जोडीस (372.1) चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 

कुमार गटाच्या प्राथमिक अर्जुन सिंग चीमा तसेच इशा सिंगने प्रत्येकी 397 गुण मिळवत अव्वल क्रमांक मिळवला. त्यांनी अंतिम फेरीत 478.5 गुणांसह बाजी मारताना कोरियाच्या जोडीला (476.9) चुरशीच्या स्पर्धेत मागे टाकले. 


​ ​

संबंधित बातम्या