अर्जुन पुरस्कारानंतर मनप्रीत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार 

वृत्तसंस्था
Wednesday, 26 September 2018

विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी काही खेळाडूंची चाचणी घेण्याची ही अखेरची संधी आहे. या स्पर्धेत योजनेनुसार खेळ करीत यश संपादणे महत्त्वाचे आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील अपयशाचा विसर पडण्यासाठी ही चांगली संधी आहे. 
- हरेंदर सिंग, भारतीय मार्गदर्शक 

मुंबई छ आशियाई क्रीडा स्पर्धेत केवळ ब्रॉंझपदक जिंकू शकलेल्या भारतीय संघात आशियाई चॅंपियन्स करंडक स्पर्धेसाठी माफक बदल करण्यात आले असले, तरी श्रीजेशकडून कर्णधारपद काढून ते मनप्रीत सिंगकडे सोपविण्याचा मोठा निर्णय हॉकी इंडियाने बुधवारी घेतला. विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी आशियाई स्तरावरच मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाची चाचणी होण्यासाठी त्याच्याकडे आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी नेतृत्व सोपविण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत ब्रॉंझच जिंकू शकलेल्या श्रीजेशऐवजी मनप्रीतकडे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. 

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाकडून सुवर्णपदकाची आशा होती, पण ब्रॉंझच जिंकता आले. त्यानंतर हॉकी इंडियाने मार्गदर्शक हरेंदर सिंग यांना थेट विश्‍वकरंडक स्पर्धा अखेरची संधी असेल, असे सांगितले आहे; तर आता कोणीही काहीही गृहीत धरू नये, यासाठी श्रीजेशऐवजी मनप्रीतकडे कर्णधारपद सोपवले आहे. श्रीजेशच्या बचावातील चुकांचा भारतास फटका बसला होता. त्यालाही या निवडीद्वारे इशाराच दिला असल्याचे मानले जात आहे. 

आशियाई क्रीडा स्पर्धेतील संघातही बदल करण्यात आले. सरदार सिंग निवृत्तच झाला आहे. अनुभवी बचावपटू रूपिंदर पाल सिंगला वगळण्यात आले आहे. त्याच वेळी कोथाजित सिंगने पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर 23 वर्षीय आक्रमक गुरजांत सिंग संघात आला आहे. नीलकांता शर्मा, सुमीत, हार्दिक सिंग यांनाही संधी देण्यात आली आहे. 

मस्कत (ओमान) येथे होणारी आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धा 18 ते 28 ऑक्‍टोबरदरम्यान होईल. या स्पर्धेत मलेशिया, पाकिस्तान, दक्षिण कोरिया, जपान तसेच यजमान ओमानचा सहभाग आहे. 

भारतीय संघ- गोलरक्षक ः पीआर श्रीजेश, क्रिशन बहादूर पाठक. बचावपटू ः हरमनप्रीत सिंग, गुरिंदर सिंग, वरुण कुमार, कोथाजित सिंग, सुरेंदर कुमार, जरमनप्रीत सिंग, हार्दिक सिंग. मध्यरक्षक ः मनप्रीत सिंग (कर्णधार), सुमीत, नीलकांता शर्मा, ललितकुमार उपाध्याय, चिंगलेनसाना सिंग (उपकर्णधार). आक्रमक ः आकाशदीप सिंग, गुरजांत सिंग, मनदीप सिंग, दिलप्रीत सिंग. 

विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी काही खेळाडूंची चाचणी घेण्याची ही अखेरची संधी आहे. या स्पर्धेत योजनेनुसार खेळ करीत यश संपादणे महत्त्वाचे आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील अपयशाचा विसर पडण्यासाठी ही चांगली संधी आहे. 
- हरेंदर सिंग, भारतीय मार्गदर्शक 

संबंधित बातम्या