मॅंचेस्टर युनायटेडकडून ज्योस मौरिन्हो यांची हकालपट्टी

वृत्तसंस्था
Wednesday, 19 December 2018

 व्यावसायिक फुटबॉलमधील दिग्गज संघ असलेल्या मॅंचेस्टर युनायटेडने व्यवस्थापक ज्योस मौरिन्हो यांची मोसमाच्या मध्यावरच हकालपट्टी केली आहे. मौरिन्हो यांनी युनायटेडला लीग कप आणि युरोपा लीगचे विजेतेपद मिळवून दिले असले, तरी प्रतिष्ठेच्या प्रीमियर लीगमध्ये मॅंचेस्टरची कामगिरी खालावत आहे.

लंडन :  व्यावसायिक फुटबॉलमधील दिग्गज संघ असलेल्या मॅंचेस्टर युनायटेडने व्यवस्थापक ज्योस मौरिन्हो यांची मोसमाच्या मध्यावरच हकालपट्टी केली आहे. मौरिन्हो यांनी युनायटेडला लीग कप आणि युरोपा लीगचे विजेतेपद मिळवून दिले असले, तरी प्रतिष्ठेच्या प्रीमियर लीगमध्ये मॅंचेस्टरची कामगिरी खालावत आहे.

प्रीमियर लीग मध्यावर असताना आणि चॅम्पियन्स लीगचा बाद फेरीचा टप्पा सुरू होण्याच्या मुहूर्तावर मौरिन्हो यांची हकालपट्टी व्यावसायिक फुटबॉल क्षेत्रात खळबळ उडवून देणारी आहे. गेली अडीच वर्षे त्यांनी मॅंचेस्टर युनायटेड संघाच्या व्यवस्थापकपदाची धुरा सांभाळली होती.

यंदाच्या मोसमात मॅंचेस्टर युनायटेडचा आलेख उलट्या दिशेने सुरू आहे. रविवारी झालेल्या सामन्यात लिव्हलपूलकडून त्यांना 1-3 अशी हार स्वीकारावी लागली. त्यामुळे 19 गुणांसह ते सहाव्या क्रमांकावर आहेत.
पूर्णवेळ व्यवस्थापकाची नेमणूक क्‍लबच्या नियोजनाप्रमाणे होईल तोपर्यंत यंदाच्या मोसमासाठी काळजीवाहू व्यवस्थापकाची नियुक्ती केली जाईल, असे मॅंचेस्टर युनायटेड क्‍लबकडून जाहीर करण्यात आले. मे 2016 मध्ये लुईल वॅन गाल यांच्याकडून मौरिन्हो यांनी सूत्रे स्वीकारली होती. आता हंगामी व्यवस्थापकपदासाठी सहायक प्रशिक्षक किंवा अकादमीचे प्रशिक्षक यापैकी कोणाचीही निवड केली जाणार नाही, असेही क्‍लबकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे क्‍लबच्या बाहेरील व्यक्ती हंगामी व्यवस्थापक होऊ शकते.

यंदाच्या प्रीमियर लीगमध्ये चौथ्या क्रमांकावर येण्यासाठी त्यांना 11 गुणांची गरज आहे आणि त्यानंतर पहिल्या दोन क्रमांकांसाठी चुरस करावी लागणार आहे.

पॉग्बाबरोबर खडाखडी
यंदाचा मोसम सुरू झाल्यापासून मॅंचेस्टर युनायटेडचा कर्णधार पॉल पॉग्बा आणि मौरिन्हो यांच्यातील विस्तव जात नव्हता. रविवारच्या लिव्हरपूलविरुद्धच्या सामन्यात तर पॉग्बाला राखीव खेळाडूत त्यांनी ठेवले होते. काही दिवसांपूर्वीच्या सामन्यात मौरिन्हो यांनी पॉग्बाला "व्हायरस' म्हणूनही संबोधले होते. ऑक्‍टोबर महिन्यात न्यू कॅसलविरुद्धच्या सामन्यानंतर मौरिन्हो यांची हकालपट्टी करण्यात येणार, अशी चर्चा होती. त्या सामन्यात युनायटेड-2 असे पिछाडीवर पडले होते; मात्र 3-2 असा विजय मिळवल्यानंतर त्यांची खुर्ची काही काळासाठी कायम राहिली होती.


​ ​

संबंधित बातम्या