मालविकाकडून जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित चकित : आशियाई ज्युनिअर बॅडमिंटन 

 वृत्तसंस्था
Thursday, 25 July 2019

- भारतीय बॅडमिंटनमधील भविष्यातील आशास्थान असलेल्या नागपूरच्या मालविका बन्सोडसाठी गुरुवारचा दिवस संस्मरणीय ठरला.

- सुझोऊ (चीन) येथे सुरू असलेल्या आशियाई ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या एकेरीत डावखुऱ्या मालविकाने जागतिक ज्युनियर क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या थायलंडच्या फित्तायापोर्न चायवानवर मात करून धमाल उडवून दिली.

नागपूर : भारतीय बॅडमिंटनमधील भविष्यातील आशास्थान असलेल्या नागपूरच्या मालविका बन्सोडसाठी गुरुवारचा दिवस संस्मरणीय ठरला. सुझोऊ (चीन) येथे सुरू असलेल्या आशियाई ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या एकेरीत डावखुऱ्या मालविकाने जागतिक ज्युनियर क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या थायलंडच्या फित्तायापोर्न चायवानवर मात करून धमाल उडवून दिली. मात्र, विजयी मालिका तिला कायम ठेवता आली नाही आणि ती तिसऱ्या फेरीत पराभूत झाली. नागपूरच्याच रितिका ठक्‍करला मुलींच्या दुहेरीतही पराभवाला सामोरे जावे लागले. 

भारतीय संघाची कर्णधार असलेल्या बिगर मानांकित मालविकाने दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित थायलंडच्या फित्तायापोर्न चायवानला सरळ दोन गेम्समध्ये 21-18, 21-19 ने पराभूत केले. 38 मिनिटे चाललेल्या या लढतीत जागतिक क्रमवारीत 83 व्या स्थानावर असलेल्या मालविकाने युवा ऑलिंपिक स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकणाऱ्या चायवानविरुद्‌ध दोन्ही गेम्समध्ये दर्जेदार खेळ केला.

पहिला गेम 21-18 ने जिंकल्यानंतर दुसऱ्याही गेममध्ये मालविकाने चायवानला स्थिरावू न देता 21-19 अशी सरशी साधत तिसऱ्या फेरीत स्थान पटकाविले. जयेंद्र ढोलेच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या मालविकाने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. मात्र, ती तिसऱ्या फेरीचा अडथळा पार करू शकली नाही. चीनच्या टॅन निंग हिने मालविकावर 21-14, 21-8 अशी मात केली. ही लढत 32 मिनिटे रंगली. 

मुलींच्या दुहेरीत रितिका व मुंबईच्या सिमरन सिंघीला तीन गेम्सपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत कोरियाच्या गु लाम किम व सो जूंग किम जोडीकडून 22-20, 15-21, 7-21 ने पराभव पत्करावा लागला. या पराभवासह रितिकाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. रितिकाला मिश्र दुहेरीतही पराभव पत्करावा लागला होता.


​ ​

संबंधित बातम्या