IPL 2019 : मलिंगा, आयपीएल सोड आधी मायदेशात खेळ

वृत्तसंस्था
Saturday, 23 March 2019

मात्र, मलिंगा आयपीएलच्या पहिल्या सहा सामन्यांमध्ये सहभाग होणार नसल्याने यंदाच्या मोसमाच्या सुरवातीलाच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. 

आयपीएल 2019 : नवी दिल्ली : यॉर्करकिंग लसिथ मलिंगा म्हणजे मुंबई इंडियन्सची जान आहे. गेल्या अनेक मोसमात तो मुंबईचा प्रमुख गोलंदाज राहिला आहे. एवढेच नाही तर भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रित बुमरादेखील त्याच्याच मार्गदर्शनाखाली तयार झाला आहे. मात्र, मलिंगा आयपीएलच्या पहिल्या सहा सामन्यांमध्ये सहभाग होणार नसल्याने यंदाच्या मोसमाच्या सुरवातीलाच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. 

जून महिन्यात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी त्याला मायदेशी बोलविण्यात आले आहे. आयपीएलचे पहिले सहा सामने न खेळता तो मायदेशात स्थानिक एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. सध्या तो श्रीलंकेच्या आतंरराष्ट्रीय संघाचा कर्णधार असून या एकदिवसीय मालिकेत तो गॅल संघाचे नेतृत्त्व करणार आहे. ही स्पर्धा 4 ते 11 एप्रिल या कालावधीत होणार आहे त्यामुळेच तो पहिल्या सहा सामन्यांना मुकणार आहे. 

मुंबईचा पहिला सामना 24 मार्चला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. गेल्या मोसमात मलिंगा राखिव खेळाडूंमध्ये होता. मात्र, या वर्षीच्या लिलावात मुंबईने त्याला दोन कोटी रुपयांना विकत घेतले. मलिंगा सध्या दश्रिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. त्यामुळे मलिंगा आता थेट 26 मार्चला मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल होणार आहे. 

''आयपीएल खेळण्यासाठी श्रीलंका क्रिकेट मंडळाने मला परवानगी दिली होती. मात्र, विश्वकरंडक अवघ्या काही दिवसांवर आल्याने त्यांनी मला स्थानिक एकदिवसीय मालिकेत खेळण्यास सांगितले. त्यामुळे मीही होकार कळवला आणि मंडळालाच आयपीएल व मुंबई इंडियन्सला याबाबत कळवण्याची विनंती केली,'' असे मत मलिंगा व्यक्त केले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या