'ट्रेनिंगसाठी धोनी पॅड बांधताना दिसला तर ते आश्चर्यकारकच असेल'

टीम ई-सकाळ
Saturday, 20 June 2020

बीसीसीआय निवड सिमितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनीला प्रशिक्षण शिबिरात सामावून घ्यायला हवे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. पण...

मुंबई :  कोरोनाजन्य परिस्थितीतून सावरत खेळाच्या मैदानात पूर्वीप्रमाणे माहोल आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI) पुढील महिन्यांपासून आघाडीच्या क्रिकेटर्संसाठी प्रशिक्षण शिबिर सुरु करणार आहे. मार्चपासून स्थगित असलेल्या क्रिकेटला पूर्वपदावर आणण्याची सुरुवात ही 6 आठवड्यांच्या ट्रेनिंग कॅम्पने (प्रशिक्षण शिबिर) होणार आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार की नाही? याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.  बीसीसीआयच्या नव्या करारामध्ये धोनीला स्थान देण्यात आले नव्हते. प्रशिक्षण शिबिरात करारबद्ध खेळाडूसह अन्य खेळाडूही सहभागी होणार असल्याचे समजते. त्यात धोनी असणार का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. याबाबत क्रिकेट दिग्गजांच्याही प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

बीसीसीआय चिनी कंपनीच्या स्पॉन्सरशीपबाबत मोठा निर्णय घेणार का? 

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने प्रशिक्षणावेळी युवा खेळाडूंना संधी मिळावी, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्याने सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल या खेळाडूंच्या नावाचाही उल्लेख केला. दुसरीकडे बीसीसीआय निवड सिमितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनीला प्रशिक्षण शिबिरात सामावून घ्यायला हवे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. टी-20 वर्ल्डकपच्या दृष्टिने धोनीला कॅम्पमध्ये सहभागी करुन घेणे आवश्यक असल्याचेही एमसके प्रसाद यांनी म्हटले आहे.  एमएसके प्रसाद म्हणाले की, धोनी कॅम्पमध्ये असणे युवा खेळाडूंसाठी फायद्याचे ठरेल. टी-20 वर्ल्ड कपचा संभ्रम कायम आहे. जर ट्रेनिंग कॅम्प वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून घेण्यात येत असेल तर धोनीचा समावेश असणे संघासाठी फायदेशीर ठरेल. जर ट्रेनिंग कॅम्पचा उद्देश हा एखाद्या द्विपक्षीय मालिकेसाठी असेल तर  लोकेश राहुल, ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या खेळाडूंना अधिक संधी द्यावी, असा उल्लेखही त्यांनी केला. धोनीमुळे युवा खेळाडूंना नव्या गोष्टी शिकायला मिळतील, या विधानावर त्यांनी अधिक भर दिला.  

भज्जीने केली बहिष्काराची भाषा; चीनमधून उमटली ही प्रतिक्रिया

धोनीचा सहभाग झाला तर आश्चर्य वाटेल!

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या एका अधिकाऱ्याने धोनीला संधी देणे आश्चर्यकारक ठरेल, असे म्हटले आहे. धोनी एका वर्षांपेक्षा अधिक काळ क्रिकेटच्या मैदानापासून बाहेर आहे. इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषकापासून तो मैदानात दिसलेला नाही. अशा परिस्थितीत त्याचा ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभाग दिसला तर तो आश्चर्यकारक निर्णय असेल, असे ते म्हणाले. धोनीने आतापर्यंत  90 कसोटी सामन्यात 4876 धावा, 350 वनडेत 10773 धावा तर 98 टी-20 सामन्यात त्याने 1617 धावा केल्या आहेत. आयपीएलमधील190  सामन्यात त्याच्या नावे 4432 धावा आहेत. आयपीएलसाठी तयारी करण्यासाठी तो मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर त्याला ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी संधी मिळेल, असेही बोलले जात होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा लांबणीवर पडली आहे. परिणामी धोनीच्या पुनरागमनासंदर्भातील संभ्रम आणखी वाढला आहे.


​ ​

संबंधित बातम्या