विराट कोहली श्रेष्ठत्वाच्या नजीक; महेंद्रसिंह धोनीकडून कौतुक

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 8 August 2018

अफाट नैसर्गिक गुणवत्ता, तरुण आणि आता अनुभवी व जबाबदारपणा असा विराट कोहलीचा प्रवास अनुभवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने त्याचे भरभरून कौतुक केले आहे. गेल्या काही वर्षांत सिद्ध केलेल्या गुणवत्तेच्या जोरावर विराट श्रेष्ठत्वाच्या जवळ आलेला आहे, असे उद्‌गार धोनीने काढले. 

मुंबई - अफाट नैसर्गिक गुणवत्ता, तरुण आणि आता अनुभवी व जबाबदारपणा असा विराट कोहलीचा प्रवास अनुभवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने त्याचे भरभरून कौतुक केले आहे. गेल्या काही वर्षांत सिद्ध केलेल्या गुणवत्तेच्या जोरावर विराट श्रेष्ठत्वाच्या जवळ आलेला आहे, असे उद्‌गार धोनीने काढले. 

विराटचा मला फार अभिमान आहे. आतापर्यंत सर्वच ठिकाणी ज्या प्रकारे त्याने आपला ठसा उमटवला आहे, तो अनन्यसाधारण आहे; असे धोनीने मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. विराटचे सर्व क्रिकेट धोनीच्या नेतृत्वाखाली बहरलेले आहे. गत इंग्लंड दौऱ्यात अपयशाची भरपाई करताना त्याने काही दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात मिळून दोनशे धावा केल्या. 

वर्ल्डकपच्या तयारीसाठी चेंडू घेतला होता 
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर धोनीने पंचांकडून चेंडू घेतला, त्यामुळे धोनी निवृत्त होणार या चर्चेला उत आला होता. त्या घटनेचे स्पष्टीकरण देऊन धोनीने पुढील वर्षी इंग्लंडमध्येच होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेत आपण खेळणार असल्याचे संकेत दिले. त्या सामन्यातील चेंडू रिव्हर्स स्विंग होत नव्हता, त्यामुळे चेंडूची स्थिती कशी आहे; हे पाहण्यासाठी आणि त्यानुसार पुढील वर्षी होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी कशी तयारी करता येईल, या विचाराने मी तो चेंडू आमच्या गोलंदाजी प्रशिक्षकाला दाखवण्यासाठी घेतला होता, असे धोनीने स्पष्ट केले. 

इंग्लंडमध्ये सध्या सुरू असलेली कसोटी मालिका भारत जिंकेल का? या प्रश्‍नावर उत्तर देताना धोनी म्हणाला, उत्तर साधे-सोपे आहे. कसोटी सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांचे 20 फलंदाज बाद होणे आवश्‍यक असते, तुम्ही कशी फलंदाजी करता यापेक्षा पाच दिवसांत 20 फलंदाज बाद करणे आवश्‍यक आहे. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या कसोटीत ही क्षमता दाखवून दिली आहे.

संबंधित बातम्या