महाराष्ट्राच्या मुलींकडून मध्य प्रदेशचा धुव्वा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 April 2019

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या महाराष्ट्राने निर्धारित 50 षट्‌कांत 6 बाद 191 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. देविकाने कर्णधाराची खेळी करताना पाच चौकारांसह 71 चेंडूंत नाबाद 57 व शिंदेने सात चौकारांसह 71 चेंडूंत 54 धावा काढल्या.

नागपूर, ता. 3 : कर्णधार देविका वैद्‌य व सलामीवीर एस. शिंदेच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर महाराष्ट्राने शेवटच्या साखळी सामन्यात मध्य प्रदेशचा 109 धावांनी धुव्वा उडवून 23 वर्षांखालील मुलींच्या एकदिवसीय क्रिकेट (एलिट "अ' व "ब' गट)स्पर्धेत पाचवा विजय नोंदविला. या विजयामुळे महाराष्ट्राच्या बादफेरीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या महाराष्ट्राने निर्धारित 50 षट्‌कांत 6 बाद 191 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. देविकाने कर्णधाराची खेळी करताना पाच चौकारांसह 71 चेंडूंत नाबाद 57 व शिंदेने सात चौकारांसह 71 चेंडूंत 54 धावा काढल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू स्मृती मंधानाने पाच चौकारांच्या मदतीने 52 चेंडूंत 33 धावांचे योगदान दिले. मध्य प्रदेशकडून सलोनी डोंगरेने 30 धावांत सर्वाधिक पाच गडी बाद केले. 

विजयी लक्ष्याला सामोरे जाताना मध्य प्रदेशचा डाव 25.3 षट्‌कांत अवघ्या 82 धावांत आटोपला. अनन्या दुबेने सर्वाधिक 17 धावा केल्या. महाराष्ट्राकडून एम. सोनवणेने केवळ नऊ धावा देत तीन गडी बाद केले. साखळी फेरीतील आठ सामन्यांमध्ये महाराष्ट्राने 20 गुणांची कमाई केली आहे. महाराष्ट्राचा बादफेरीतील प्रवेश पाच एप्रिलला होणाऱ्या अन्य साखळी सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहील. 

संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र : 50 षट्‌कांत 6 बाद 191 (देविका वैद्‌य नाबाद 57, एस. शिंदे 54, स्मृती मंधाना 33, एस. लोणकर 15, ए. गायकवाड नाबाद 12, सलोनी डोंगरे 5-35). 
मध्य प्रदेश : 25.3 षट्‌कांत सर्वबाद 82 (अनन्या दुबे 17, रीना यादव 15, कल्पना 12, एम. सोनवणे 3-9, एस. पोखरकर 1-30, देविका वैद्‌य 1-19, टी. हसबनिस 1-3)


​ ​

संबंधित बातम्या