राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच महाराष्ट्राला दुहेरी मुकुट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 March 2019

 भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने व राजस्थान खो खो असोसिएशन आयोजित ५२ वी पुरुष–महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा जयपूर येथे संपन्न झाली असून महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी शानदार विजय संपादन करताना दुहेरी मुकूटाला गवसणी घातली.

जयपूर : भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने व राजस्थान खो खो असोसिएशन आयोजित ५२ वी पुरुष–महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा जयपूर येथे संपन्न झाली असून महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी शानदार विजय संपादन करताना दुहेरी मुकूटाला गवसणी घातली.

या स्पर्धेत पुरुषांचे व महिलांचे सर्वोच्च पुरस्कार मिळवताना महाराष्ट्रातील पुण्याच्या प्रतीक वाईरकरने एकलव्य तर काजल भोरने राणी लक्ष्मी पुरस्कार मिळवला. दोन्ही विजेत्या संघांना भारतीय खो-खो महासंघाने प्रत्येकी दोन-दोन लाख रुपये घोषित केले आहेत तर प्रशिक्षकांना प्रत्येकी पन्नास-पन्नास हजार रुपये घोषित केले आहेत असे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव संदिप तावडे यांनी कळवले आहे.  

आज झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र विरुध्द भारतीय रेल्वे हा सामना अतिशय रंगतदार झाला. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्यावर जादा डावात महाराष्ट्राने हा सामना २१-२० (८-७, ६-७ व ७-६) अतिशय चुरशीच्या सामन्यात एका गुणाने विजय साजरा केला.

या सामन्यात महाराष्ट्राच्या प्रतीक वाईरकरने एकलव्य पुरस्कार मिळवताना १:२०, १:३० व १:४० मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले, महेश शिंदेने १:५०, १:४० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला, दिपक मानेने १:१०, १:३०, १:१० मि. संरक्षण करत तीन गडी बाद केले व अनिकेत पोटेने ५ गडी बाद करताना (जादा डवात ३ गडी) सर्वोत्कृष्ट आक्रमकचा पुरस्कार मिळवला. तर रेल्वेच्या अमित पाटिलने सर्वोत्कृष्ट संरक्षकाचा पुरस्कार मिळवताना १:१०, १:३० व १:३० मि. संरक्षण करत चार गडी बाद केले, विजय हजारेने १:००, १:४० व १:२० मि. संरक्षण केले व दिपक माधवने १:४०, १:४० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला. मात्र रेल्वेची डाळ काही महाराष्ट्रा समोर शिजू शकली नाही.

महिलांमध्ये महाराष्ट्र विरुध्द भारतीय विमानतळ प्राधिकरण हा सामना सुध्दा अतिशय रंगतदार झाला. या सामन्यात महाराष्ट्राने भारतीय विमानतळ प्राधिकरणचा १३-१२ (४-४, ४-४, ५-४) असा अतिशय चुरशीच्या सामन्यात एका गुणाने विजय संपादन केला. महाराष्ट्राच्या प्रियंका भोपीने २:२०, १:२०, ३:०० मी. संरक्षण केले, अपेक्षा सुतारने २:३५, २:००, २:२० मी. संरक्षण केले व एक बळी मिळवला, काजल भोरने १:३०, नाबाद १:१० मी. संरक्षण केले व तीन बळी मिळवले, सारिका काळेने १:३५, २:२०, १:३० मी. संरक्षण केले व एक बळी मिळवला, प्रियंका इंगळेने ४ बळी मिळवले. तर भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या ऐश्वर्या सावंतने २:५०, २:३५, १:२० मी. संरक्षण केले, पौर्णिमा सकपाळ २:२०, १:२०, २:३० मी. संरक्षण केले व एक बळी मिळवला व एम. वीणाने १:००, १:५५, २:३० मी. संरक्षण केले. तरी अखेरच्या क्षणी महाराष्ट्राने विजयश्री खेचून आणली.

पुरस्कार

सर्वोत्कृष्ठ संरक्षक

अमित पटिल (रेल्वे )

ऐश्वर्या सावंत (भारतीय विमानतळ प्राधिकरण)

सर्वोत्कृष्ठ आक्रमक

अनिकेत पोटे  (मुंबई उपनगर - महाराष्ट्र)

प्रियंका इंगळे (पुणे- महाराष्ट्र )

एकलव्य / राणी लक्ष्मी 

प्रतीक वाईरकर (पुणे- महाराष्ट्र )

काजल भोर (पुणे- महाराष्ट्र )


​ ​

संबंधित बातम्या