फुटबॉल प्रसार, विकासात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर 

संजय घारपुरे
Wednesday, 29 July 2020

देशातील फुटबॉल प्रसार तसेच विकासात महाराष्ट्राच्या संघटनेने दुसरा क्रमांक मिळवला आहे. राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेने या स्पर्धेत गतमोसमात केरळ, गोवा यांसारख्या फुटबॉलमधील आघाडीच्या राज्यांना मागे टाकले आहे. 

मुंबई : देशातील फुटबॉल प्रसार तसेच विकासात महाराष्ट्राच्या संघटनेने दुसरा क्रमांक मिळवला आहे. राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेने या स्पर्धेत गतमोसमात केरळ, गोवा यांसारख्या फुटबॉलमधील आघाडीच्या राज्यांना मागे टाकले आहे. 

भारतीय महासंघाने मोसमात केलेल्या उपक्रमांनुसार राज्यांची क्रमवारी ठरवली आहे. त्यात पश्‍चिम बंगालचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंडियन फुटबॉल संघटनेने अव्वल क्रमांक मिळवला. तर महाराष्ट्राने केरळला मागे सारत दुसरा क्रमांक मिळवला. फुटबॉलचा प्रसार तसेच विकास करण्यासाठीच्या उपक्रमांना गुण दिले जातात. अर्थात या तीनही राज्यात फुटबॉल विकासासाठी अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्याचे मानधन भारतीय महासंघ देत असते. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

महाराष्ट्राने सरत्या वर्षात डी. लायसन्स मार्गदर्शकांसाठी 14 शिबिरांचे आयोजन केले. त्यात 352 जणांचा सहभाग होता. त्यातून 284 उत्तीर्ण झाले. राज्य संघटनेने ई लायसन्स मार्गदर्शकांसाठी तीन शिबिरे घेतली. तसेच रेफरी प्रशिक्षणाचे दोन कार्यक्रम घेतले. महाराष्ट्राने राज्य पुरुष स्पर्धा कोल्हापूरला, तर महिला स्पर्धा जळगावला घेतली. त्याचबरोबर राज्य किशोरी स्पर्धा पालघरला घेतली होती. राज्य महिला लीग स्पर्धेबरोबरच आंतरराष्ट्रीय तिरंगी स्पर्धेचेही आयोजन केले. इंडियन ऍरोज संघाचे यजमानपदही भूषवले. राज्यातील 34 जिल्ह्यात बाराशे नोंदणीकृत क्‍लब आहेत. मुंबईत गेल्या काही वर्षांत पाचशे अकादमी सुरू करण्यात आल्या. राज्यात भारतीय महासंघाची संलग्नता असलेल्या 18 अकादमी आहेत. 

राज्य संघटनेने सर्वांच्या साथीत केलेल्या कार्यक्रमांचे बक्षीस आम्हाला मिळाले आहे. अर्थात आत्तापर्यंतच्या कामावर आम्ही थांबणार नाही. आम्ही फुटबॉलचा जास्त विकास करतानाच खेळाचा दर्जा उंचावण्याकडेही सातत्याने लक्ष देणार आहोत. राष्ट्रीय स्पर्धांत खेळणाऱ्या संघांची संख्या आगामी काही वर्षात नक्कीच मोठ्या प्रमाणावर वाढेल, हा आम्हाला विश्वास आहे, असे राज्य फुटबॉल संघटनेचे सचिव सौतेर वाझ यांनी सांगितले. 

राज्याचे गुण वाढले, स्थान घसरले 
भारतीय फुटबॉल महासंघाने यापूर्वीची संघटनांची स्पर्धा घेतली होती, त्या वेळी महाराष्ट्र 6.8 गुणांसह अव्वल होता. या वेळी महाराष्ट्राचे 8.2 झाले. पण महाराष्ट्र दुसरा आला. यापूर्वीच्या स्पर्धेत चौथ्या असलेल्या बंगालने अव्वल क्रमांकावर झेप घेतली. महाराष्ट्राचे मार्गदर्शक प्रशिक्षण (1.4 ते 3.2), नवोदितांना मार्गदर्शन (0.8 ते 1.5), स्पर्धातील कामगिरीचे गुण (1.4 ते 1.7) यात गुण वाढले. पण अकादमीच्या नोंदणीत (2.2 ते 1.8) कमी झाले. आश्‍चर्य म्हणजे यात महाराष्ट्राचे गुण यंदा संयुक्त सर्वाधिक आहेत.


​ ​

संबंधित बातम्या