राष्ट्रीय कुमार कबड्डी : 'साई'ने रोखली महाराष्ट्राची वाटचाल

वृत्तसंस्था
Monday, 17 February 2020

मुंबई : महाराष्ट्राच्या मुलांच्या तसेच मुलींच्या संघास राष्ट्रीय कुमार कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतच हार पत्करावी लागली. साई अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरण संघाने राज्याच्या दोन्ही संघांना पराजित केले.

मुंबई : महाराष्ट्राच्या मुलांच्या तसेच मुलींच्या संघास राष्ट्रीय कुमार कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतच हार पत्करावी लागली. साई अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरण संघाने राज्याच्या दोन्ही संघांना पराजित केले.

रोहतकला झालेल्या या स्पर्धेत राज्याचा मुलांचा संघ 31-37; तर मुलींचा संघ 19-34 असा पराजित झाला. ""गुणफलक दर्शवतो तेवढी ही लढत एकतर्फी झाली नाही. पाच मिनिटे असताना आम्ही सात गुणांनी मागे होतो. आम्ही चांगली लढत देत असल्याने काहीही घडू शकले असते; पण त्याच वेळी एका पकडीच्या वेळी आपल्या दोघी लॉबीत गेल्या आणि त्यामुळे आपल्यावर लोण बसला. त्यामुळे प्रतिकाराची आशाच संपुष्टात आली,'' असे महाराष्ट्राच्या मार्गदर्शिका शीतल मारणे यांनी सांगितले.

मुलांच्या लढतीत दोन मिनिटे असेपर्यंत बरोबरी होती; पण त्याच वेळी महाराष्ट्राच्या अव्वल आक्रमकाची पकड झाली आणि सामना महाराष्ट्राच्या पकडीतून निसटला. सातत्याने मॅटवरच सराव करीत असल्यामुळे साईचा संघ सरस ठरला. त्यांचा सराव एकत्रितपणे सुरू असतो, तसेच ते मॅटवर खेळत असतात, ही बाब चुरशीच्या सामन्यात नक्कीच निर्णायक ठरते, याकडे मारणे यांनी लक्ष वेधले.

हरियाना मुलांत, तर 'साई' मुलींत विजेते
हरियानाच्या मुलांनी, तर "साई'च्या मुलींनी राष्ट्रीय कुमार कबड्डी स्पर्धेत विजेतेपद जिंकले. "साई'च्या मुलांनीही अंतिम फेरी गाठली होती. त्यांनी हरियानाविरुद्धच्या अंतिम सामन्यात विश्रांतीस 13-11 आघाडीही घेतली होती; पण यजमान हरियानाने दुसऱ्या डावात जोरदार प्रतिकार केला आणि अखेर 28-19 अशी बाजी मारली. "साई'ला उत्तरार्धात आपला प्रभाव पाडता आला नाही.

मुलींच्या अंतिम सामन्यात "साई'ने चुरशीच्या लढतीत उत्तर प्रदेशचे कडवे आव्हान 36-32 असे परतवले. विश्रांतीच्या 11-20 पिछाडीनंतर "साई'ने जोरदार प्रतिआक्रमण केले.


​ ​

संबंधित बातम्या