राष्ट्रीय किशोर खो-खो - महाराष्ट्राची मुले विजेती, मुली उपविजेत्या

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 October 2019

- महारष्ट्राच्या मुलांनी किशोर गटाच्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत विजेतेपद मिळविले, मात्र मुलींना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले

 - विशेष म्हणजे दोन्ही विजेत्या संघांची दुहेरी विजेतेपदाची संधी हुकली.

- महाराष्ट्राचा रमेश वसावे सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या "भरत', तर ओडिशाची अनन्या प्रधान "इला' पुरस्काराची मानकरी ठरली. 

पुणे -  महारष्ट्राच्या मुलांनी किशोर गटाच्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत विजेतेपद मिळविले, मात्र मुलींना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या गटात ओडिशाने विजेतेपदाचा मान मिळविला. विशेष म्हणजे दोन्ही विजेत्या संघांची दुहेरी विजेतेपदाची संधी हुकली. महाराष्ट्राचा रमेश वसावे सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या "भरत', तर ओडिशाची अनन्या प्रधान "इला' पुरस्काराची मानकरी ठरली. 
रांची येथील अल्बर्ट एक्का खो-खो मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशाचा 15-7 असा एक डाव 7 गुणांनी पराभव केला. महाराष्ट्राच्या विजयात गणेश बोरकर आणि अजय कश्‍यप यांची कामगिरी निर्णायक ठरली. गणेशने 2.10 मिनिटे, तर अजयने 1.50 मिनिटे आणि 3 मिनिटे बचाव करून आक्रमणातही छाप पाडताना दोन गडी बाद केले. रमेश वसावे यानेही दोन्ही डावात प्रत्येकी 1.30 मिनिटे बचाव केला. ओडिशा संघाकडून बाबली तपन, रोहित आणि विशाल यांची झुंज तोकडी पडली. 
मुलींच्या अंतिम सामन्याच ओडिशाने महाराष्ट्राचा 15-8 असा सात गुणांनी पराभव करून मुलांच्या पराभवाची परतफेड केली. ओडिशाकडून अनन्या प्रधान हिने 2.50 मिनिटे बचाव केला. शिवानी गौतम हिने 2.10 मिनिटे बचाव करून तिला साथ दिली. पण, त्यांच्या विजयात मोंजका नायक हिचे धारदार आक्रमणच कारणीभूत ठरले. तिने सहा गडी बाद केले. महाराष्ट्राकडून दिपाली राठोड हिने 2.30 मिनिटे, प्रीती मांगलेने 2.20 मिनिटे बचाव केला. आक्रमणात सानिका निकम हिने दोन गडी बाद केले. 
 


​ ​

संबंधित बातम्या