संतोष ट्रॉफी : मध्य प्रदेशचा सलग दुसरा विजय 

अलताफ कडकाले
Saturday, 9 February 2019

संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत आज (शनिवारी) सकाळी झालेल्या सामन्यात मध्य प्रदेशने दमण-दीव संघाला 2 -0 असे हरवून सलग दुसरा विजय नोंदविला. येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर सोलापूर जिल्हा फुटबॉल संघटना आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे ही स्पर्धा सुरू आहे. 

संतोष ट्रॉफी 2019 : सोलापूर, ता. 9 : संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत आज (शनिवारी) सकाळी झालेल्या सामन्यात मध्य प्रदेशने दमण-दीव संघाला 2 -0 असे हरवून सलग दुसरा विजय नोंदविला. येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर सोलापूर जिल्हा फुटबॉल संघटना आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे ही स्पर्धा सुरू आहे. 

यापूर्वीच्या सामन्यात मध्य प्रदेशने दादरा नगर हवेलीला पराजीत केले होते. तर, दमण-दीवणे बलाढ्य गोव्याला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. त्यामुळे या सामन्याच्या निकालाविषयी उत्कंठा होती. अपेक्षेप्रमाणे दोन्ही संघानी पूर्वार्धात वेगवान खेळ केला. गोल करण्यासाठी दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केल्याने चेंडू सतत दोन्ही गोलक्षेत्रात फिरत राहिला. गोव्याविरुद्ध हिरो ठरलेला दमनचा गोरक्षक निहाल हुसेनने पूर्वार्धातील मध्य प्रदेशचे हल्ले परतवून संघाला तारले. मात्र, मोक्‍याच्या वेळी चेंडूवरील नियंत्रण राखण्यात अपयश आल्याने पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत राहिला. 

उत्तरार्धात 72व्या मिनिटाला दमणचा गोलरक्षक निहाल हुसेन आणि बचाव फळीतील गोंधळाचा फायदा उठवत मध्य प्रदेशचा हुकमी खेळाडू बलधीर टिग्गाने सहकाऱ्यांना जल्लोष करण्याची संधी दिली. गोलच्या टॉनिकमुळे उत्साहित झालेल्या मध्य प्रदेश खेळाडूंनी यानंतर सामन्यावर नियंत्रण मिळवले. सामन्यात सात मिनिटे शिल्लक असताना दमणचा ऑफसाईड पकडण्याचा डाव अंगलट आला. याचा पुरेपूर फायदा उठवत मध्य प्रदेशच्या आकाश भारबोरेने मैदानी गोल करून संघाला 2-0 अशी निर्णयाक आघाडी मिळवून दिली. यानंतर दमणच्या निर्मल क्षेत्री, नितसिमिनटो सॅंटियागो, बावली सिव्हरी यांच्या चढाया मध्य प्रदेशचा गोलरक्षक अभिजित रॉय, बचावपटू आशुतोष मलविया, सौरभ ठाकूर, गौतम सिंग, मोहम्मद रहीम यांनी हाणून पाडल्या. सामन्यात धसमुसळा खेळ केल्याबद्दल मध्य प्रदेशच्या रामा स्वामी, आकाश हरभरे तर दमण-दीवच्या बबली शिवरी, अभिषेक जाधव यांना मुख्य पंच फैसल सलाउद्दीन यांनी यलो कार्ड दाखवले. 


​ ​

संबंधित बातम्या