पुरुष संघाच्या अपयशाने झाकोळले गेले आमचे यश

मधू यादव
Friday, 17 August 2018

भारतीय महिला संघाने पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, त्यापूर्वी जपानला झालेल्या आशिया कप स्पर्धेत आपण जिंकलो होतो. त्यामुळे सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार झालो. ही स्पर्धा ऍस्ट्रोटर्फवर झाली होती, तरीही आपण वर्चस्व राखले होते.

भारतीय महिला संघाने पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, त्यापूर्वी जपानला झालेल्या आशिया कप स्पर्धेत आपण जिंकलो होतो. त्यामुळे सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार झालो. ही स्पर्धा ऍस्ट्रोटर्फवर झाली होती, तरीही आपण वर्चस्व राखले होते. तेव्हाही भारतीय संघात आमच्या रेल्वेच्या खेळाडू मोठ्या प्रमाणावर होत्या. त्यामुळे एकमेकांशी चांगले सामंजस्य होते. त्याचाही फायदा झाला. अर्थात सर्वांचेच लक्ष त्या वेळी पुरुष हॉकीवरही त्यातही भारत - पाकिस्तान यांच्यातील संभाव्य अंतिम लढतीकडे होते. त्यामुळे आमचे यश सुवर्ण असूनही त्याची फारशी चर्चाच झाली नाही. मात्र, पुरुष हॉकीच्या अपयशात आमचेही यश झाकोळले गेले. या आठवणीचा विचार आजही आला तरी मन खिन्न होते. 

आपण या यशाचा त्यानंतरच्या वर्षात फायदा घेऊ शकलो नाही, हे सलत आहे. काही वर्षांतच चीन, कोरिया, जपानने खूपच प्रगती करीत आपल्याला मागे सारले. चार वर्षांनी आपल्याला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक हॉकीत कोरिया, चीनने प्रगती केली, तर आपण मागे पडत गेलो. गेल्या काही वर्षांपासून आपण पुन्हा त्यांच्या नजीक पोहोचलो आहोत. सवितासारखी जागतिक दर्जाची गोलरक्षक असल्यामुळे आपली कामगिरी उंचावली आहे. ड्रॅग फ्लीकवर गोल करण्यात सुधारणा नक्कीच हवी आहे; पण त्यात प्रगती होत आहे. ऑलिंपिक विजेत्या इंग्लंडचा कस पाहिल्याने नक्कीच आत्मविश्‍वास उंचावलेला आहे. 

प्रथमच भारत एकाचवेळी आशिया पुरुष तसेच महिला हॉकीत विजेता आहे. आपली उंचावलेली कामगिरी विश्‍वकरंडक स्पर्धेतही दिसली. आपण या स्पर्धेत आशिया प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूपच सरस ठरलो. त्यामुळेच मला जागतिक स्पर्धेनंतर पंधरा दिवसांतच होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्यावेळी भारतीय संघ किती तंदुरुस्त असेल याची चिंता वाटत आहे. हा प्रश्न सोडला तर भारतीय महिला हॉकीच्या सुवर्णपदक जिंकण्याच्या मार्गात मला तरी कोणताही अडथळा दिसत नाही. 

संबंधित बातम्या