चॅंपियन्स लीग - कोस्टाच्या भरपाई वेळेतील गोलमुळे युव्हेंटिसची सरशी

वृत्तसंस्था
Thursday, 7 November 2019

-  डग्लस कोस्टाने भरपाई वेळेत केलेल्या गोलच्या जोरावर युव्हेंटिसने लोकोमोटीव मॉस्कोला पराजित केले

-  अँटलांटाविरुद्धच्या बरोबरीमुळे मॅंचेस्टर सिटीचा बाद फेरीत प्रवेश लांबला. 

- बदली गोलरक्षक वॉकरने कसाबसा किल्ला लढवत सिटीची हार टाळली. 

पॅरिस - डग्लस कोस्टाने भरपाई वेळेत केलेल्या गोलच्या जोरावर युव्हेंटिसने लोकोमोटीव मॉस्कोला पराजित केले आणि चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. पीएसजी तसेच बायर्न म्युनिचनेही ही कामगिरी केली, पण त्याचवेळी अँटलांटाविरुद्धच्या बरोबरीमुळे मॅंचेस्टर सिटीचा बाद फेरीत प्रवेश लांबला. 
मौरो इकार्डी याच्या पूर्वार्धातील गोलमुळे पीएसजीने क्‍लब ब्रुगीचा 1-0 पराभव केला, तर बायर्न म्युनिचने ऑलिंपिकॉसचे आव्हान 2-0 परतवले. बदली गोलरक्षक म्हणून काम करणे भाग पडलेल्या काईल वॉकर हा गोलजाळ्यात गेला, पण त्याने मॅंचेस्टर सिटी ऍटलांटाविरुद्ध पराजित होणार नाही याची काळजी घेतली. युव्हेंटिसने जोरदार सुरवात केली होती. ख्रिस्तियानो रोनाल्डोची फ्री किक गोलपोस्टवरून जाईल या अपेक्षेने लोकोमोटीव गोलरक्षकाने चेंडू सोडून दिला, पण ऍरॉन रॅमसे याने चेंडूला अचूक दिशा दिली. त्यानंतर युव्हेंटिसला वर्चस्वासाठी झगडावे लागले. त्यांनी गोलही स्वीकारला. भरपाई वेळेतील कोस्टाच्या गोलने युव्हेंटिसला विजयी केले. 
पीएसजीने सलग आठव्यांदा बाद फेरी गाठली खरी, पण 25 वर्षांनंतर ते उपांत्य फेरी गाठतील असा काही त्यांचा खेळ होत नाही. इंटर मिलानकडून लोनवर घेतलेल्या थॉमस टशेल याने मोसमातील आठवा गोल करीत पीएसजीला आघाडीवर नेले आणि तोच गोल निर्णायक ठरला. पूर्णवेळ मार्गदर्शकाविना खेळणाऱ्या बायरन म्युनिचने कडवे आव्हान परतवले. विजयासह बाद फेरी गाठली आहे आणि ते सध्या महत्त्वाचे आहे, असे बायरनचे हंगामी मार्गदर्शक हॅन्सी फ्लीक यांनी सांगितले. 
दरम्यान, ऍटलेटिको माद्रिदला स्वयंगोलमुळे बायर लिव्हरकुसेनविरुद्ध हार पत्करावी लागली. भरपाई वेळेत दोन गोल करीत शाख्तार दॉनेत्सकने दिनामो झॅग्रेबविरुद्धची लढत 3-3 बरोबरीत सोडवली. 
---- 

मॅंचेस्टर सिटीने हार टाळली 
ऍटलांटाचा उत्तरार्धातील प्रतिकार सिटीसाठी धक्कादायक होता. रहीम स्टर्लिंगने सहाव्या मिनिटास सिटीस आघाडीवर नेले, पण विश्रांतीनंतर लगेच त्यांना गोल स्वीकारावा लागला. सिटीचे सर्व लक्ष प्रीमियर लीगमधील लिव्हरपूलच्या सामन्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी पूर्वार्धाच्या मध्यास गोलरक्षक बदलला. या नव्या गोलरक्षकाच्या चुकीमुळे बरोबरीचा गोल स्वीकारावा लागला. त्याला धसमुसळ्या खेळाबद्दल बाहेर काढण्यात आले. बदली गोलरक्षक वॉकरने कसाबसा किल्ला लढवत सिटीची हार टाळली. 


​ ​

संबंधित बातम्या