ऑलिम्पिकमध्ये ब्रेक डान्स;देशभरातून 32 जणांची होणार निवड

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 3 March 2021

महाराष्ट्र डान्स् स्पोर्टस् असोसिएशनची ‘रोड टू 2024 ऑलिम्पिक’ या कार्यक्रमाची घोषणा !
 

पुणे : पॅरीसमध्ये नियोजित 2024 च्या ऑलंपिक स्पर्धेत ब्रेकिंग डान्स क्रीडा प्रकारात भारतीय दिसावेत, याचा नवा संकल्प सुरु करण्यात आलाय. हे ध्येय साध्य करण्यासाठी देशभरातून प्रत्येकी मुले-मुलींची निवड करण्यात येणार आहे.  यासाठी महाराष्ट्र डान्स् स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने ‘रोड टू 2024 ऑलंपिक’ या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.

महाराष्ट्र डान्स् स्पोर्टस् असोसिएशनची सर्व साधारण सभा  पुण्यामध्ये नुकतीच संपन्न झाली. राज्यामध्ये वाढत्या कोरोना महामारीच्या संकटामुळे ही सभा ऑनलाईन भरविण्यात आली होती. ऑल इंडिया डान्स् स्पोर्टस् फेडरेशन (एआयडीएसएफ) यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी एआयडीएसएफचे सचिव बिस्वजीत मोहंती, मुख्य तांत्रिक संचालक आणि प्रसिध्द नृत्यदिग्दर्शक गगुन बेदी, राष्ट्रीय प्रशिक्षक आणि 2017 मध्ये आशियायी इनडोअर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केलेले विनोद शंकर, महाराष्ट्र डान्स स्पोर्टस् असोसिएशनचे सचिव आणि कन्व्हेनर रणजीत भारव्दाज महाराष्ट्र राज्य डान्स संघटनेचे उपाध्यक्ष प्यारेलाल चौधरी आदि पदाधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

‘रोड टू 2024 ऑलिम्पिक’ या कार्यक्रमाची माहिती देताना मुख्य तांत्रिक संचालक आणि प्रसिध्द नृत्यदिग्दर्शक गगुन बेदी म्हणाले की, विविध तज्ञ आणि अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. एआयडीएसएफचे अध्यक्ष अरविंद कुमार यांनी यासाठी पाठिंबा दिला आहे. जागतिक नृत्य फेडरेशन (डब्ल्युडीएफ) यांनी दिलेल्या अटी आणि नियम याचे पालन करून भारतामध्ये विविध स्तरावरच्या स्पर्धा आयोजित करून सर्वोत्तम 16 मुले आणि 16 मुली यांची ब्रेकिंग डान्स प्रकारामध्ये निवड करण्यात येणार आहे.

या एआयडीएसएफ तर्फे निवड करण्यात येणाऱ्या 32 नृत्य ब्रेकिंग डान्स खेळाडूंना भारतातील प्रशिक्षक तसेच अमेरिका आणि इंग्लंड येथील प्रशिक्षकांचे मार्गदर्शन करतील. या खेळाडूंची ऑलिम्पिकच्या अनुषंगाने तयारी करुन घेण्यात येईल, असे बेदी यांनी म्हटले आहे.  महाराष्ट्रामध्ये या धर्तीवर एक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सध्या कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता ही स्पर्धा सर्व परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आयोजित करण्यात येईल. 

याआधी नृत्य हा केवळ मनोरंजनात्मक प्रकार म्हणून पाहीला गेला होता. नृत्यासाठी विविध डान्स रिअ‍ॅलीटी शो  होत असत. पण ऑलिम्पिकच्या  समावेशानंतर ही केवळ एक कला न रहाता एक क्रिडा प्रकार म्हूणन नावारूपास येणार आहे. यामुळे नृत्याची आवड असणारे मुले आणि मुली यांना एका नव्या क्षेत्राची दारे खुली झाली आहेत. या क्षेत्रामध्ये नृत्य हे करिअर होऊ शकणार आहे. मुले आणि मुली नृत्य करू शकणार असून नृत्यप्रशिक्षकपण बनु शकणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या