धक्कादायक! भावनिक व्हॉटस्ॲप स्टेटस ठेवत क्रिकेटपटूची आत्महत्या

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 9 February 2021

स्थानिक पातळीवरील क्रिकेटमध्ये संदीप याला अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जायचे.

खेळाडू कोणताही असो तो शेवटपर्यंत हार मानत नाही. मात्र निराशेच्या गर्तेत अडकलेल्या एका खेळाडूने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याची घटना समोर आलीय. महाबळेश्वर येथील स्थानिक युवा क्रिकेटपटूने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संदीप सुभाष भिलारे असे  35 वर्षीय खेळाडूचं नाव आहे. तो महाबळेश्वरमधील गणेश नगर सोसायटीमध्ये वास्तव्यास होता.  स्थानिक स्तरावरील क्रिकेटमधील उमदया खेळाडुच्या निधनाच्या वृत्तानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

स्थानिक पातळीवरील क्रिकेटमध्ये संदीप याला अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जायचे. त्याने आपल्या आत्महत्येपूर्वी व्हॉटस्ॲपवर एक स्टेटस ठेवले होते.  आई-वडील आणि मुलाची काळजी घ्या, बस शेवट! असा स्टेटस त्याने ठेवला होता. संदीपचा हा स्टेटस पाहिल्यानंतर त्याच्या मित्रांनी नातेवाईंकाशी संपर्कही साधला. मात्र अनर्थ टाळता आला नाही.  संदीपचे मेव्हणे सागर शिंदे मित्रासोबत तात्काळ घरी पोहचले. त्यावेली दरवाजा आतून बंद होता.  हाका मारुनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा कसाबसा उघडला. त्यावेळी संदीपने साडीने गळफास लावून घेतल्याचे समोर आले. 

संदीपला  ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.याठिकाणी वैदयकिय अधिकाऱ्यांनी  संदीप याचा मृत्यु झाल्याचे स्पष्ट केले. संदीपचा प्रेमविवाह झाला होता. त्याला एक वर्षांचा मुलगा आहे. त्याचा पहिला वाढदिवस 15 जानेवारीला मोठया थाटामाटात साजरा करण्यात आला होता.  या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.


​ ​

संबंधित बातम्या