लिओनेल मेस्सी बार्सिलोनाला गुडबाय करणार? 

वृत्तसंस्था
Saturday, 7 September 2019

फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सीसाठी यंदाचा मोसम संपता संपता बार्लिसोना क्‍लबला गुडबाय करण्याचा मार्ग मोकळा होत असला तरी या क्‍लबचे अध्यक्ष मारिया बार्टोमेऊ यांना मेस्सीच्या भवितव्याविषयी चिंता नाही. 

माद्रिद : फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सीसाठी यंदाचा मोसम संपता संपता बार्लिसोना क्‍लबला गुडबाय करण्याचा मार्ग मोकळा होत असला तरी या क्‍लबचे अध्यक्ष मारिया बार्टोमेऊ यांना मेस्सीच्या भवितव्याविषयी चिंता नाही. 

बॉलन डि ऑर या क्‍लब फुटबॉलमधील प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा पाच वेळा मानकरी राहिलेलल्या मेस्सीने बार्सिलोनाबरोबर चार वर्षांचा करार 2017 मध्ये केला होता. हा करार पुढील वर्षी संपत असला, तरी तो त्याअगोदरच करार संपुष्टात आणू शकतो आणि पुढील मोसमाअगोदरच बार्सिलोना सोडू शकतो, असे बार्टोमेऊ यांनी बार्सिलोनाच्या स्वतःच्या दूरचित्रवाणी वाहिनीवर सांगितले. 

मेस्सीने 2021 च्या मोसमापर्यंतच नव्हे, तर त्यानंतरही बार्सिलोनातून खेळावे, असेही मत बार्टोमेऊ यांनी व्यक्त केले. बार्सिलोना आणि मेस्सी असे समीकरण अनेक वर्षांपासून तयार झालेले आहे. या क्‍लबमधून खेळताना मेस्सीने अनेक विक्रमही केलेले आहे. 

मुदतीअगोदरच करार संपुष्टात आणण्याबाबत बार्टोमेऊ यांनी झावी, कार्सोल प्युओल आणि आंद्र इनिएस्टा या माजी स्टार खेळाडूंनाही अशीच मुभा देण्यात आली होती; परंतु हे खेळाडू बार्सिलोनाशी एकरूप झालेले होते. त्यामुळे आम्हाला चिंता नव्हती, अशीही पुष्टी बार्टोमेऊ यांनी जोडली. 

यंदाच्या मोसमात मेस्सी खेळायचाय 
मस्सीवर बार्सिलोनाची सर्वांत मोठी मदार नेहमीच असते. यंदा तीन सामने झाले, तरी मेस्सी दुखापतीमुळे अजून मैदानात उतरलेला नाही. त्यामुळे ला लीगा स्पर्धेतील विजेत्या बार्सिलोनाची मोठी घसरण झाली आहे. तीन सामन्यातून चारच गुण त्यांना मिळाले असून ते सहाव्या स्थानावर आहेत.


​ ​

संबंधित बातम्या