लिअॅंडर पेसची आशियाई स्पर्धेतून माघार

वृत्तसंस्था
Friday, 17 August 2018

आशियाई स्पर्धेला केवळ दोन दिवस बाकी असताना भारताचा अव्वल टेनिसपटू लिअॅंडर पेसने काल (गुरुवार) आशियाई स्पर्धेतून माघार घेतली.

नवी दिल्ली : आशियाई स्पर्धेला केवळ दोन दिवस बाकी असताना भारताचा अव्वल टेनिसपटू लिअॅंडर पेसने काल (गुरुवार) आशियाई स्पर्धेतून माघार घेतली. ''अत्यंत जड अंतकरणाने मी हे सांगू इच्छितो की मी इंडोनेशियामध्ये होणाऱ्या आगामी आशियाई स्पर्धेत सहभागी होणार नाही.'' असे त्याने जाहिर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

''कित्येक आठवड्यांपूर्वी कल्पना देऊनही आशियाई स्पर्धेसाठी संघात आम्हाला दुहेरीसाठी एक विश्वासार्ह खेळाडू सहभागी करता आला नाही याचे मला दु:ख वाटते,'' असेही त्याने स्पष्ट केले. 

भारतीय टेनिस संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी गुरुवारी इंडोनेशियाला स्टार खेळाडू लिअँडर पेसशिवाय दाखल झाला. पेसच्या उपस्थितीबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. कर्णधार आणि प्रशिक्षक झीशान अली म्हणाले, "पेस का आला नाही हे आपल्याला माहीत नाही. मी त्याच्याशी अखेरचा संवाद साधला तेव्हा तो सिनसिनाटी स्पर्धा खेळून मग येथे दाखल होईन असे म्हणाला होता. पण, तो त्या स्पर्धेतही खेळत नाहीये.'' सध्या रोहन बोपण्णा आणि दिविज शरण हे भारताचे एकमेव पुरुष दुहेरी जोडीदार आहेत.

दरम्यान, पेसच्या स्पर्धेतून माघार घेण्याच्या निर्णयाने अखिल भारतीय टेनिस संघासमोर चांगलाच पेच निर्माण झाला आहे. ''पेसने माघार घेण्याच्या निर्णयाची अगोदर कल्पना दिली असती तर त्याच्या जागी एका युवा खेळाडूला संघात स्थान दिले गेले असते. आता ऐनवेळी कोणाचाही प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही.'' असे मत एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

संबंधित बातम्या