'व्हीके शॉटगन कप' राष्ट्रीय स्पर्धेत लक्ष्य शेरॉन व सौम्या गुप्ताला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 February 2019

पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये झालेल्या 'व्हीके शॉटगन कप' मध्ये पुरुष गटात लक्ष्य शेरॉनने सुवर्ण, अन्वर सुलतानने रौप्य आणि रियान रिझवीने ब्रॉंझपदक पटकाविले. महिला गटात सौम्या गुप्ताने सुवर्ण, शगुन चौधरीने रौप्य तर, श्रेयसी सिंगने ब्रॉंझपदक मिळविले.

पुणे : विक्रम काकडे शुटींग अॅकॅडमीच्या वतीने राष्ट्रीय शॉटगन ट्रॅप शुटींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये झालेल्या 'व्हीके शॉटगन कप' मध्ये पुरुष गटात लक्ष्य शेरॉनने सुवर्ण, अन्वर सुलतानने रौप्य आणि रियान रिझवीने ब्रॉंझपदक पटकाविले. महिला गटात सौम्या गुप्ताने सुवर्ण, शगुन चौधरीने रौप्य तर, श्रेयसी सिंगने ब्रॉंझपदक मिळविले.

विक्रम काकडे शुटींग अॅकॅडमीच्या वतीने आयोजित ‘व्हीके शॉटगन कप’ या राष्ट्रीय शॉटगन ट्रॅप शुटींग स्पर्धेसाठी देशभरातील नामांकित 50 हून अधिक शुटर्स सहभागी झाले होते. ऑलिंपिक, कॉमनवेल्थ, एशियन चॅम्पियनशीपसह राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले आणि खेलरत्न व अर्जुन पुरस्काराने सन्मानित सहा खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात लक्ष्य शेरॉन ने 46 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला, दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या अन्वर सुलतानला 39 तर, तिसऱ्या क्रमांकावरील रियान रिझवीला 33 गुण मिळाले. महिला गटात सौम्या गुप्ताला 40 गुण, शगुन चौधरीला 38 आणि श्रेयसी सिंगला 29 गुण मिळाले. त्यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक पटकाविले. 

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल, ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा उषा काकडे, पोलीस उपायुक्तकोमल देशमुख, मालपाणी ग्रुपचे संचालक आशिष मालपाणी, अर्जुन व खेलरत्न पुरस्कार विजेते मानवजीतसिंग संधु, अर्जुन पुरस्कार विजेते मनशेर सिंग, अन्वर सुलतान व श्रेयसी सिंग आणि ऑलिंपिक मध्ये खेळलेली पहिली महिला शगुन चौधरी उपस्थित होते.

‘व्हीके शॉटगन कप’ स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी बालेवाडी येथील विक्रम काकडे शुटींग अॅकॅडमीमध्ये पार्थ पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अर्जुन व खेलरत्न पुरस्कार विजेता आणि चारवेळा ऑलिंपिक खेळलेले मानवजीत सिंग संधु, अॅकॅडमीचे प्रमुख विक्रम काकडे, रोहन देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.  शुटींग अॅकॅडमीचा उपयोग देशातील शुटींग स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडू निर्माण करण्यासाठी निश्चित होईल. सर्व सुविधांयुक्त ही अॅकॅडमी खेळाडुंसाठी उपयुक्त ठरेल. विक्रम काकडे हे क्रीडा क्षेत्रात अतिशय चांगलं काम करीत आहेत, असे पार्थ पवार यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले.

या स्पर्धेमध्ये ऑलिंपिक स्पर्धा खेळलेले, खेलरत्न व अर्जुन पुरस्काराने सन्मानित झालेले सहा शुटर्स खेळाडू सहभागी झाले. देशपातळीवर प्रथमच एवढ्या मोठ्या स्तरावरील शॉटगन ट्रॅप शुटींगची स्पर्धा पुण्यात झाली. शॉटगन ट्रॅप शुटींग प्रकारात देशाला ऑलिंपिक मध्ये सुवर्ण पदक मिळवून देणारे खेळाडू घडविण्यासाठी ही अॅकॅडमी सुरु केली आहे. ऑलिंपिकसाठी खेळायला जाणाऱ्या काही खेळाडूंचा संपूर्ण खर्च अॅकॅडमीच्या वतीने करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील गुणवान खेळाडूंना मोफत प्रशिक्षण अॅकॅडमीतर्फे दिले जाणार आहे. खेळामध्ये जगात देशाची मान उंचावण्यासाठी आणि देशाला शुटींग स्पर्धेत जागतिक स्तरावर गौरव प्राप्त करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचाच भाग म्हणून देशपातळीवर इतक्या मोठ्या स्तरावर पहिल्यांदाच अशी स्पर्धा पुण्यातील बालेवाडी क्रीडानगरीत आयोजित केली. पुण्याचे नाव क्रीडा क्षेत्रात आणखी उंचावण्याठी हा अल्पसा प्रयत्न सर्वांच्या मदतीने केला आहे, असे विक्रम काकडे यांनी यावेळी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या