भारत ठोठावतोय भारतीय संघाचे दरवाजे

वृत्तसंस्था
Tuesday, 11 September 2018

रणजी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा तो पहिला यष्टीरक्षक होता. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याचा दुसरा यष्टीरक्षक म्हणून विचार होण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने डिसेंबर 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर चार वर्षांनी भारत पुन्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यास सज्ज असला तरी भारतीय संघ अजूनही नियमित यष्टीरक्षकाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये चालू वर्षात चांगली कामगिरी करणाऱ्या के. एस. भारतच्या रुपाने भारतीय संघासाठी यष्टीरक्षणामध्ये एक समर्थ पर्याय उभा राहत आहे.  

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भारतीय यष्टीरक्षकांची कामगिरी
खेळाडू सामने झेल यष्टीचीत सरासरी
के एस भारत 40 141 14 32.19
रिषभ पंत  25 76 7 49.63
ईशान किशन 31 56 9 40.90
संजू सॅमसन  27 48 5 36.52
आदित्य तरे 34 132 12 38.47

भारतने पाच वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशकडून प्रथन श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणात त्याने रणजी करंडकातील अवघ्या एका सामन्यात यष्टीरक्षण केले. मात्र, त्यानंतर तो आंध्र प्रदेशचा प्रमुख यष्टीरक्षक झाला. 2017-18 च्या रणजी मोसमात त्याने सहा सामन्यांमध्ये यष्टींमागे 24 फलंदाजांना बाद केले आहे. यामध्ये त्याने 23 झेल आणि एक यष्टीचीतचा समावेश आहे. 2015च्या रणजी मोसमात त्याने गोव्याच्या संघाविरुद्ध त्रिशतक झळकावले होते. आंध्रप्रदेशच्या कोणत्याही खेळाडूने 200पेक्षा जास्त धावा करण्याची ती पहिली वेळ होती. तसेच रणजी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा तो पहिला यष्टीरक्षक होता. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याचा दुसरा यष्टीरक्षक म्हणून विचार होण्याची शक्यता आहे. 

मागील नऊ सामन्यांमध्ये भारतीय संघाने चार यष्टीरक्षक बदलले आहेत. वृद्धिमान साहा आणि पार्थिव पटेल यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. वृद्धीमान साहाला झालेल्या दुखापतीमुळे आणि पार्थिव पटेलला स्विंग होणारा चेंडू खेळताना येणाऱ्या अडचणींमुळे भारताचा सर्वात अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघात संधी देण्यात आली. मात्र, तो फलंदाजी आणि यष्टीरक्षण या दोन्ही आघाड्यांवर अपयशी ठरल्याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर युवा खेळाडू रिषभ पंतला भारतीय संघात स्थान देण्यात आले. 

वृद्धिमान साहाला झालेली दुखापत लक्षात घेता तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे भारतीय संघात रिषभ पंतच यष्टीरक्षक म्हणून कामगिरी पाहण्याची दाट शक्यता आहे. पंतकडे प्रचंड आत्मविश्वास असून त्याच्याकडे खेळासाठी गरजेची असणारी आक्रमकताही आहे. मात्र, त्याने आजवर फक्त 25 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. वयाच्या 20व्या वर्षीच भारतीय संघाच्या यष्टीरक्षकाची जबाबदारी सांभाळण्यास तो योग्य आहे की नाही हे एवढ्यात सांगता येणे फार अवघड आहे. 

भारतीय संघ नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ चार कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाताना भारतीय संघात के. एस. भारतचा यष्टीरक्षक म्हणून समावेश करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संबंधित बातम्या