यापुढे 'बीसीसीआय'मध्ये 'दादागिरी' सुरू राहणार?

किशोर पेटकर
Thursday, 19 December 2019

भारताचे माजी कर्णधार सौरभ गांगुली यांची जिगरबाज, जिद्दी आणि धाडसी क्रिकेटपटू ही मैदानावरील ओळख आहे. गांगुली यांनी भारतीय क्रिकेट संघाला कर्णधार या नात्याने आत्मविश्वास मिळवून दिला. आज हाच कणखर माजी कर्णधार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष झाला आहे, पण गांगुलीची बीसीसीआय अध्यक्षपदाची कारकीर्द लघुकालीन ठरण्याची शक्यता आहे.

भारताचे माजी कर्णधार सौरभ गांगुली यांची जिगरबाज, जिद्दी आणि धाडसी क्रिकेटपटू ही मैदानावरील ओळख आहे. गांगुली यांनी भारतीय क्रिकेट संघाला कर्णधार या नात्याने आत्मविश्वास मिळवून दिला. आज हाच कणखर माजी कर्णधार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष झाला आहे, पण गांगुलीची बीसीसीआय अध्यक्षपदाची कारकीर्द लघुकालीन ठरण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कारण सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केलेल्या न्या. लोढा समितीच्या शिफारशीनुसार, बीसीसीआय पदाधिकाऱ्याचा कार्यकाळ, तसेच `कुलिंग` कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. गांगुली गेल्या २३ ऑक्टोबरला बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले.

मात्र, लोढा शिफारशीनुसार ते या पदी येत्या वर्षी जुलै-ऑगस्टपर्यंतच राहू शकतात. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (कॅब) अध्यक्ष या नात्याने त्यांनी क्रिकेटचे प्रशासकीय कामकाज पाहिलेले असल्यामुळे तो कार्यकाळ `कुलिंग` कालावधीअंतर्गत येतो आणि लोढा शिफारशीनुसार गांगुली यांना पूर्ण मुदतीपूर्वीच बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडावे लागेल. तसे न केल्यास तो सर्वोच्च न्यायालयाचा अपमान ठरेल.

- IPL 2020 : बेस प्राईज फक्त दोन कोटी अन् कमावले 15.50 कोटी, कोण पाहा

गांगुली यांना दादा या टोपणनावाने संबोधले जाते आणि त्यांच्या कृतीस प्रेमाने `दादागिरी`ची उपमा दिली जाते. बीसीसीआयचे अध्यक्ष या नात्याने गांगुली यांची क्रिकेट प्रशासनातील `दादागिरी` २०२४ पर्यंत चालावी यासाठी प्रयत्न आहेत. बीसीसीआयच्या ८४ व्या वार्षिक सभेत `कुलिंग` कालावधीचे पडसाद उमटले.

बीसीसीआय पदाधिकारी कालावधी मर्यादेस आव्हान देण्याचे नव्या कार्यकारिणीने ठरविले आहे. संलग्न संघटना आणि बीसीसीआय पदाधिकाऱ्यांचा कालावधी स्वतंत्र असावा, दोन्ही ठिकाणचा कालावधी एकत्रित मानू नये, असे बीसीसीआयच्या नव्या कार्यकारिणीचे मत आहे. त्यानुसार पदाधिकारी कालावधी बदलाचा प्रस्ताव बीसीसीआय सर्वोच्च न्यायालयास पाठवेल. सर्वोच्च न्यायालयाने त्यास मंजुरी दिल्यास गांगुली यांचा बीसीसीआय अध्यक्षपद कालखंड वाढू शकतो. त्याचा फायदा केवळ गांगुली यांनाच नव्हे, तर बीसीसीआयचे सचिव जय शाह व अन्य पदाधिकाऱ्यांनाही मिळू शकतो.

प्रशासकीय कामाचा अनुभव
बीसीसीआयचे अध्यक्ष झालेले सौरभ गांगुली यांच्यापाशी क्रिकेटमधील प्रशासकीय कामकाजाचा पुरेसा अनुभव आहे. ४७ वर्षीय गांगुली यांनी जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर २०१५ मध्ये क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (कॅब) अध्यक्षपद स्वीकारले. जुलै २०१४ पासून ते संघटनेचे संयुक्त सचिव या नात्याने, तर २०१२-१३ पासून कार्यकारी सदस्य या नात्याने कार्यरत होते. २००८ मध्ये क्रिकेटमधून खेळाडू निवृत्ती स्वीकारल्यानंतर गांगुली यांनी क्रिकेटमधील इतर बाबींवर काम करण्यासाठी स्वतःला झोकून दिले.

- IPL 2020 : पंजाबचा बॅटींग कोच झाला आता नवा कर्णधार पाहा!

खेळाडू असताना दालमिया हे गांगुली यांच्यासाठी गॉडफादर होते, प्रशासकीय कामकाजातही दालमिया यांनी माजी कर्णधारास मोलाचे मार्गदर्शन केले. गांगुली यांनी आयपीएल समितीतही काम केलेले आहे. शिवाय निवृत्तीनंतर समालोचक, स्तंभलेखक या नात्याने स्वतंत्र बाणा प्रदर्शित केला. आयपीएल स्पर्धेतील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघासाठीही योगदान दिले. बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यानंतर गांगुली यांनी भारतात गुलाबी चेंडूने दिन-रात्र कसोटी क्रिकेटला तातडीने राबविले.

भारत व बांगलादेश यांच्यातील कोलकाता येथील ईडन गार्डन्सवरील पिंक कसोटी सामन्याला जबरदस्त प्रतिसाद लाभला. सामना भारताने तिसऱ्याच दिवशी जिंकला, पण देशात दिन-रात्र कसोटी क्रिकेट संस्कृती रुजणारी आहे याचे प्रमाण मिळाले.

- IPL 2020 : विराट आता हैदराबादच्या ताफ्यात; सनरायझर्सने मोजले 10 पट जास्त पैसे

देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळाडूंना करारपद्धतीनुसार मानधनासाठी गांगुली इच्छुक आहेत. माजी क्रिकेटपटूंच्या निवृत्तिवेतनाचा फेरविचार करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. भारतीय क्रिकेटला उंचावर नेताना, देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंना अच्छे दिन यावेत यासाठी गांगुली गांभीर्याने पाहत आहेत हे त्यांच्या बीसीसीआय अध्यक्ष या नात्याने महिनाभरातील वक्तव्यांवरून जाणवते.

आक्रमक कर्णधार
गांगुली यांनी टीकाकारांना नेहमीच सणसणीत चपराक देत, क्रिकेट मैदाने गाजविली. १९९६ मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी त्यांची कोटा पद्धतीमुळे भारतीय संघात निवड झाल्याची टीका झाली. संधी मिळताच गांगुली यांनी गुणवत्तेचे सार्थ प्रदर्शन घडविले.

पदार्पणातच कसोटी शतक झळकाविल्यानंतर या डावखुऱ्या फलंदाजाने नंतर मागे वळून पाहिलेच नाही. २००० च्या आसपास भारतीय क्रिकेट मॅचफिक्सिंगमुळे कोलमडले होते. गांगुली यांनी कर्णधारपदाचे शिवधनुष्य पेलले. आक्रमकता हे त्यांचे स्वभाववैशिष्ट्य. त्या जोरावर क्रिकेट संघाला विजयाची दिशा दाखविली.

ऑस्ट्रेलियाच्या स्लेजिंगला चोख प्रत्युत्तर देताना त्यांना पराभूत करण्याची हिंमत संघाला दिली. ऐतिहासिक लॉर्ड्‌स स्टेडियमवर इंग्लंडला नमविल्यानंतर गॅलरीत अंगावरील जर्सी काढून गरागरा फिरविणारा गांगुली हा खूपच धीट ठरला. २००३ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट वेगळ्याच उंचीवर पोचले, पण संघाला त्या दिशेने नेण्यास गांगुलीचे नेतृत्वच कारणीभूत ठरले होते हे नाकारता येणार नाही.


​ ​

संबंधित बातम्या