IPL 2020 : अखेर ठरलं! अश्विन खेळणार या संघाकडून

वृत्तसंस्था
Wednesday, 16 October 2019

किंग्ज इलेव्हन पंजाब फ्रँचायजीच्या बोर्डाने घेतली मिटींग अश्विन संघाचा अविभाज्य घटक असल्यावर एकमत दिल्ली कॅपीटल्सबरोबर ट्रेडींग करण्याची चर्चा कधीच फलदायी नाही

मोहाली - आयपीएलमध्ये भारताचा अनुभवी ऑफस्पीनर आर. अश्विन अखेर किंग्ज इलेव्हन पंजाबकडेच राहील. दिल्ली कॅपीटल्स संघाबरोबर त्याचे ट्रेडिंग करायचे नाही असा निर्णय किंग्ज इलेव्हनने घेतला आहे. आधी ट्रेडिंग होईल असे वृत्त होते.

2018च्या लिलावात अश्विनशी सात कोटी 60 लाख रुपये रकमेचा करार करण्यात आला. गेली दोन वर्षे तो नेतृत्व करतो आहे. दोन्ही वेळा स्पर्धेच्या पहिल्या टप्यांत किंग्ज इलेव्हनने आशा उंचावल्या, पण शेवट निराशाजनक ठरला.

2018 मध्ये सातवे, तर गेल्या वर्षी सहावे स्थान अशी त्यांची घसरण झाली. गेल्या वर्षी सहा विजय आणि आठ पराभव अशी कामगिरी होती.

नवे मुख्य प्रशिक्षक कुंबळे उत्सुक

किंग्ज इलेव्हनने नुकताच माजी कर्णधार अनिल कुंबळे यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. तेच अश्विनला कायम ठेवण्यास उत्सुक होते असे सूत्रांनी सांगितले.

अश्विन तर अविभाज्य घटक

किंग्ज इलेव्हनचे सहमालक नेस वाडिया यांनी "पीटीआय' वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही फेरविचार केला आणि ट्रेडिंग करायचे नाही असे ठरविले. अश्विन संघाचा अविभाज्य घटक आहे. आम्ही दिल्ली कॅपीटल्सबरोबर चर्चा केली होती, पण ती कधीच फलदायी ठरली नाही. अश्विनची क्रिकेट खेळण्याची पद्धत आणि कामगिरी त्याच्याविषयी खूप काही सांगून जाते.

चांगल्या प्रारंभानंतर घसरण
किंग्ज इलेव्हनची आयपीएलमधील कामगिरी फारशी उल्लेखनीय नाही. 2008 मधील पहिल्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर त्यांना एकदाच प्ले-ऑफमध्ये जाता आले. 2014 मध्ये त्यांनी उपविजेतेपद मिळविले होते. I


​ ​

संबंधित बातम्या