आजही सोनेरी आठवणीने डोळ्यांच्या कडा पाणवतात 

अशोक शिंदे 
Sunday, 5 August 2018

संघातील प्रत्येक खेळाडू एकापेक्षा एक सरस आहेत. अशा वेळी संघ व्यवस्थापनासमोर अंतिम संघ निवडीची डोकेदुखी असते. त्यामुळे प्रशिक्षक आणि कर्णधाराची कसोटी लागते. प्रतिस्पर्धीला कमी न लेखणे आणि सुरवातीलाच पिछाडीवर राहणार नाही, याची काळजी घेतल्यास पुढचा मार्ग सोपा होतो. भारतीय खेळाडू नेहमीप्रमाणे ही काळजी घेतील आणि माझ्याप्रमाणे सुवर्ण क्षणाचा अनुभव घेतील यात शंका नाही. 

अलीकडच्या काळात प्रो-कबड्डी लीगमुळे खेळाचा चेहरा मोहरा बदलून गेला आहे. अनेक देशांचे खेळाडू या लीगमध्ये खेळत असल्यामुळे आता प्रत्येक खेळाडूला प्रतिस्पर्धी खेळाडूच्या खेळाची चांगली माहिती स्पर्धेपूर्वीच मिळण्यास मदत होते. तरी भारतीय कबड्डीला अजून आव्हान नाही हे सत्य कुणीच नाकारणार नाही. आपल्याकडे आक्रमण आणि बचावात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे सर्वच खेळाडू फॉर्ममध्ये आहेत.

संघातील प्रत्येक खेळाडू एकापेक्षा एक सरस आहेत. अशा वेळी संघ व्यवस्थापनासमोर अंतिम संघ निवडीची डोकेदुखी असते. त्यामुळे प्रशिक्षक आणि कर्णधाराची कसोटी लागते. प्रतिस्पर्धीला कमी न लेखणे आणि सुरवातीलाच पिछाडीवर राहणार नाही, याची काळजी घेतल्यास पुढचा मार्ग सोपा होतो. भारतीय खेळाडू नेहमीप्रमाणे ही काळजी घेतील आणि माझ्याप्रमाणे सुवर्ण क्षणाचा अनुभव घेतील यात शंका नाही. 

मी सॅफ स्पर्धेपासून भारतीय संघाकडून खेळण्यास सुरवात केली. एका संघासाठी खेळणे आणि देशासाठी खेळणे हा खूप मोठा फरक आहे. देशासाठी खेळण्याचे बाळगलेले स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद जसा होता, तसा देशासाठी सुवर्णपदक जिंकल्याचा अभिमानही होता. बीजिंगमध्ये 1990च्या स्पर्धेत मला ही संधी मिळाली. चीनविरुद्ध पहिला सामना आणि पहिली चढाई माझी आणि देशासाठी मिळविलेला पहिला गुण आजही आठवला की अंगावर रोमांच उभे राहतात. यापेक्षा सुवर्णपदकाचा आनंद याहूनही भन्नाट होता. अंतिम फेरीत गाठ होती पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी. त्यामुळे विजयाचा विश्‍वास असूनही वेगळेच मानसिक दडपण होते.

मैदानात उतरल्यावर अचूक नियोजनपूर्ण खेळ करून बाजी मारली. सुवर्णपदक जिंकले. ते जिंकणारच होतो; पण याचे महत्त्व वेगळे होते, कारण त्या संपूर्ण स्पर्धेत भारताला मिळालेले ते एकमेव सुवर्णपदक होते. माझ्या खेळाने त्या वेळी आशियाई स्पर्धेत भारताच्या नावावर पदकतालिकेत सुवर्णपदक नोंदले गेले होते. सुवर्णपदक घेताना छाती गर्वाने फुलली होती. भारताच्या राष्ट्रगीताचे सूर बीजिंगमध्ये पहिल्यांदा उमटत होते. प्रत्येक खेळाडूच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. ही स्थिती त्या वेळच्या विजयमंचावरची होती; पण हा क्षण आज जरी आठवला तरी डोळ्यांच्या कडा पाणवतात. 
शब्दांकन : ज्ञानेश भुरे 

संबंधित बातम्या