रोनाल्डोनेच मला संघात यायची विनंती केली; मग कसा नाही येणार

वृत्तसंस्था
Friday, 19 July 2019

युव्हेंटिसने नेदरलॅंडस्‌चा 19 वर्षीय फुटबॉलपटू मथायस डे लिग्त याच्यासाठी आठ कोटी 42 लाख डॉलर (579 कोटी) मोजले असल्याचे वृत्त आहे. मथायस याला पाच वर्षांसाठी ही रक्कम द्यावयाची असल्याने युव्हेंटिसला अतिरिक्त एक कोटी 18 लाख डॉलरही द्यावे लागणार आहेत. 

रोम : युव्हेंटिसने नेदरलॅंडस्‌चा 19 वर्षीय फुटबॉलपटू मथायस डे लिग्त याच्यासाठी आठ कोटी 42 लाख डॉलर (579 कोटी) मोजले असल्याचे वृत्त आहे. मथायस याला पाच वर्षांसाठी ही रक्कम द्यावयाची असल्याने युव्हेंटिसला अतिरिक्त एक कोटी 18 लाख डॉलरही द्यावे लागणार आहेत. 

खेळाडूंसाठी मोजलेली रक्कम लक्षात घेतल्यास मथायस हा युव्हेंटिसचा तिसरा महागडा खेळाडू ठरला आहे. त्यांनी सर्वाधिक 11 कोटी 80 लाख डॉलर गतवर्षी ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या खरेदीसाठी मोजले होते; तर त्यापूर्वी गोंझालो हिगुएन याच्यासाठी 2016 मध्ये 10 कोटी 10 लाख डॉलर दिले होते. आता मथायससाठी सुमारे 579 कोटी 84 लाख 98 हजार 725 रुपये मोजले आहेत. 

रोनाल्डोने मला युव्हेंटिसमध्ये दाखल होण्याची विनंती केली. युरोपिय नेशन्स लीगच्या वेळी आम्ही एकमेकांना भेटलो होतो, त्या वेळी त्याने हे सुचवले होते. 
- मथायस डे लिग्त

गतमोसमात ऍजॅक्‍सने चॅम्पियन्स लीगची उपांत्य फेरी गाठल्याने मथायससाठी अनेक संघ उत्सुक होते. त्यात मॅंचेस्टर युनायटेड, बार्सिलोना, तसेच पीएसजीने कसोशीने प्रयत्न केले होते. मथायसचा ऍजेक्‍स संघातील सहकारी फ्रॅंकी डे जॉंग याला बार्सिलोनाने खरेदी केले आहे. मथायसने ऍजॅक्‍सकडून 117 लढती खेळताना 13 गोल केले आहेत. त्याने चॅम्पियन्स लीग लढतीत युव्हेंटिसविरुद्ध ऍजॅक्‍सला उपांत्यपूर्व फेरीत विजयी करताना गोल केला होता.

तो नेदरलॅंडस्‌कडून 17 सामने खेळला आहे. गेल्या मोसमात तो ऍजॅक्‍सचा कर्णधार होता. वयाच्या 18 व्या वर्षीच त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. 

 


​ ​

संबंधित बातम्या