हम जहा जाते है वहा के कॅप्टन होते है!

शैलेश नागवेकर
Monday, 14 October 2019

आम्ही जेथे जातो त्याचे नेतृत्व करतो. असा बदल या डायलॉगमध्ये करायला हरकत नाही. भारतीय क्रिकेटमध्ये सौरव गांगुली हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. भारतीय क्रिकेटचा आता जो आलेख उंचावत आहे त्याचा पाया रचणारा कर्णधार ते भारतीय क्रिकेट मंडळाचा भावी अध्यक्ष असा सौरव गांगुलीचा प्रवास त्याचा जन्म नेतृत्व करण्यासाठीच झालाय हे सिद्ध करणारे आहे.

काही जणांचा जन्मच मुळात नेतृत्वासाठी झालेला असतो. राजकारणापासून ते खेळाच्या मैदानापर्यंत अनेक उदाहरणे सापडतील. ``हम जहा खडे होते है वहासे लाईन शुरू होती है`` सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा हा एका हिंदी चित्रपटातला डायलॉग अर्थपूर्ण आहे. आम्ही जेथे जातो त्याचे नेतृत्व करतो. असा बदल या डायलॉगमध्ये करायला हरकत नाही. भारतीय क्रिकेटमध्ये सौरव गांगुली हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. भारतीय क्रिकेटचा आता जो आलेख उंचावत आहे त्याचा पाया रचणारा कर्णधार ते भारतीय क्रिकेट मंडळाचा भावी अध्यक्ष असा सौरव गांगुलीचा प्रवास त्याचा जन्म नेतृत्व करण्यासाठीच झालाय हे सिद्ध करणारे आहे.

सौरव गांगुली होणार बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

..मी पाणी नेणार नाही !

सौरव गांगुलीने किती धावा केल्या किती विक्रम केले याचा माहिती कोणी ठेवत नाही पण गांगुलीने कर्णधार म्हणून किती आणि कसे विजय मिळवले याची आकडेवारी अभिमानाने सांगितली जाते. यातच सर्व स्पष्ट होते. 1992 मधील भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा. कपिलदेव, महम्मद अझरुद्दीन असे माजी दिग्गज खेळाडू सोबत सचिन तेंडुलकर, संजय मांजरेकरसारखे शिलेदार या संघात बंगालच्या एका नवोदित खेळाडूचा समावेश होता. बंगालमधील एक मोठ घराण त्यामुळे महाराजा अशीही ओळख तयार झालेली. बेन्सन आणि हेजेस करंडक तिरंगी एकदिवसीय मालिकेत अवघा एक सामना खेळायला मिळतो. याच मालिकेत एकदा राखीव खेळाडू म्हणून मैदानावर पाणी नेण्यास सांगण्यात येते.. मी असे काही करणार नाही असे बंगालच्या या युवकाने ठणकावून सांगितल्याची माहिती उघड झाली होती. तो युवक दुसरा तिसरा कोणी नसून सौरव होता. 

पुढे अपेक्षेप्रमाणे संघातून वगळण्यात आले. जवळपास चार वर्षे त्याचा विचारही झाला नाही. पण हार स्वीकारणे हे गांगुलीच्या रक्तातच नव्हते. लढवय्या हा त्याचा गुणविशेष रणजी, इराणी सामन्यात भरीव कामगिरी करत राहिला आणि 1996 च्या इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली. लॉर्डसवरील पहिल्या कसोटीतून संजय मांजरेकर आणि नवज्योत सिद्धू यांनी माघार घेतली आणि त्या ठिकाणी सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांना पदार्पणाची संधी मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या गांगुलीने पदार्पणात शतक केले आणि तेथूनच क्रिकेटचा खरा प्रवास सुरु झाला आणि आलेखही उंचावत गेला होता. 

कोणत्या परिस्थितीत गांगुली झाला कर्णधार

सन 2000 मध्ये भारतीय क्रिकेटमध्ये मॅचफिक्सिंगचा मोठा भुकंप झाला होता. भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोएनेचे फिकर्सबरोबरचे संभाषण दिल्ली पोलिसांनी टॅप केले आणि केवळ भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली होती. चौकशी सुरु झाली. मायदेशी परतल्यावर क्रोनिएने तत्कालीन भारतीय कर्णधार महम्मद अझरुद्दीनचे नाव घेतले. भारतीय पातळीवरील चौकशीत अझरसह अजय जडेजा, मनोज प्रभाकर यांच्यासह काही खेळाडूंवर ठपका ठेवण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठीच हा प्रकार नवा असल्याने वातवरण ढवळून निघाले होते. भारतीय चाहत्यांचाही खेळाडूंवरचा विश्वास उडू लागला होता. पण दुसरीकडे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि सौरव गांगुली असे सज्जन क्रिकेटपटू होते. चाहत्यांचा विश्वास पुन्हा मिळवायचा असेल तर नव्याने रचना करण्याची गरज होती. कोणी तरी सक्षम नेतृत्व पुढे यायला हवे होते. त्या अगोदर सचिन तेंडुलकर त्याची कर्णधारपदाची इनिंग खेळलेला होता. त्यामुळे गांगुलीवर जबाबदारी देण्यात आली आणि तेथूनच भारताच्या प्रगतीची मूहूर्तमेठ रोवली होती.

Image result for sourav ganguly captain hd images

खडूस कर्णधार

गांगुलीने नेतृत्व स्वीकारल्यानंतर काही महिन्यातच जग जिंकणारा सिकंदर स्टीव वॉ आता शिल्लक राहिलेली भारत भूमी जिंकायला आला होता. त्याच्या स्वतःसह बंधू मार्क वॉ,  मॅथ्यू हेडन, अॅडम गिलख्रिस्ट, रिकी पाँटिंग, ग्लेन मॅकग्रा आणि शेन वॉर्न असे सर्वोत्तम योद्धे ऑस्ट्रेलियात होते. मुंबईतील पहिल्या कसोटीत गांगुलीच्या टीमला चारीमुंड्या चीत केल्यानंतर गांगुली खर तर खेळाडूंवर भडकला होता, पण मिडियासमोर सहकाऱ्यांची बाजू घेऊन लढत होता. पुढचा सामना कोलकत्यात म्हणजे गांगुलीच्या होम ग्राऊंडवर. पहिल्या डावात फॉलोऑन...पराभव आ वासून उभा पण चमत्कार घडला व्ही व्ही एस. लक्ष्मणची ऐतिहासिक 281 धावांची खेळी आणि राहुल द्रविडच्या 180 धावांनंतर हरभजनचे सहा बळी यामुळे भारताने सामना जिंकला पण अभेद्य ऑस्ट्रेलिया पराभूत करता येऊ शकते हे जगाला कळून चुकले पुढचा चेन्नईतील सामनाही जिंकून भारताने मालिका जिंकली आणि गांगुलीच्या नेतृत्वाचा आणि टीम इंडियाचा यशाचा इतिहास रचला गेला.

Image result for sourav ganguly captain hd images

जशास तसे

ऑस्ट्रेलियाच्या याच भारत दौऱ्यात एका सामन्यात नाणेफेकीसाठी स्टीव वॉला काही काळ वाट पहायला लावणारा गांगुली आणि लॉर्डसवर जेथे सुटा बुटात येण्याची परंपरा जपली जाते तेथे विजयानंतर टी शर्ट काढून जल्लोष करणारा गांगुली आक्रमकतेत आणि जशास जसे उत्तर देण्यात विराट कोहलीपेक्षाही पुढे होता. इंग्लंडचा अष्टपैलून फ्लिन्टॉफने  काही महिने अगोदर मुंबईत त्याचा इंग्लंड संघ जिंकल्यावर असेच सेलिब्रेशन केले होते. गांगुलीच्या या कणखर नेतृत्वाची दखल एव्हाना क्रिकेट विश्वाने घेतली होती. कारण तोपर्यंत भारताला प्रामुख्याने गोऱ्या खेळाडूंच्या संघाकडून दुय्यम वागणूक मिळत होती.

Image result for sourav ganguly captain hd images

वर्ल्डकप थोडक्यात हुकला

2003 च्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताची कामगिरी सुरुवातीला फारच निराशाजनक होत होती, पण येथेही कर्णधार म्हणून गांगुली पुढे आला आणि संघात नवचैतन्य निर्माण केले त्याचे रुपांतर संघाला  अंतिम सामन्यात स्थान मिळवून देण्यापर्यंत झाले. आत्ता सर्वच जण मैदानावर हडर्स करताना दिसतात पण याची सुरुवात गांगुलीने केली होती. अंतिम सामन्यात गणिते चुकली नसती तर आज गांगुलीची विश्वविजेता कर्णधार म्हणूनही ओखळ झाली असती. 

Image result for 2003 world cup sourav ganguly captain hd images

जेमतेम वर्षभराचा कालावधी

लोढा शिफारशीनुसार गांगुलीचा बंगाल क्रिकेट संघटनेतीलही प्रशासनाचा कालावधी मोजला जाणार आहे त्यामुळे आता बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची त्याची इनिंग दहा महिन्यांची असेल. पण त्याचे नाव गांगुली आहे त्याला ठसा उमटवण्यास तेवढा कालावधीही पुरेसा ठरेल. मॅचफिक्सिंगनंतर भारतीय संघाची विस्कटलेली घडी गांगुलीने नेतृत्व स्वीकारून बसवली होती आता 33 महिने प्रशासकांच्या हाती असलेला बीसीसीआयचा कारभार स्वीकारून प्रशासनाचीही घडी पुन्हा व्यवस्थित करण्याची जबाबदारी गांगुलीवर असणार आहे त्यासाठी त्याला शुभेच्छा !!

 


​ ​

संबंधित बातम्या