World Cup 2019 : जोफ्रा आर्चर, नुसता एक्स फॅक्टर नाही तर फिअर फॅक्टर सुद्धा

मुकुंद पोतदार
Friday, 31 May 2019

आमलास त्याने जायबंदी केले त्या चेंडूचा वेग ताशी 144 किलोमीटर होता आणि तो या सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरला असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही

वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे आकर्षण कोण ठरणार याची चर्चा गेल्या वर्षा-दोन वर्षांपासून सुरु होती. महिन्या-दिड महिन्यापूर्वी या चर्चेत अशा एका खेळाडूचे नाव आघाडीवर आले, जो मुळ संघातही नव्हता. संघ जाहीर करण्याची अंतिम मुदत उलटण्यापूर्वी त्याची संघात निवड झाली. यानंतर या चर्चेला आणखी वेग आला. पुढे जाऊन हा खेळाडू अंतिम संघात म्हणजे प्लेईंग इलेव्हनमध्ये असणार का या चर्चेला प्रारंभ झाला. प्रत्येक बाबतीत चर्चा वाढण्याचे कारण म्हणजे तज्ञ आणि चाहत्यांच्या अपेक्षेनुसार घडत गेले. परिणामी चर्चा वाढत गेली.

मग प्रत्यक्ष तो खेळला आणि मग त्याने आपली चर्चा उगाचच होत नव्हती हे सप्रमाण सिद्ध केले. त्याने प्रतिस्पर्धी संघातीलच नव्हे तर सर्व सहभागी संघांमधील आजघडीच्या एका सर्वाधिक तंत्रशुद्ध फलंदाजाला जायबंदी केले. त्याने संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याने प्रतिस्पर्धी कर्णधाराला बाद केले. त्याने जम बसलेल्या फलंदाजाचा अडथळा दूर केला. तीन फलंदाज आऊट करीत त्याने X फॅक्टर, तर एका फलंदाजाला नॉक-आऊट करीत त्याने फिअर फॅक्टर (Fear Factor) प्रदर्शित करीत वर्ल्ड कपचे व्यासपीठ दणाणून सोडले.

हा खेळाडू आहे इंग्लंडचा तरुण अन्् तेजतर्रार वेगवान वीर जोफ्रा आर्चर. आर्चरचा अंतिम संघातील सहभाग, त्याला निवडल्यानंतर नेमकी गोलंदाजी कधी मिळणार हे उत्सुकतेचे विषय होते. अशावेळी कर्णधार इयॉन मॉर्गनची पॉलिसी काय असेल याला महत्त्व होते. मॉर्गनने नवा चेंडू त्याच्याकडे सोपविला. दुसऱ्या ओव्हरसाठी आर्चरला पाचारण करीत त्याने X Factor बरोबर लागू केला. आता बॉल आर्चरच्या कोर्टात होता. पॉवरप्लेमध्ये दहा पैकी पाच म्हणजे निम्या ओव्हर्स आर्चरने टाकल्या. त्यात त्याने 20 धावा देत दोन विकेट घेतल्या. 

हशिम आमलाने चौथ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला होता, पण आर्चरने पाचव्या चेंडूवर त्याला नॉक-आऊट केले. हेल्मेट असूनही कपाळाला चेंडू लागल्याने आमलास रिटायर्ट हर्ट व्हावे लागले. ऑस्ट्रेलियात फिल जेक्स याचा चेंडू लागून दुर्दैवी मृत्यु झाल्यापासून जगभरात फलंदाजांच्या डोके, चेहऱ्यावरील दुखापतींकडे गांभीर्याने पाहिले जाते. आमलाने त्यानंतर मैदान सोडले. दोन वेळा त्याच्या दुखापतीचा डॉक्टरांनी नीट आढावा घेतला आणि त्यानंतरच त्याला परवानगी देण्यात आली. 

आर्चरने कुणालाही आऊट करण्यापूर्वीच आमलास नॉक-आऊट करणे म्हणजे इंग्लंडने मानसिक लढाऊ जिंकणे आणि दक्षिण आफ्रिकेने गमावणे ठरले. त्रिशतकी धावसंख्येचे आव्हान असताना आमलाची कामगिरी महत्त्वाची ठरणार होती. अशावेळी आर्चरने त्याला जायबंदी करण्याने आफ्रिकेची नाकेबंदी झाली. आर्चरने मग एडन मार्करम आणि फाफ डूप्लेसी यांना अनुक्रमे आठव्या आणि दहाव्या षटकात टिपले. पहिल्या दोन्ही विकेट त्याने टिपल्या. 

पॉवरप्लेमध्ये आफ्रिकेला केवळ 44 धावा करता आल्या. यात ख्रिस वोक्स यानेही आपला वाटा उचलला होता. अर्थात निर्णायक घाव घातला तो आर्चरने. मग त्याने जम बसलेल्या रॅसी वॅन डर डुसेन याची अर्धशतकी खेळी संपुष्टात आणली. त्यावेळी आफ्रिकेचा डाव स्थिरावत होता. त्यामुळे मॉर्गनने 32व्या षटकासाठी आर्चरला पाचारण केले. वॅन डर डुसेनला आर्चरने पहिले चार डॉट बॉल्स टाकले. त्यामुळे दडपण येऊन अखेर पाचव्या चेंडूवर वॅन डर डुसेन बाद झाला. उसळत्या चेंडूवर त्याचा शॉट चुकला. मग आमला पुन्हा फलंदाजीला आला. त्याला आर्चरने टाकलेल्या डॉट बॉलचा वेग होता ताशी 141 किलोमीटर. हे षटक त्याने निर्धाव टाकत संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्याच्या गोलंदाजीमुळे इंग्लंडने अगदी सहज विजयाचा मार्ग धरला.  अर्थात आमलास त्याने जायबंदी केले त्या चेंडूचा वेग ताशी 144 किलोमीटर होता आणि तो या सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरला असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

आर्चरचा जन्म एक एप्रिल 1995 रोजी बार्बाडोसमधील ब्रिजटाऊमध्ये झाला. बार्बाडोसमध्ये जन्मलेल्यांना Bajan असे संबोधले जाते. या संदर्भात आर्चरला बजन बॉम्बर असे एक बिरूद लाभले आहे. तशा काही कमेंट््स सोशल मिडीयावर पडत आहेत. हे बिरूद समप्रक वाटते. अर्थात यापुढे सुद्धा आर्चरला वेगवेगळी विशेषणे बहाल केली जातील. आता कुठे त्याची कारकिर्द सुरु झाली आहे. इंग्लंडच्या मिशनला त्याने सुरवात चांगली करून दिली आहे.


​ ​

संबंधित बातम्या