Asian Games 2018 : बेरोजगार मनजीतने जिंकले सुवर्ण

वृत्तसंस्था
Tuesday, 28 August 2018

800 मीटरचे यापूर्वीचे सुवर्णपदक विजेते 
रणजित सिंग - 1951 
भोगेश्‍वर बरुआ - 1966 
श्रीराम सिंग - 1974 
श्रीराम सिंग - 1978 
चार्ल्स बोरोमिओ - 1982 

जाकार्ता : आशियाई क्रीडा स्पर्धेतील ऍथलेटिक्‍समधील पुरुषांच्या आठशे मीटर शर्यतीत मनजितने तमाम तज्ज्ञांचे अंदाज चुकवत भारताच्याच जिन्सॉनला मागे टाकून सुवर्णपदक पटकावले. सुवर्णपदकाच्या शर्यतीत पहिली पसंती मिळालेल्या जिन्सॉनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याच वेळी पहिल्यावहिल्या मिश्र रिलेत भारताच्या महंमद अनस, पुवम्मा, हिमा दास आणि अरोक्‍य राजीव यांनी रौप्यपदक पटाकावले. पहिले सुवर्ण बहारिनने मिळविले. 200 मीटर शर्यतीत द्युती अंतिम फेरीत पोचली, तर हिमा अपात्र ठरली. संजीवनी पाच हजार मीटर शर्यतीतही अपयशी ठरली. 

36 वर्षांनी सुवर्ण 
या वेळी 800 मीटर शर्यतीत सुवर्णपदकासाठी सर्वांच्या नजरा जिन्सॉन जॉन्सनवर होत्या. कारण तो यंदा आशियाई क्रमवारीत आघाडीवर होता. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून जिन्सॉनच्या मागे सावलीसारखा राहणाऱ्या मनजित सिंगने शेवटच्या 60 मीटरमध्ये सर्वस्व झोकून दिले आणि भारताला तब्बल 36 वर्षांनंतर सुवर्णपदक मिळवून दिले. आठशे मीटर शर्यतीत भारताने शेवटचे पदक 2002 च्या स्पर्धेत मिळविले होते. त्या वेळी के. एम. बिनूने रौप्यपदक जिंकले होते. कतारचा अब्दुल अबुबाकर, इराणचा आमीर मोरादी आणि केनियातून बहरीनमध्ये आलेला अब्राहम रोटीच यांनी वेगवान सुरवात केली. जॉन्सनने त्यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या शंभर मीटरमध्ये जॉन्सनने वेग वाढविला, त्याच वेळी मनजित सिंगने मुसंडी मारली आणि सर्वांना चकीत करीत 1 मिनिट 46.15 सेकंदांत सुवर्णपदक जिंकले. पाच वर्षांपूर्वी पुणे येथे झालेल्या आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेत त्याला चौथे स्थान मिळाले होते. मनजीत सध्या बेरोजगार असून, त्याने मिळविलेले सुवर्ण हे अनपेक्षित आहे.

हिमा दास अपात्र 
महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकणाऱ्या द्युतीचंदने दोनशे मीटरच्या उपांत्य फेरीत अव्वल स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. तिने 23.00 सेकंद वेळ नोंदवली. दुसऱ्या उपांत्य शर्यतीत हिमा दास पहिल्या लेनमध्ये होती. सर्व सज्ज झाल्यावर पंचांनी "फायर' करण्यापूर्वीच हिमाने धावण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आले. दीड तासानंतर होणाऱ्या 4-400 मिश्र रिलेत धावायचे असल्याने हिमाने मुद्दामपणे स्वतःला अपात्र करून घेतले, असे तिची कृती पाहून वाटते, अशी भावना अनेकांची झाली. 

संजीवनी पुन्हा अडखळली 
नाशिकच्याच कविता राऊतप्रमाणे आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचे संजीवनी जाधवचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. दहा हजार मीटर शर्यतीत अपयशी ठरल्यानंतर पाच हजार मीटर शर्यतीतही ती चमकदार कामगिरी करू शकली नाही. तिला सातवे (15 मि.52.96 सेकंद) आणि दुसरी भारतीय एल. सूर्याला पाचवे (15 मि.49.30 सेकंद) स्थान मिळाले. 

हेप्टॅथलॉनमध्ये संधी 
हेप्टथलॉनमध्ये भारताला पदकाची संधी असून, चार इव्हेंटनंतर जायबंदी जबड्यासह सहभागी झालेली स्वप्ना बर्मन 3481 गुणांसह दुसऱ्या, तर पूर्णिमा हेम्ब्रम 3424 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. डावा जबडा वेदनाशामक पट्या लावून सहभागी झालेल्या स्वप्नाचे विशेष कौतुक करण्यात आले. महिलांच्या भालाफेकीत ऐनवेळी भारतीय संघात स्थान मिळालेल्या राष्ट्रीय विक्रमवीर अनू राणीला केवळ 53.93 मीटरवर भाला फेकता आला. त्यामुळे ती सहावी आली. 

मिश्र रिलेत रौप्यपदक 
ऍथलेटिक्‍समध्ये ग्लॅमर आणण्याच्या दृष्टीने प्रथमच समावेश करण्यात आलेल्या 4-400 मिश्र रिलेत बहरीनने (3मि.11.89 सेकंद) सुवर्णपदक जिंकले. भारताला रौप्यपदकावर (3 मि.15.78 सेकंद) समाधान मानावे लागले. भारताने महंमद अनस, पुवम्मा, हिमा दास आणि आरोक्‍य राजीव, तर बहरीनने खमीस अली, अडीयोका, नासेर सल्वा आणि अब्बासला उतरविले होते. अनसने आघाडी मिळवून दिल्यानंतर पुवम्माची ताकद कमी पडल्याने भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 
--------------------- 
800 मीटरचे यापूर्वीचे सुवर्णपदक विजेते 
रणजित सिंग - 1951 
भोगेश्‍वर बरुआ - 1966 
श्रीराम सिंग - 1974 
श्रीराम सिंग - 1978 
चार्ल्स बोरोमिओ - 1982 
--------------------- 
एकाच स्पर्धेत दोन पदके (भारतीय) 
1951 - सुवर्ण व रौप्य 
1962 - रौप्य व ब्रॉंझ 


​ ​

संबंधित बातम्या