भारतीय वेगवान गोलंदाजीचा नवा 'पोस्टर बॉय'!

वृत्तसंस्था
Wednesday, 22 August 2018

कारकिर्दीतील केवळ चौथाच कसोटी क्रिकेट सामना खेळणार्‍या जसप्रित बुमराने इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडविली. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या कसोटीत भारत विजयच्या उंबरठ्यावर पोचला आहे. पहिल्या चार कसोटींमध्येच डावात पाच गडी बाद करण्याची किमया दोन वेळा बुमराने करून दाखविली आहे.

नॉटिंगहम : कारकिर्दीतील केवळ चौथाच कसोटी क्रिकेट सामना खेळणार्‍या जसप्रित बुमराने इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडविली. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या कसोटीत भारत विजयच्या उंबरठ्यावर पोचला आहे. पहिल्या चार कसोटींमध्येच डावात पाच गडी बाद करण्याची किमया दोन वेळा बुमराने करून दाखविली आहे.

ट्वेंटी-२० आणि वन-डेमध्ये अचूक गोलंदाजी करून 'डेथ ओव्हर स्पेशालिस्ट' म्हणून बुमराचा लौकिक झाला आहे. याच प्रभावी कामगिरीच्या जोरावर बुमराला कसोटीमध्येही संधी मिळाली. पहिल्या चार सामन्यांमध्येच त्याने उपयुक्तता सिद्ध केली आहे. 

कारकिर्दीच्या सुरवातीलाच बुमराने दक्षिण आफ्रिकेत एका डावात पाच गडी बाद करण्याची कामगिरी केली. आता इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्येच त्याने ही कामगिरी करून दाखविली. 

तिसर्‍या सामन्यात बुमराने इंग्लंडच्या दुसर्‍या डावात फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले. बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी संघाची पडझड रोखून धरत प्रतिकार केला. त्यावेळी भारतीयांना विकेट घेण्याची संधी मिळत नव्हती. दुसरा नवा चेंडू उपलब्ध झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने बुमराला गोलंदाजीस पाचारण केले. 

या नव्या चेंडूवर कमाल करत बुमराने अवघ्या आठ चेंडूंमध्ये बटलर, बेअरस्टॉ, वोक्स यांना बाद केले. त्याने टप्पा आणि दिशेवर उत्तम नियंत्रण राखले. त्याने टाकलेल्या 29 षटकांमध्ये त्याने चांगल्या टप्प्यावर मारा केला, वेगवान बाऊंसरही टाकले. 

अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला पहिल्या दोन कसोटी सामन्यांनी मुकावे लागले. या काळात त्याने सामने टिव्हीवर पाहून आपल्या गोलंदाजीवर काम केले. ख्रिस वोक्स उसळते चेंडू खेळताना चाचपडतो, हे पाहून त्याने तशी व्यूहरचना रचत त्याला बाद केले. इंग्लंडविरुद्धचा चौथा सामना रोझ बोल येथे खेळला जाणार आहे. या मैदानाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला अनुकूल असल्याने इंग्लंडच्या फलंदाजांसाठी बुमरा अधिक धोकादायक होईल यात शंका नाही.

संबंधित बातम्या