मनू भाकर, मोबाईल बंद ठेव तरच पदक मिळेल 

वृत्तसंस्था
Wednesday, 27 February 2019

भारताची गुणवान नेमबाज मनू भाकर तसेच अनुभवी हीना सिद्धूला विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीही गाठता आली नाही. त्यामुळे चिडलेल्या जसपाल राणाने मोबाईलसह सोशल मीडिया बंद ठेवा. सरावावर पूर्ण लक्ष केंद्रित करा, असे भारतीय नेमबाजांना सुनावले.

मुंबई/नवी दिल्ली : भारताची गुणवान नेमबाज मनू भाकर तसेच अनुभवी हीना सिद्धूला विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीही गाठता आली नाही. त्यामुळे चिडलेल्या जसपाल राणाने मोबाईलसह सोशल मीडिया बंद ठेवा. सरावावर पूर्ण लक्ष केंद्रित करा, असे भारतीय नेमबाजांना सुनावले. अनिष भानवाला याचा 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेतील पाचवा क्रमांक हीच भारतासाठी जमेची बाब ठरली. 

डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवरील या स्पर्धेत भारतास आज मनू तसेच हीनाकडून पदकाची आशा होती. मनू 25 मीटर पिस्तूल प्रकारात पाचवी आली होती. आजच्या दहा मीटर स्पर्धेत ती प्रगती करेल अशी आशा होती; पण 573 गुणच प्राथमिक फेरीत मिळवू शकली आणि चौदाव्या स्थानावर राहिली. अनुराधा 22 वी तर हीना 25 वी आली. दोघींचे 571 गुणच झाले. 

मनूच्या अपयशामुळे जसपाल राणा संतप्त झाले होते. त्यांनी थेट मनूचे नाव घेतले नाही; पण नवोदित नेमबाजांना लक्ष्य केले. जे नेमबाज शिस्तीला महत्त्व देतात, मोबाईल दूर ठेवतात, खेळाव्यतिरिक्त अन्य गोष्टीत लक्ष केंद्रित करीत नाहीत, ते चांगली कामगिरी करीत आहेत. नवोदित नेमबाजांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कोटा या स्पर्धेत मिळाला नाही, तर पुढील स्पर्धेत मिळेल; पण तेच लक्ष्य असू नये, असे जसपाल यांनी सांगितले. 

पाकिस्तानच्या नेमबाजांना व्हिसा नाकारल्यामुळे जास्त चर्चेत राहिलेल्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत भारताचे पदकाचे आशास्थान असलेला अनिष भानवाल पाचवा आला. अवघ्या दोन दिवसांपूर्वी ऑलिंपिक कोटा मिळवलेल्या सौरभने अंतिम फेरीत चांगली सुरवात केली होती; पण चौथ्या फेरीतील पाचपैकी एकच अचूकता साधल्याने त्याला काही वेळातच स्पर्धेबाहेर जाण्याची वेळ आली. अनिषचे सहकारी आदर्श सिंग (582) आणि अर्पित गोयल (580) अंतिम फेरीपासून दूर राहिले. आदर्श 11 वा तर अर्पित 12 वा आला. महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये एन गायत्री आणि सुनिधी चौहान या अंतिम फेरीपासून खूपच दूर राहिल्या. गायत्री 36 व्या तर सुनिधी 49 व्या क्रमांकावर गेली. याच प्रकारात तेजस्विनी सावंत सोमवारीच एलिमिनेटरमध्ये बाद झाली होती. 
 


​ ​

संबंधित बातम्या