Target_2021 : ज्योती म्हणते; कटू आठवणी विसरून नव्याने आयुष्याची सुरुवात करेन

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 3 January 2021

कोरोनामुळे स्पर्धांसह नियमित प्रॅक्टिस बंद राहिल्याने करिअरमधील महत्त्वाचे सात-आठ महिने वाया गेले. खेळाडूंसाठी हा काळ खूपच वेदनादायी होता. त्यामुळे आता नव्याने सुरुवात करून स्वप्न साकार करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्य गाठण्यात अडचणी येणार हे अपेक्षित ठेवूनच मी मानसिक तयारी करणार आहे.  -ज्योती चौहान, आंतरराष्ट्रीय धावपटू

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर अचानक लागलेल्या लॉकडाउनने संपूर्ण क्रीडा विश्वालाच मोठा फटका बसला. या संकटातून नागपूरकर खेळाडूही स्वतःला वाचवू शकले नाहीत. या काळात स्पर्धांसह नियमित प्रॅक्टिस बंद झाल्याने जवळपास सात ते आठ महिने घरी बसावे लागले. खेळाडूंसाठी हा अनुभव खूपच वेदनादायी होता. कोरोनामुळे करिअरमधलं महत्त्वाचं वर्ष वाया गेलं. त्यामुळे आता नव्याने सुरुवात करून उभारी घ्यावी लागणार असल्याचे मत, आंतरराष्ट्रीय महिला धावपटू ज्योती चौहान हिने व्यक्त केले. 

कोरोनाकाळातील अनुभव सांगताना ज्योती म्हणाली, भोपाळच्या 'सेंटर फॉर एक्सलन्स'मध्ये निवासी प्रशिक्षण घेत असताना कोरोनाची वार्ता कानावर पडली. त्यानंतर लॉकडाउन लागण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने ताबडतोब सेंटरमधील खेळाडूंना आपापल्या घरी जाण्यास सांगितले. धावपळ करीत नागपूर गाठल्यानंतर घरातच कोंडून राहावे लागले. त्यामुळे कित्येक दिवस सरावासाठी मैदानावर जाऊ शकली नाही. स्पर्धाही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. घरीच वर्कआऊट व फिटनेस केला. परिस्थिती नाजूक असल्यामुळे दोन वेळच्या जेवणाचेही वांधे होते. अशा परिस्थितीत घरच्यांना जेवण व अन्नधान्यासाठी रांगेत उभे राहावे लागले. 'सकाळ' मध्ये बातमी आल्यानंतर बरीच आर्थिक मदत झाली. शिवाय राज्य सरकारकडूनही 25 हजार रुपये मिळाले. कोरोनाकाळात खूपच त्रास झाला. प्रचंड वेदना दिल्या. हा अनुभव आयुष्यात कदापि विसरू शकत नाही. नोव्हेंबरमध्ये 'अनलॉक' झाल्यानंतर पुन्हा भोपाळला परतली. मात्र संकटाने तिथेही माझा पिच्छा सोडला नाही. कोणतेही कारण न देता मला सेंटरमधून जाण्यास सांगितले. त्यामुळे आता नाइलाजाने घरी परतत आहे. मधल्या काळात दिल्ली मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. दुर्दैवाने तब्येत बिघडल्याने पहिल्या तीनमध्ये येऊ शकली नाही. 

Target_2021 : खेळाडू शेवटच्या श्वासापर्यंत 'हम होंगे कामयाब' याच जोमाने लढत राहतो

कटू आठवणी विसरून आता नव्याने आयुष्याची सुरुवात करणार आहे. काही दिवस हिंगण्यातील प्रियदर्शिनी कॉलेज व नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर सराव केल्यानंतर भविष्यातील स्पर्धांच्या तयारीला लागणार आहे. त्यासाठी लवकरच बंगळूरला जाणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धा माझे पहिले टार्गेट आहे. याशिवाय २०२२ मधील आशियाई स्पर्धेसाठीही मला पात्र व्हायचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्य गाठण्यात अडचणी येणार हे अपेक्षित ठेवूनच मी मानसिक तयारी करणार आहे. इसासनी येथील झोपडपट्‌टीत राहणाऱ्या २५ वर्षीय ज्योतीने परिस्थितीवर मात करत अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मैदानी तसेच मॅरेथॉन स्पर्धांमध्ये शंभराच्या वर पदके जिंकून नागपूर व विदर्भाला नावलौकिक मिळवून दिला आहे. गतवर्षी (जुलै २०१९ मध्ये) इटली येथे झालेल्या 'वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स'मध्ये तिला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाला पदक मिळवून देण्याचे तिचे स्वप्न आहे. शिवाय उदरनिर्वाहासाठी नोकरीही मिळविण्याचा तिचा प्रयत्न राहणार आहे. 

(शब्दांकन : नरेंद्र चोरे) 

 


​ ​

संबंधित बातम्या