पाकविरुद्धची डेव्हिस करंडक लढत त्रयस्थ केंद्रावर खेळविण्यास आयटीएफची मान्यता

वृत्तसंस्था
Tuesday, 5 November 2019

- भारताची पाकिस्तानविरुद्ध होणारी डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धेची लढत त्रयस्थ केंद्रावर खेळविण्यास सोमवारी आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेने मान्यता दिली.

- भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील तणावपूर्ण संबंध लक्षात घेता सुरेक्षाच्या मुद्यावर हा निर्णय घेण्यात आला असून, लढत 29 आणि 30 नोव्हेंबरलाच होईल.

- डेव्हिस करंडक स्पर्धेच्या नियमानुसार आता पाकिस्तान टेनिस महासंघ लढतीचे केंद्र निश्‍चित करेल

नवी दिल्ली -  भारताची पाकिस्तानविरुद्ध होणारी डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धेची लढत त्रयस्थ केंद्रावर खेळविण्यास सोमवारी आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेने मान्यता दिली. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील तणावपूर्ण संबंध लक्षात घेता सुरेक्षाच्या मुद्यावर हा निर्णय घेण्यात आला असून, लढत 29 आणि 30 नोव्हेंबरलाच होईल. 
भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यामुळे "एआयटीए'ने आंतरराष्ट्रीय संघटनेकडे वारंवार ही लढत अन्यत्र हलविण्याची विनंती केली होती. "आयटीएफ'कडून पाकिस्तानातील इस्लामाबाद या लढतीच्या केंद्राची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नव्याने पाहणी केल्यावर हा निर्णय घेण्यात आला. 
आयटीएफच्या स्वतंत्र सुरक्षा पथकाने इस्लामाबाद येथील सुरक्षा व्यवस्थेचा फेर आढावा घेऊन डेव्हिस करंडक समितीला अहवाल दिला होता. या अहवालाचा आधार घेत डेव्हिस करंडक समितीने आशिया-ओशियाना ही गट 1 मधील लढत त्रयस्थ केंद्रावर खेळविण्याचा निर्णय घेतला. खेळाडू, तंत्रज्ञ आणि प्रेक्षक यांच्या सुरक्षेला "आयटीएफ' आणि डेव्हिस करंडक समितीने नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सुरक्षेचा विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतला, असे समितीने आपल्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 
दरम्यान, "एआयटीए'ने लढत पाकिस्तानात होणार हे गृहित धरुन आपल्या दुसऱ्या फळीच्या संघातील खेळाडूंची नावे पाकिस्तानकडे पाठविली होती. तसेच, आजच त्यांनी न खेळणारे कर्णधार म्हणून रोहित राजपाल यांची नियुक्तीही केली होती. आता "एआयटीए' या लढतीसाठी हीच नावे कायम ठेवणार की आपला प्रमुख खेळाडूंचा संघ उतरविणार याकडे लक्ष लागून असेल. "एआयटीए'ने मुख्य फळीचा संघ उतरविण्याचा निर्णय घेतला, तरी प्रज्ञेश गुणेश्‍वरन आणि दिवीज शरण हे खेळाडू या लढतीत खेळू शकणार नाही. प्रज्ञेशचे लढतीच्या पहिल्याच दिवशी लग्न आहे, तर दिवीजने लग्नानंतर काही दिवस विश्रांती मागितली आहे. या दोघांना "एआयटीए'ने मान्यता दिली आहे. 
------------- 
केंद्र पाकिस्तान ठरविणार 
डेव्हिस करंडक स्पर्धेच्या नियमानुसार आता पाकिस्तान टेनिस महासंघ लढतीचे केंद्र निश्‍चित करेल. यासाठी पाकिस्तानला पाच दिवसाचा अवधी असेल. पाकिस्तानने केंद्र सुचविल्यानंतर त्या केंद्राची मान्यता मिळविल्यावरच केंद्राची अंतिम घोषणा करण्यात येईल.


​ ​

संबंधित बातम्या