कोरोनाचा विळखा घट्ट होत असलेल्या देशात खेळ सुरु करणं घोडचूक ठरेल : रोनाल्डो

टीम ई-सकाळ
Saturday, 20 June 2020

आत्तापर्यंत १० लाख ३२ हजार ९१३ जणांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. व मृत्यूची संख्या ५० हजार पर्यंत पोहचली आहे. दरदिवसाला जगात सर्वात अधिक कोरोना बाधित रुग्ण आता ब्राझील मध्ये सापडत आहेत. मागील २४ तासात ब्राझीलमध्ये ५५ हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.  

ब्राझीलचा फुटबॉलपटू रोनाल्डोने कोरोना काळात देशात सुरु असलेल्या फुटबॉलच्या सामन्यांच्या आयोजनावर टीका केली आहे. ब्राझीलमध्ये गुरुवारी १८ तारखेपासून रिओ दि जेनीरो येथील मैदानावर कैरीओका फुटबॉल चैम्पियनशिपचे सामने सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे ब्राझीलचा माजी फुटबॉलपटू रोनाल्डोने फुटबॉल सामन्यांच्या आयोजनावर जाहीर विरोध केला असून, ही मोठी घोडचूक ठरणार असल्याचे म्हटले आहे. गुरुवारी ब्राझीलमध्ये फ्लेमेंगो आणि बेंगु या संघात सामना घेण्यात आला होता.

कोरोनाच्या धास्तीमुळे जगातील सर्वच खेळांचे आयोजन थांबविण्यात आले होते. त्यानंतर जवळपास तीन महिन्यांनी कोरोनाची खबरदारी घेत खेळ जगत पुन्हा मैदानावर येत आहे. जर्मनीच्या बुन्देसलीगा लीग व स्पेनच्या ला लिगा नंतर आता, ब्राझील मध्ये देखील फुटबॉल सामन्यांच्या आयोजनास सुरवात झालेली आहे. ब्राझीलच्या रिओ दि जेनीरो येथील मैदानावर गुरुवारी कैरीओका फुटबॉल चैम्पियनशिपमधील फ्लेमेंगो आणि बेंगु या संघात सामना खेळवण्यात आला. मात्र त्यानंतर ब्राझीलचा माजी फुटबॉलपटू रोनाल्डोने सामन्यांच्या या आयोजनासंदर्भात जाहीर टीका केली असून, देशातील सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे करियोका आणि ब्राजील फुटबॉल यांच्या पुनरागमनाला आपला विरोध असल्याचे म्हटले आहे. यासोबतच ब्राझीलमध्ये कोरोना महामारीचा कोणताही विचार न करता केवळ यूरोपातील काही देशांत फुटबॉलचे सामने सुरु झाले म्हणून, त्याचेच अनुकरण ब्राझील करत असल्याचा आरोप रोनाल्डोने केला आहे.                       

स्पॅनिश क्लब मधील रिअल व्लाडोलीड या संघाचा मालक असलेल्या ४३ वर्षीय रोनाल्डोने, यूरोपातील बऱ्याच देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्यामुळेच मागील काही दिवसांपासून फुटबॉलच्या सामन्यांचे आयोजन करण्यास सुरुवात झाल्याचे अधोरेखित केले. मात्र  ब्राझील मधील सध्याची परिस्थिती यूरोपच्या बरोबर उलट असून, अत्यंत नाजूक आहे. आणि त्यामुळेच ब्राझीलमध्ये फुटबॉल सामन्यांचे आयोजन करणे ही मोठी चूक ठरणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, ब्राझील मध्ये कोरोनाने हाहाकार उडवलेला असून, आत्तापर्यंत १० लाख ३२ हजार ९१३ जणांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. व मृत्यूची संख्या ५० हजार पर्यंत पोहचली आहे. दरदिवसाला जगात सर्वात अधिक कोरोना बाधित रुग्ण आता ब्राझील मध्ये सापडत आहेत. मागील २४ तासात ब्राझीलमध्ये ५५ हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.  

 

 


​ ​

संबंधित बातम्या