फलंदाजांनीच टाकला नाही नांगर, त्याला काय करणार बांगर ?

मुकुंद पोतदार
Tuesday, 30 July 2019

स्टायलीश फलंदाजांमुळेच कचरा, तरिही बांगर बळीचा बकरा ?वर्ल्ड कपमध्ये भारताचा डाव उपांत्य फेरीत मोडला गेला त्यास फलंदाज कारणीभूत ठरले. पहिले तीन मोहरे केवळ भोपळा न फोडता 
परतले. इतरांनीही विकेट फेकल्या. प्रत्यक्षात विकेट मात्र जाईल ती या स्टायलीश फलंदाजांची नव्हे तर बॅटींग कोच संजय बांगर यांची. तसे झाले तर चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्यासारखे होईल.

स्टायलीश फलंदाजांमुळेच कचरा, तरिही बांगर बळीचा बकरा ?वर्ल्ड कपमध्ये भारताचा डाव उपांत्य फेरीत मोडला गेला त्यास फलंदाज कारणीभूत ठरले. पहिले तीन मोहरे केवळ भोपळा न फोडता 
परतले. इतरांनीही विकेट फेकल्या. प्रत्यक्षात विकेट मात्र जाईल ती या स्टायलीश फलंदाजांची नव्हे तर बॅटींग कोच संजय बांगर यांची. तसे झाले तर चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्यासारखे होईल.

अलिकडे कोणत्याही इंटरनॅशनल संघाला सपोर्ट स्टाफ असतो. याशिवाय मुख्य प्रशिक्षक असतो. ही मंडळी अनुभवी असतात. पूर्वी खेळाडू म्हणून त्यांनी योगदान दिलेले असते. मुळात मुद्दा असा की बीसीसीआयच्या सेंट्रल काँट्रॅक्टच्या रुपाने करोडो रुपयांची कमाई करणाऱ्या, जाहीरातदारांकडून पैसे मिळणाऱ्या, वर अपयशी ठरले तर कोणतेही उत्तरदायित्व नसलेल्या, मुळात आधी किमान कामगिरी (परफॉर्मन्स) करणे बंधनकारक नसलेल्या क्रिकेटपटूंना परिस्थितीचा अंदाज घेऊन, खेळपट्टीचे स्वरुप, प्रतिस्पर्धी गोलंदाजांची व्यूहरचना असे लक्षात घेऊन खेळता येत नाही का...तेवढा अनुभव त्यांच्या गाठीशी नाही का... असलेल्या अनुभवाचा वापर करून ते मैदानावर डिलीव्हर करू शकत नाहीत का...असे असंख्य प्रश्न उपस्थित होतात.

नेमकेपणाने उपांत्य फेरीतल न्यूझीलंडने दिलेल्या टार्गेटबद्दल बोलायचे झाले तर ते 1990च्या दशकातील पार टोटल असलेल्या अडीचशेच्या आतलेच होते. तशा परिस्थितीत पहिली पाचच नाही तर अगदी दहा षटके जरी मेडन गेली असती (एकही विकेट पडू न देता...) तरी चालू शकले असते.

मायदेशात दे घुमाके, परदेशात रख छुपाके

मायदेशातील खेळपट्यांवर चेंडू बॅटवर येताच दे घुमाके करणारे आपले स्टायलीश फलंदाज परदेशातील खेळपट्ट्यांवर चेंडू थोडासा मुव्ह-सीम-स्विंग होऊ लागला की चकतात. अशा फलंदाजांना तोंड लपवायला जागा राहात नाही. कुठून आणले यांना...असा कूटप्रश्न क्रिकेटप्रेमींना पडतो.

फिरकीस पोषक खेळपट्ट्यांवर दादागिरी करणाऱ्या या फलंदाजांना परदेशात फारसा लौकीक नसलेले स्पीनर्स टप्पा, दिशा, उंची, अचूकता आणि वेगातील बदल अशा जोरावर चकवितात. आपल्या फलंदाजांच्या हातात बॅट असते, डोक्यात अनुभव असतो, मग मैदानावर ते का मोक्याच्या वेळी गडबडतात...त्याला बॅटींग कोच काय करणार...

बांगर हे खेळाडू म्हणून केवळ 12 कसोटी खेळले किंवा खेळू शकले, पण प्रथमश्रेणीतील त्यांची कारकिर्द थक्क करणारी आहे. रेल्वेसारख्या केवळ सहभागापुरते सहभागी होणाऱ्या रेल्वेला त्यांनी तीन वेळा रणजी करंडक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. याचा अर्थ बांगर हे प्रेरणादायी खेळाडू-कर्णधार आहेत.

बांगर हे तंत्रशुद्ध फलंदाज आणि उपयुक्त मध्यमगती गोलंदाज सुद्धा होते. प्रथमश्रेणीत त्यांनी 8349 धावा-300 विकेट अशी कामगिरी केली. बांगर यांनी बंगळूरमधील नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीत सल्लागार म्हणूनही काम केले आहे.

बांगर यांच्या कसोटी कारकिर्दीचे आकडे असे आहेत :
कसोटी : 12
डाव : 18
नाबाद : 2
धावा : 470
सर्वोच्च नाबाद : 100
सरासरी : 29.37
शतक : 1
अर्धशतके : 3
शून्य : 2

ही आकडेवारी नुसती वाचली तर बांगर हे अतीसामान्य दर्जाचे कसोटीपटू होते असे वाटू शकेल, पण खालील मुद्यांचा विचार केला तर ते जिगरबाज क्रिकेटपटू होते हे स्पष्ट होईल.
- कारकिर्दीमधील दुसऱ्याच कसोटीत आणि दुसऱ्याच इनिंगमध्ये शतक
- नागपूरला झिंबाब्वेविरुद्ध शतकी खेळी

इंग्लंडमधील कामगिरी :
- 2002च्या दौऱ्यात लिड्सला तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात सलामीला येत 68 धावांची खेळी. 
- सलामीचा जोडीदार विरेंद्र सेहवाग (8) सातव्याच षटकात बाद झाला होता
- बांगर यांनी 75व्या षटकापर्यंत किल्ला लढविला.
- बांगर यांनी साथ दिल्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांना रोखण्यात भारत यशस्वी
- त्या डावात नंतर राहुल द्रविड (148), सचिन तेंडुलकर (193) आणि सौरव गांगुली (128) यांची शतके
- भारताने 8 बाद 628 धावा करून कसोटी डावाने जिंकली
- त्या विजयामुळे भारत मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवू शकला

बांगर यांचा कारकिर्दीचा कालावधी आणि प्रथमश्रेणीतील कामगिरी पाहिली तर त्यांना आणखी संधी मिळायला हवी होती असे म्हणता येईल. मात्र बांगर हे शापित स्थानिक भारतीय क्रिकेटपटूंच्या गटात मोडले गेले. प्रशिक्षक म्हणूनही त्यांच्यावर असाच अन्याय झाला तर ती त्यांची नव्हे भारतीय क्रिकेटची शोकांतिका ठरेल.


​ ​

संबंधित बातम्या