ISL : IPL नंतर बघा.. आता फुटबॉलचा धुमाकूळ सुरू होतोय..!

मुकुंद पोतदार
Thursday, 24 January 2019

आयएसएलमध्ये यंदा नवा विजेता उदयास येणार हे नक्की. अखेरच्या टप्यासह ही उत्कंठा उत्तरोत्तर वाढत जाईल. त्यामुळे फुटबॉलप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इंडियन सुपर लिगला (आयएसएल) 40 दिवसांच्या प्रदिर्घ ब्रेकनंतर शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. कोचीतील नेहरू स्टेडियमवर केरळा ब्लास्टर्स आणि एटीके यांच्यातील लढतीने हा टप्पा सुरु होईल. राष्ट्रीय संघाने एएफसी आशियाई करंडक स्पर्धेची पात्रता साध्य केली. या स्पर्धेतील भारतीय संघाच्या सहभागामुळे लिगला इतका मोठा ब्रेक मिळाला. त्याआधीही पूर्वतयारी म्हणून जे मित्रत्वाचे सामने झाले त्यामुळे सुद्धा दोन ब्रेक आले होते.

एएफसी करंडक स्पर्धेत भारतीय संघाला दमदार सुरवातीनंतर बाद फेरी गाठण्यात अपयश आले. गटातील अखेरच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर इंग्लंडच्या स्टीफन कॉन्स्टंटाईन यांनी स्वतःहून पायउतार व्हायचे ठरविले. थायलंडविरुद्ध 4-1 अशा विजयासह दमदार सलामी, संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध 0-2 असा पराभव, अखेरच्या सामन्यात बहारीनविरुद्ध बरोबरी पुरेशी असताना ह्रदयद्रावर पेनल्टीवर गोल आणि पर्यायाने हार, मग प्रशिक्षकांचा पदत्याग अशा घडामोडींनी भारतीय फुटबॉलविश्व ढवळून निघाले.

आता आयएसएलच्या रुपाने किक-ऑफ होईल तेव्हा पुन्हा मैदानावरील घडामोडी केंद्रस्थानी येतील. आयएसएलचा हा पाचवा मोसम आहे. या स्पर्धेने काय साध्य केले याचा लेखाजोखा स्वतंत्रपणे घ्यावा लागेल, मात्र एफसी गोवा संघाच्या रुपाने गोमंतकीय फुटबॉलप्रेमींना ब्यूटीफुल गेमचा पुन्हा लळा लागणे, कोचीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये केरळा ब्लास्टर्सचे चाहते रोमांचकारी वातावरणनिर्मीती करणे, बेंगळुरू एफसीचे श्री कंठीरवा स्टेडियम फुटबॉलप्रेमींनी फुलून जाणे, मुंबईतील अंधेरीतील मैदान आणि पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील सामन्यांना उल्लेखनीय प्रतिसाद मिळणे, नॉर्थइस्ट युनायटेड एफसीच्या रुपाने ईशान्येकडील फुटबॉलला आणखी चालना मिळणे अशी काही वैशिष्ट्ये नमूद करता येतील.

बेंगळुरूचा बोलबाला
यंदा बेंगळुरू एफसीने यंदा 11 सामन्यांतून सर्वाधिक 27 गुणांसह आघाडी घेतली आहे. मुख्य म्हणजे हा संघ अद्याप अपराजित आहे. अपराजित असलेला हा एकमेव संघ आहे आणि यावरूनच बेंगळुरूचे वर्चस्व स्पष्ट होते. जेएसडब्ल्यू स्पोर्टसचा पाठिंबा लाभलेल्या या संघाने गेल्या मोसमात आयएसएल पदार्पण केले. पदार्पणात आय-लीग जिंकल्यामुळे बेंगळुरू एफसीकडून चाहत्यांना जोरदार आशा होत्या. साखळीत 18 सामन्यांतून सर्वाधिक 40 गुणांसह बेंगळुरूने अव्वल स्थानही मिळविले होते. आघाडीसह बाद फेरीत (प्ले-ऑफ) मुसंडी मारलेल्या या संघाला घरच्या मैदानावर अंतिम सामना खेळण्याची संधी मिळाली होती, मात्र चेन्नईयीन एफसीविरुद्ध बेंगळुरूला 2-3 असे पराभूत व्हावे लागले. तेव्हा नवव्याच मिनिटाला सुनील छेत्री याने आघाडी घेऊनही बेंगळुरू मध्यंतरास 1-2 असे पिछाडीवर होते. नंतर चेन्नईयीनने आणखी एक गोल केला. अखेरीस व्हेनेझुएलाच्या मिकू याने पिछाडी कमी केली, पण बेंगळुरुची सुवर्णसंधी हुकली.
अर्थात पदार्पणात उपविजेतेपद ही कामगिरी बेंगळुरू एफसी करीता अभिमानास्पद ठरते. आता यंदा या संघाने जणू काही मागील मोसमापासून पुढे प्रारंभ केला आहे. प्ले-ऑफमधील त्यांचा प्रवेश जवळपास नक्की आहे.

तीन जागा, पाच संघ
उरलेल्या तीन जागांसाठी जोरदार चुरस आहे. यासाठी पाच संघ शर्यतीत आहेत. मुंबई सिटी एफसी (12 सामन्यांतून 24) दुसऱ्या, एफसी गोवा (11 सामन्यांतून 20) तिसऱ्या, नॉर्थइस्ट युनायटेड एफसी (12 सामन्यांतून 20) चौथ्या, जमशेदपूर एफसी (12 सामन्यांतून 19) पाचव्या क्रमांकावर आहे. दोन वेळचा माजी विजेता एटीके 12 सामन्यांतून 16 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. 

गतविजेते आणि शाप

आतापर्यंतच्या आयएसएलचा इतिहास पाहिल्यास गतविजेत्या संघाची पुढील मोसमात घसरगुंडी उडणे असा ट्रेंड दिसून येतो. आतापर्यंत एटीके आणि चेन्नईयीन एफसी यांनी आळीपाळीने चार स्पर्धांत जेतेपद मिळविले आहे. यात गतविजेत्या चेन्नईयीन एफसीला शाप भोवला. हा संघ 12 सामन्यांतून पाच गुणांसह अखेरच्या क्रमांकावर आहे. त्यांना अवघा एक विजय मिळविता आला आहे.

या पार्श्वभूमीवर आयएसएलमध्ये यंदा नवा विजेता उदयास येणार हे नक्की. अखेरच्या टप्यासह ही उत्कंठा उत्तरोत्तर वाढत जाईल. त्यामुळे फुटबॉलप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


​ ​

संबंधित बातम्या