आयएसएल - एटीकेला हरवून ब्लास्टर्सची कोचीत दमदार सलामी

वृत्तसंस्था
Monday, 21 October 2019

- गेल्या दोन मोसमांमधील निराशाजनक कामगिरीतून सावरत केरला ब्लास्टर्स एफसीने हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमात दमदार सलामी दिली.

- एटीकेला येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवरील स्थानिक प्रेक्षकांच्या साक्षीने ब्लास्टर्सने 2-1 असे हरविले.

कोची - गेल्या दोन मोसमांमधील निराशाजनक कामगिरीतून सावरत केरला ब्लास्टर्स एफसीने हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमात दमदार सलामी दिली. दोन वेळच्या माजी विजेत्या एटीकेला येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवरील स्थानिक प्रेक्षकांच्या साक्षीने ब्लास्टर्सने 2-1 असे हरविले. नायजेरीयाचा बार्थोलोम्यू ओगबेचे याने पेनल्टीसह दोन गोल करीत विजयात सिंहाचा वाटा उचलला.

ब्लास्टर्सने नेदरलँड््सच्या एल्को शात्तोरी यांना मुख्य प्रशिक्षक नेमून नव्याने सुरवात केली आहे. घरच्या मैदानावरील विजयी सलामी त्यांच्या 36 हजार 298 चाहत्यांसाठी जल्लोषाची पर्वणी ठरली. दुसरीकडे पहिल्या मोसमातील विजेते प्रशिक्षक अँटोनिओ लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखाली एटीकेला पूर्वार्धातील चुका आणि उत्तरार्धात दवडलेल्या संधींचा फटका बसला. अंतिम टप्यात हबास यांनी मध्य फळीतील जेव्हियर फर्नांडीस आघाडी फळीत एदू गार्सियाला पाचारण केले, पण त्यांची चाल यशस्वी ठरली नाही. सहाव्याच मिनिटाला खाते उघडूनही एटीकेला रिकाम्या हाताने परतावे लागले. दुसरीकडे ब्लास्टर्सने निर्णायक विजयाचे तीन गुण वसूल केले.

वास्तविक एटीकेने दमदार सुरवात केली होती. सहाव्या मिनिटाला आयर्लंडच्या कार्ल मॅक््हुयजने एटीकेचे खाते उघडले होते. त्यानंतर प्रोणय हलदरच्या धसमुसळ्या खेळामुळे ब्लास्टर्सला पेनल्टी मिळाली. तोच निर्णायक क्षण ठरला. मोसमातील पहिला गोल कार्लने नोंदविला. सहाव्या मिनिटाला एटीकेचा मध्यरक्षक जेव्हीयर हर्नांडेझ याने बॉक्समधून चेंडू मारला. त्यावर सहकारी आगुस्टीन इनीग्युएझने उडी मारत हेडींग केले. त्यामुळे निर्माण झालेल्या संधीचे कार्लने सोने केले.

28व्या मिनिटाला ब्लास्टर्सला कॉर्नर मिळाला. त्यावर ओगबेचेने हेडींग केले, पण चेंडू गोलपोस्टला लागून जैरो रॉड्रीग्जच्या दिशेने गेला. तो प्रयत्न करण्याच्या बेतात असतानाच मागून प्रोणय हलदरने त्याला पाठीमागून ओढले. त्यामुळे जैरोचा फटका चुकला आणि चेंडू बारवरून बाहेर गेला. परिणामी पंच सी. रामस्वामी श्रीकृष्ण यांनी ब्लास्टर्सला पेनल्टी बहाल केली. ती घेण्यासाठी ओगबेचे पुढे सरसावला. त्याने नेटच्या उजव्या कोपऱ्यात मैदानालगत फटका मारला. एटीकेचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याने अंदाज बरोबर घेत योग्य दिशेने उडी मारली, पण ओगबेचे याची ताकदवान किक तो थोपवू शकला नाही.

ब्लास्टर्सने दुसरा गोल पूर्वार्धातील अखेरच्या मिनिटाला केला. मध्य फळीतील प्रशांत करुथादाथ्कुनी याने ही चाल रचली. त्याने उजवीकडून मैदानालगत मध्य क्षेत्राच्या दिशेने क्रॉस शॉट मारला. हलदरला चपळाईने बचाव करता आला नाही आणि ओगबेचेला संधी मिळाली. ओगबेचेने पहिल्या प्रयत्नात मारलेला चेंडू उजव्या पोस्टला लागून नेटमध्ये गेला.

ब्लास्टर्सने सुरवात सकारात्मक केली. पहिल्याच मिनिटाला हालीचरण नर्झारीने मुसंडी मारली होती, पण त्याला अचूकता साधता आली नाही. पिछाडीनंतर दहाव्या मिनिटाला ब्लास्टर्सला फ्री कीक मिळाली. त्यावर जेसेल कार्नेरीओने मारलेच्या चेंडूवर जैरोने हेडींग केले, पण चेंडू थोडक्यात बारवरून गेला. एटीकेने चेंडूवर ताबा ठेवला होता. 18व्या मिनिटाला जेव्हीयर हर्नांडेझने रॉय क्रीष्णाला पास दिला. रॉयला पाडल्यामुळे जैरोला यलो कार्ड दाखविण्यात आले.  24व्या मिनिटाला हर्नांडेझ-रॉय यांनी पुन्हा चाल रचली, पण फिनीशिंग सफाईदार नव्हते.

उत्तरार्धात सुरवातीलाच एटीकेला संधी मिळाली होती, पण 47व्या मिनिटाला जेव्हीयरने डावीकडून घेतलेल्या कॉर्नरवर स्ट्रायकर डेव्हिड विल्यम्स टाचेने चेंडू मारताना अचूकता दाखवू शकला नाही. तीन मिनिटांनी एटीकेला मिळालेल्या फ्री किकवर जेव्हियरने मारलेला चेंडू जैरोने हेडींगने अडविला. 56व्या मिनिटाला जेव्हियरला सफाईने चाल रचता आली नाही.


​ ​

संबंधित बातम्या